आपण म्हणजे आपला मानसिक मी होय. हा मानसिक मी आपल्या भूतकालीन माहितीचा प्रतिनिधी आहे.
आपल्यातील भूतकाळ म्हणजे आपली परंपरा, आपण वाचलेले ग्रंथ, आपल्या सर्व धार्मिक परंपरा तसेच वांशिक वारसा आणि आपण ज्या संस्कृतीत राहात आहोत ती, प्रार्थना स्थळे, श्रद्धा आदि सर्व जे मागील पिढ्यानी आपल्या स्वाधीन केले आहे ते सर्व काही आपला भूतकाळ आहे.
गेल्या हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या धार्मिक अपप्रचाराचे आपण बळी आहोत. ख्रिश्चन धर्मीय दोन हजार वर्षांच्या अपप्रचाराचे बळी आहेत. ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि आपण कृष्णावर किंवा इतर हिंदू देवी देवतांवर विश्वास ठेवतो तसेच निधर्मी कम्युनिस्ट सुद्धा इतर कशावर तरी विश्वास ठेवतात.
आम्ही पारंपरिक अपप्रचाराचा परिणाम आहोत. याचा अर्थ काय होतो हे आपल्या लक्षात आले आहे का? प्रत्यक्षात त्यांच्या जवळ सत्य काहीही नाही, फक्त परंपरा वाद्यानी केलेला प्रभावी अपप्रचार आहे ते सर्व. आणि कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधण्यासाठी आपल्यामध्ये सुव्यवस्था असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या मधील संपूर्ण अव्यवस्था कमी होते तेव्हाच व्यवस्था येऊ शकते.
आपल्या मधील काही जे जिज्ञासू, गंभीर, विचारी आणि प्रामाणिक आहेत त्यांना प्रश्न पडतो की, काही पवित्र शक्ती आहे की नाही? त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की मंदिर, मशीद किंवा चर्च हे पवित्र नाही आणि त्यातील प्रतिमाही पवित्र नाहीत.
मंदिरे आणि त्यामधील मूर्तींना आपण भीतीपोटी, परंपरेच्या ओझ्याच्या सवयीने, स्वतःस इतरांच्या गुलामी मध्ये हवाली करणे ज्याला आपण पावित्र्य समजत असतो त्यामुळे त्यांना आपण पवित्रतेची प्रतीके समजत आहोत. मग अर्थातच प्रश्न निर्माण होतो की विश्वात खरेच काही पवित्र आहे की नाही?
आपणास माहिती आहे की शतकानुशतके मनुष्य प्राणी याविषयी बोलत आहे. काहीतरी अविनाशी असे तत्व असावे, ते शोधून काढायला हवे, जे मनाने निर्माण झाले नसेल, जे स्वतःच पवित्र असेल, अशी गोष्ट जी भूतकाळाने कधीही स्पर्श केली नसेल. माणूस नेहमी ते तत्व शोधत असतो. ते तत्व त्याला सापडले नाही म्हणून त्याने धर्मादी श्रध्दास्थाने यांचा शोध लावला.
साधक जर प्रामाणिक जिज्ञासू असेल तर तो स्वतः वास्तविक, खरोखर, सार्वकालिक पवित्र काय आहे हे शोधून काढू शकतो. तो शोध नक्कीच त्याला कोणत्याही मुर्तीमधून, मंदिरामधून अथवा कोणत्यातरी भाकड कथांद्वारे किंवा प्राचीन तत्वज्ञाना मधून लागणार नाही. जो त्याचा शोध घेणार नाही किंवा ज्याला ती पवित्र गोष्ट समजणार नाही तो नेहमीच अपवित्र, स्वार्थी राहील आणि तो क्रूर सुद्धा होवू शकेल.
आपण कोणीही ते समजून घेवू शकतो. त्यासाठी आपण आपल्या मधील अविचार काय काय आहेत हे पाहणे आवश्यक आहे, ते पाहण्यासाठी स्वयं अवलोकन करण्याची सवय हवी. कडक शिस्तप्रिय सवयीचे गुलाम असण्याची आवश्यकता नाही.
ते पाहण्यासाठी आपण आपले संपूर्ण लक्ष त्याकडे दिले पाहिजे. आणि आपले संपूर्ण लक्ष वेधण्या मध्येच त्या पाहण्याची शिस्त असते, त्यासाठी इतर सांप्रदायिक शिस्त नको असते.
कसलाही विचार येवू न देता जे केवळ लक्ष देणे असते त्यामध्ये जिवंतपना असतो, ते सातत्यशील असते. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादे महत्वाचे ऐकत असतो तेव्हा त्या ऐकण्या कडे आपले संपूर्ण लक्ष असते, आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया शून्य झालेल्या असतात. हे असे विचारशून्य होवून केलेली प्रत्येक कृती पवित्र असते. ते पावित्र्य मोजण्या साठी आपल्याला इतर कोणत्याही नैतिक मानकांची आवश्यकता नाही.
जर आपण हे केले असेल, जसा वक्ता याबद्दल आता बोलत आहे, तर त्या पाहण्यामध्ये त्या पाहण्याची स्वतःची शिस्त आहे, त्याची स्वतःची सुव्यवस्था आहे, आणि त्याची पवित्रता आहे. विचार शून्य अवस्था हीच पवित्र अवस्था आहे. विचार हे स्वार्थी असतात म्हणून विचारी मन हे अपवित्र मन असते. पारंपरिक साहित्य, पारंपरिक विचार यामुळे सत्य समजण्यास उपयोगी पडत नाही.
जर आपणास विचार शून्य आकलन करता येवू लागले तर ते मन सुव्यवस्थित होते. मनाचा सुव्यवस्थित असणे म्हणजे आवश्यक विचारांचा योग करणे आणि अनावश्यक विचारांचा त्याग करणे होय. मनाच्या अशा सुव्यवस्थित अवस्थेला मनाचा अत्युच्च पवित्रपणा समजावा. मला माहित नाही आपणास हे समजत आहे की नाही ते.
आपणास माहित आहे काय की जेव्हा आपण मत्सर न बाळगता झाड, पक्षी, आपल्या सहकाऱ्यावर, आपल्या साथीदारावर प्रीति करता तेव्हा ते मत्सर रहित प्रेम कधीच द्वेषाने स्पर्श करत नाही, जेव्हा ते मत्सर रहित प्रेम असते तेव्हा ते प्रेम स्वयं पवित्र असते, आपल्याकडे या व्यतिरिक्त इतर आणखी कोणतीही गोष्ट नाही जी यापेक्षा जास्त पवित्र असू शकते. म्हणून ती अतिशय पवित्र अशी वस्तू आहे, फक्त मनुष्याने एकत्र केलेल्या कोणत्याही गोष्टींमध्ये (मानवी विचाराने बनविलेल्या कल्पना) ती नाही. ती अस्तित्वात येते जेव्हा मनुष्य भूतकाळा पासून पूर्णपणे स्वतःला वेगळा करतो, भूतकाळ म्हणजे केवळ आठवणी आहेत.
याचा अर्थ असा होत नाही की तो माणूस विचार करणेच विसरून जाईल. त्याला जीवनावश्यक गोष्टींसाठी स्मरणशक्ती असणे आवश्यक आहे, परंतु त्या स्मरणशक्ती मध्ये भूतकाळाचा कोणताही संबंध नसेल. आणि भूतकाळाचा शेवट फक्त तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण गोष्टी जशा आहेत त्याप्रमाणे वर्तमानात पहाल आणि थेट त्यांच्याशी स्मृती विना संपर्क साधलात तर. आपले जग अधिक चांगले समजण्यासाठी आपण गोष्टी जशा आहेत तशा त्या पाहणे आवश्यक आहे.
मग अशा सुव्यवस्थेच्या मधून शिस्त, पावित्र्य, प्रेम अवतरित होते. हे प्रेम प्रचंड उत्कट असते आणि ते तत्क्षणी कार्य करते. त्याच्या पाहणे आणि कृती करणे यांच्या मध्ये वेळकाढूपणा नसतो. आणि जेव्हा आपणा सोबत ते प्रेम असते तेव्हा आपण आपले सर्व पवित्र ग्रंथ आणि आपल्या सर्व श्रद्धा काढून टाकू शकता.
आणि त्या प्रेमासाठी तुम्हाला तुमचे सर्व पवित्र ग्रंथ, सर्व देवता, तुमच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील. हेच एकमेव पवित्र सत्य आहे. आणि हे सत्य समजण्यासाठी तुमच्यात चांगुलपणा फुलला पाहिजे. चांगुलपणा .. समजतो का, सर? ..
सभ्यता केवळ स्वातंत्र्यातच फुलू शकते, परंपरेत नाही.
जगाला परिवर्तनाची आवश्यकता आहे, तुम्हाला तर त्याची अत्यंत आवश्यकता आहे, सर.
आपल्यात मूलभूत, आमूलाग्र मानसिक बदलाची आवश्यकता आहे आणि हा बदलच व्यवस्था आणील. व्यवस्था शांतता आणते. आणि ही व्यवस्था तिच्या सद्गुण आणि शांततेसह, तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवना मधील अव्यवस्थेच्या आकलनात असाल. मग त्या प्रमाणे अवलोकन केल्यास चांगुलपणा येईल आणि त्या नंतर सत्याच्या शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही. जे असेल तेच पवित्र असेल.
J. Krishnamurti, Madras, 14 January 1968
No comments:
Post a Comment