Thursday, June 24, 2021

नैसर्गिक ध्यान

 

आपण आपली वर्तमानातील कामे सोडून टीव्ही समोर बसून आपले मनोरंजन करीत असतो. टीव्ही वरील सर्व कार्यक्रम हे भूतकाळा मध्ये तयार केलेले असतात, अनेकदा त्यांचे repeat telecast केलेले असतात. टीव्ही केंद्रात असे असंख्य कार्यक्रम साठविलेले असतात. 

भूतकाळात होवून गेलेल्या घटना पासून आपण जेव्हा आपले मनोरंजन करत असतो तेव्हा आपले वर्तमान कालाकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले असते. वर्तमान काळातील समस्यांकडे आपले लक्ष जावू नये म्हणून सुद्धा अनेकदा टीव्ही वर जास्त मनोरंजक कार्यक्रम दाखविले जातात.

अगदी असेच आपल्या अंतरंगात होत असते. आपले मन सतत आपणास मेंदूच्या समृतिमध्ये साठविलेल्या जुन्या घटना दाखवित असते, त्यावर मन सतत विचार करीत असते. जुन्या घटना पाहताना आणि त्यावर विचार करीत असताना त्याचवेळी ते मन भविष्य काळातील योजना सुद्धा बनवीत असते. मनातील सततच्या विचारामुळे आपणास वर्तमानकाळ कधीच समजत नाही. तो समजुच नये यासाठी मनाला अधिक मनोरंजक अशा श्रद्धा, भक्ती, साधना यांच्या आहारी केले जाते. 

ज्या ज्या वेळी आपण अवांतर विचार करीत असतो त्या त्या वेळी आपल्या मेंदूमध्ये त्या अवांतर विचारांची फिल्म फिरत असते. या फिल्म मुळे आपले वर्तमानाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत राहते. या फिल्म मधून जर आपल्या भावना उत्तेजीत केल्या जात असतील तर त्याची नशा होवून जाते आणि मग आपण त्या फिल्म शिवाय जगू शकत नाही. 

आपले नैसर्गिक जीवन आणि आपले मानसिक जीवन यामधील हा फरक आहे. आपले मानसिक जीवन हे तथ्य नसून ते काल्पनिक आहे हे लक्षात येणे खूप महत्वाचे आहे. 

काल्पनिक जीवनाची नशा उतरवायची असेल तर नशा चढविनाऱ्या ज्या श्रद्धाच्या गोष्टी परंपरा सतत सांगत असतात त्यांचा त्याग करायलाच हवा आणि नैसर्गिक जीवनात स्थिर होण्यासाठी जे काही आपण आता वर्तमानात कार्य करीत असतो त्याच्या कडे सतत लक्ष देत राहणे, वर्तमानाचा योग करीत राहणे अगत्याचे आहे. 

त्याग कशाचा करायचा आणि योग कशाचा करावयाचा याचे सतत स्मरण ठेवणे म्हणजे खरे ध्यान होय.


No comments: