Friday, June 25, 2021

विचार म्हणजे नेमके काय असते?

 


आपला मी आणि मी जे सतत विचार करीत असतो त्यांचे खरे स्वरूप समजले तर आपणास आपल्या जीवनाचे खरे स्वरूप समजू शकते म्हणजेच सत्य आकलन होवू शकते. 

कॅसेट् प्लेअर येण्यापूर्वी सीडी सारखी मोठी तबकडी असणारा ग्रामोफोन प्लेअर होता. ती तबकडी गोल फिरत असायची आणि त्यावर एक पिन ठेवली जायची. तबकडीवर रेकॉर्ड केलेले गाणी ती पिन read करायची आणि स्पीकर मधून ते गाणे वाजले जायचे. हीच पद्धत कॉम्प्युटर मधील बंदिस्त hardisk या memory storage device मध्ये असते. हार्ड डिस्क मधील माहिती कॉम्प्युटर आपणास हवी तशी पुरवीत असतो. माहितीची ही देवाण घेवाण करणारी जी यंत्रे मानवाने बनविली आहेत ती सर्व यांत्रिक आहेत. म्हणजे यांत्रिक पद्धतीने आपण माहितीची देवाण घेवाण करू शकतो, माहिती साठवणूक करू शकतो. अगदी अशीच यंत्रणा आपल्या मेंदूमध्ये असते. आपल्या पूर्वजांनी जन्मतः दिलेली माहिती अधिक आपल्या लहानपना पासूनची सर्व माहिती आपल्या मेंदूमध्ये साठविलेली असते. ज्यावेळी जी माहिती मी याला हवी असेल त्यावेळीं ती माहिती आपल्या मेंदूमधील स्मृती मधून आपल्या मी ला पुरवली जाते. यालाच आपण विचार करणे असे समजतो. म्हणजे आपल्या विचाराची प्रक्रिया ही कॉम्प्युटर सारखीच यांत्रिक - तांत्रिक असते. 

मी हा सुद्धा आपल्या स्मृती मधील विचार असतो. ज्यावेळी आपणास कोणी काही विचारीत असतो त्यावेळी त्याचे उत्तर देण्यासाठी आपल्या स्मृती मधील माहिती संग्रहा मधून एक तात्पुरता announcer / उदघोषक तयार केला जातो. हा उदघोषक म्हणजे आपला मी असतो. अनुभव आणि माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी हा तात्पुरता तेव्हढ्या साठी मी नावाचा उदघोषक उत्पन्न होतो. व्यवहारीक गोष्टी करण्यासाठी, शरीराच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठीच्या विचारांसाठी हा मी तात्पुरत्या सोयीसाठी हवा असतो. परंतु एकदा मी निर्माण झाल्या नंतर त्याला जास्तीत जास्त काळ अस्तित्वात राहण्याची इच्छा तयार होते. त्याच्या या इच्छे पूर्ततेसाठी तो इतर अनेक इच्छा तयार करीत राहतो. तो फक्त इच्छा तयार करून थांबत नाही तर त्यासाठी इतर अनेक भावना, संकल्पना, श्रद्धा यांनाही तोच जन्माला घालतो. 

मी हा एक विचार आहे, त्याने बनविलेल्या सर्व इच्छा, आशा, आकांशा, भावना, संकल्पना, श्रद्धा हे सर्व विचार आहेत. आणि सर्व विचार हे तांत्रिक आहेत. 

राग येवुन गेल्या नंतर आपणास ते समजते, त्यावेळी राग आणि मी एकच असतात म्हणून मी ला नंतर समजते. नंतर समजणारी गोष्ट ही भूतकाळ असते, ती वर्तमानकालीन असू शकत नाही म्हणजेच ती जिवंत नसून मृत झालेली असते. आपले विचार हे सर्व भूतकाळातील मृत विचार असतात आणि तेच आपल्या संघर्षमय जीवनास कारणीभूत असतात. 

आपले जुने कोणतेही विचार हे वर्तमानाला कदापिही जानु शकत नाहीत म्हणून सर्व पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे गुरू सत्याचे आकलन करण्यात सपशेल अयशस्वी होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते सगळे विचार, ज्ञान आणि परंपरा ह्या स्मृती मधून तयार झालेले केवळ भास आहेत. मी आणि मी चे भास म्हणजे तथ्य नव्हेत, सत्य तर कदापिही नव्हेच. म्हणून मी म्हणजे आत्मा वगैरे केवळ कल्पना आहेत. 

ज्यावेळी आपण रागावतो तेव्हा नेमके कोण रागावते? आपल्या मी चे विचार दुःखी झाले की ते रागावतात. मी हा एक भास आहे, ते भास रागवण्याचे भास तयार करतात. प्रत्यक्षात तिथे इतर कोणीच रागावण्यासाठी नसते. इतर विचारापासून मी हा विचार वेगळा होतो आणि तो द्वैत निर्माण करतो. मी आणि इतर अनुभव आणि त्यांचे विचार अशी भासामध्ये विभागणी होते. आणि जेथे मानसिक विभागणी होते तेथे संघर्ष अटळ असतो. उदा. दोन धर्म, दोन देश, दोन संस्कृती वगैरे.  

शरीराचे संरक्षण, संवर्धन यासाठी विचार आवश्यक असतात परंतु या भौतिक गरजांचे आपला मी त्याच्या मानसिक संकल्पना बनविण्यात यशस्वी झाला आहे. उदा. आपल्या संरक्षणार्थ समाज / धर्म / देश अशा संकल्पना आपल्या मी याने बनविल्या आहेत. परंतु दोन गटामध्ये हिंसाचार होवून मूलभूत संरक्षण धोक्यात येते. 

मी आणि त्याचे विचार यांचे यथार्थ ज्ञान झाले तर जीवन मानसिक संघर्षातून निवृत्त होवून नैसर्गिक सहजीवनात बदलू शकते, आणि ते सहज शक्य आहे.

No comments: