कृष्णमूर्ती: मला असे वाटते की आपण सत्य शोधण्यासाठी, देवाचा शोध घेण्यापूर्वी, साधना सुरू करण्यापूर्वी किंवा समाजातील दुसर्या समवेत संबंध ठेवण्यापूर्वी प्रथम आपण स्वतःला समजण्यास सुरवात करणे अत्यंत आवश्यक आहे.
मी त्यालाच प्रामाणिक व्यक्ती समजेन जो त्याच्या भौतिक ध्येयाचा पाठलाग करण्यापूर्वी स्वतःस नीट समजून घेईल. आपण सहसा असे करत नाही त्यामुळे आपण स्वतः, आपले नाते संबंध, आपला समाज सर्व काही भ्रमात जीवन जगत आहोत. आणि याचा अर्थ असा नाही की स्वयं शोध हा कोणत्या नात्यांच्या आड येत आहे, त्यांच्या पासून विभक्त होत आहे, त्यांना विरोध करीत आहे. सत्यशोधक हा कुटुंब आणि समाज विरोधी नसतो हे पक्के लक्षात असू द्यात.
स्वतःचा शोध करण्यासाठी कोणत्याही हेतूची आवश्यकता नसते. स्वतःचा शोध हाच सत्याचा शोध असतो.
सत्य अवस्था हि विचारांनी प्रदूषित झालेल्या मेंदूला कदापि अवगत होत नाही. अर्थातच सत्य अवस्था जी सदोदित असतेच तिचे आकलन होण्यासाठी किंवा तिच्याशी समरस होण्यासाठी एकच अडथळा असतो तो म्हणजे विचारांचा / मी चा / स्मृतींचा / पूर्व माहिती संग्रह आदींचा.
आपले विचार, आपला मी हेच आपण असतो आणि त्यांच्या पासून आपणास वेगळे होता येत नाही. आपल्या मीपणाचा निरास होण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो, साधना करतो ते सर्व मी ला बळकट करीत असतात. मी स्वतःचे खरे स्वरूप कधीच प्रदर्शित करीत नाही. परंपरा बरोबर श्रद्धा असतात त्यामुळे त्यांच्या शिकवणी शिवाय काही वेगळे असू शकते याचा विचार येत नाही. यामुळे श्रद्धाळू परंपरागत मनात अंतरदृष्टीला जागा उपलब्ध नसते, अशा मनाला सत्य आकलन होत नाही.
श्रद्धा, परंपरा, संमोहन आणि या सर्वातून निर्माण होणाऱ्या दुःखातून पळवाट काढण्या ऐवजी *त्यांचे खोलवर निरीक्षण केले, प्रतिप्रश्न केले, तपासणी केली तरच त्यातून मुक्तता शक्य होते.
जर एखाद्या मनाला याची जाणीव झाली की त्याचे मन, बुद्धी संमोहित झाली आहे, त्याचे ज्ञान त्याला चुकीचे मार्गदर्शन करीत आहे, आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहोत तर त्या मनाचा मीपणा ढासळू लागतो.
परंपरा, श्रद्धा यांना बाजूला केले की प्रदूषित मन मोकळे होते, मेंदूची संपूर्ण ऊर्जा वाया जाणे थांबते आणि अंतरदृष्टिला जागा आणि ऊर्जा उपलब्ध होते. अंतर्दृष्टी मनाला आणि विचारांना बाजूस ठेवून मेंदूची सरळ वर्तमान अवस्थेशि जोडणी करून देते. वर्तमान क्षणाच्या आकलनाने मेंदू सत्याच्या मूळ अवस्थेत येतो.
सत्याच्या असिमित मूळ ऊर्जा अवस्थेची भौतिक पदार्थाने बनलेल्या मेंदूला कधीच प्रत्यय येऊ शकत नाही. सत्य हे स्वतःला गुप्त ठेवीत नाही, त्याच्या मध्ये तशी वृत्ती नसते परंतु भौतिक मानवी मेंदू किंवा त्याने बनविलेली उपकरणे त्या शक्तीचे आकलन करू शकत नाही.
प्रश्न निर्माण होतो की शोधाची सुरुवात करण्याची इच्छा मनात कशी निर्माण होते? स्वतःच्या सांप्रत स्थितीबद्दल असंतोष हे स्वशोधाचे मूळ कारण असते. शोध सुरू करताना सगळे सगळ्यात दूर असणाऱ्या ईश्वराचा शोध सुरू करतात आणि संकल्पनांच्या मायाजालात फसविले जातात. परंतु शोध स्वतःपासून सुरू केला तर एकेक कडी जुळविणे शक्य होते. आपण, आपले जग हे सर्व निसर्गाचा भाग आहे, निसर्ग काल्पनिक नाही, आणि तो एक तथ्य आहे. आणि आपण आत्ता ज्या स्थितीमध्ये आहोत ते सुद्धा तथ्य आहे. तथ्यापासून सुरुवात करता येते. जे काही आत्ता वर्तमान आहे ते कालातीत आहे.
आत्ता जे वर्तमान आहे त्याचे पृथक्करण, विश्लेषण वगैरे न करता फक्त निरीक्षण करण्यासाठी अतिशय कुशाग्र बुद्धि आणि विनम्र हृदय असणे आवश्यक असते. जर आपण आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीचे निरीक्षण करू शकलो तर आपण स्वतःस समजू लागतो. आपण स्वतःला आपल्या कृतीच्या आरशात पाहु शकतो. आपण काय करीत आहोत, आपल्या काय भावना आहेत, आपण काय विचार करीत आहोत याविषयी आरशात आपण स्वतःला जानु शकतो. जेव्हा पूर्ण लक्ष असते आणि मौन असते तेव्हा शिकणे शक्य होते.
सत्य आपणास दुसरे कोणी सांगू शकत नाही ते आपल्यालाच शोधावे लागते. त्यासाठी प्रत्यक्ष वर्तमानाचे आकलन आवश्यक आहे. जेव्हा मनातील प्रदूषित विचार मध्ये येतात तेव्हा ते प्रत्यक्ष आकलन होत नाही. जेव्हा कोणी पळवाट न काढता, विरोध न करता त्या वर्तमानात राहू शकतो तेव्हा ती अवस्था सत्याकडे निर्देश करते, त्याला तो निर्देश आकळला तर त्याच्यात क्रांती होते.



