Thursday, March 11, 2021

सत्याचे आकलन कसे होते?

कृष्णमूर्ती: आपण वास्तव जगात जगत असतो. वास्तव जग म्हणजे विचारांच्या संकल्पनेतून साकारलेले जग. विचार कधी बरोबर असतील किंवा कधी चुकीचे असतील. वास्तव जगात वावरत असताना त्यातील विषमता, हिंसा, भ्रष्टाचार, धर्मांधता, सत्त्तालोलुपता, व्यभिचार, दुःख पाहून त्या जीवनातील विफलता लक्षात येवू लागते. वास्तव जीवनातील विकृती लक्षात येणे हे विवेक बुद्धिमत्तेचे कार्य असते. वास्तवातील विकृती लक्षात येणे म्हणजे जीवनातील तथ्ये ओळखू येणे होय आणि द्रष्टा आणि दृश्य म्हणजे काय आणि ते दोन्ही एकच कसे आहेत हे लक्षात येणे, ते सर्वंकष आकलन हेच सत्य होय.

डेव्हिड बोहम: आपण थोडी घाई करीत आहो असे वाटते. वास्तवातील विकृती पाहिल्यामुळे द्रष्टा आणि दृश्य एक आहेत हे लगेच आकलन होत नाही.

कृष्णमूर्ती: बरोबर, मी घाई केली, होय. आपण विकृती कशी बघतो? विकृती पाहणे ही एक तर्कसंगत प्रक्रिया आहे काय?

डेव्हिड बोहम: नाही, ते त्वरित, वेळेशिवाय होते.

कृष्णमूर्ती: होय, वेळेशिवाय होते 

डेव्हिड बोहम: कदाचित आपण यावर हळू हळू पुढे जावे कारण कधीकधी एखाद्याला असे दिसते की ते एका फ्लॅशमध्ये होते, तर काहीवेळा ते इतके हळू समजते की ते केव्हा होते हे आपल्याला ठाऊक नसते.  असे दिसते की हे दोन्ही सत्याला अनुभवण्याच्या वेगवेगळ्या वाटा आहेत.

कृष्णमूर्ती: सत्य हे हळूहळू समजू शकते काय? विकृती पाहणे म्हणजे विकृती मधून तत्क्षणी बाहेर येण्यासारखे आहे, ते एकदम होईल, हळूहळू कसे होईल? 

डेव्हिड बोहम: नाही, हळूहळू होणार नाही, परंतु मला असे वाटते की आपण ‘फ्लॅशमध्ये’ म्हणाल तर तुम्ही तिथे काळ आणता की नाही?

कृष्णमूर्ती: नक्कीच.

डेव्हिड बोहम: अचानक म्हणालो तरी आपण काळ आणतो. आपण हळूहळू असे म्हणाल्यास परत काळ येतोच. आपण दोन्हीही म्हणू शकत नाही. एखादा विकृति पाहिल, परंतु तो अजूनही त्यापासून मुक्त नसल्याचे त्यांना आढळेल आणि म्हणूनच काळ मध्ये येतो.

कृष्णमूर्ती: मग त्याने सत्य पाहिलेच नाही. जर मी ते असत्य, विकृत जीवन पाहिले आणि तरीही त्यातून मुक्त होत नसेन तर मी सत्य पाहिले नाही असा त्याचा अर्थ होतो.

डेव्हिड बोम: होय. त्याने ते यथार्थपणे पाहिले नाही.

कृष्णमूर्ती: आणि सत्य पाहणे म्हणजे यथार्थ पाहणे होय.

डेव्हिड बोहम: पाहणे यथार्थ हवे, खोलवर हवे, परंतु मला वाटते की या मुद्द्यावर फार सावधगिरीने कार्य करणे आवश्यक आहे, कारण सामान्यत: काय होते की एखाद्याने पाहिले तर संपूर्ण दिसत नाही आणि मग तो तुम्हाला विचारेल, 'मला वास्तवातील विकृत रूप दिसते, परंतु तरीही ते सोडता येत नाही. मी कसे त्याच्याकडे पाहू शकेन म्हणजे ते सुटू शकेल? अशा परिस्थितीत मी काय करावे?'


क्रमशः...

No comments: