संकल्प विकल्प रहित होवून जगणे शक्य आहे काय?
समाजात ज्ञानी व्यक्तीचा आदर राखला जातो. त्या ज्ञानी व्यक्तीचे अंतर्बाह्य जीवन काय आहे याची खातरजमा न करता केवळ तो किती शिताफीने पोपटपंची करीत असतो याकडे लोकांचे लक्ष असते. धर्मग्रंथांचे पाठांतरे करून त्यातील उतारे फेकून समाजाला बेवकुफ बनविता येते. साजेसा पोशाख घातला की महाराज सुद्धा सहज बनता येते. अशा तथाकथित ज्ञानी व्यक्ती केवळ पोथी पुराणे वाचून पुराणिक झालेले असतात त्यांना स्वतःचे यथार्थ ज्ञान झालेले नसते. स्वयं साक्षात्कार झालेला नसताना केवळ जुने ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करणे, नवीन ग्रंथ लिहिणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला गेल्यामुळे समाजात अज्ञान पसरत असते. अज्ञानी त्यांच्या अज्ञानाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करण्यासाठी अज्ञान विकत असतात. अशा गोष्टी-वेल्हाळ व्यक्तीला ज्ञानी समजले गेल्याने समाज भरकटला जातो. समाजाचे भले करण्याच्या नादात आपण समाजाचे किती नुकसान करीत आहोत याचे कोणालाही भान राहत नाही. धार्मिक, अध्यात्मिक कल्पना अशा अज्ञानी व्यक्तींच्या अपप्रचाराने वृद्धिंगत होत असतात आणि कसलाही प्रचार प्रसार न करणारे खरे ज्ञानी आणि खरे ज्ञान झाकोळले जाते. सत्य म्हणजे काहीच नसणे होय आणि काहीच नसणे याचा प्रचार करता येत नाही. यामुळे जे अज्ञान असते ते समाजात बोकाळले जाते.
कोणत्याही धार्मिक - अध्यात्मिक - सामाजिक संकल्पना शिवाय जगता येवू शकेल काय? समाजात अगोदरच रीती रिवाजांच्या असंख्य संकल्पना रुजलेल्या असतात. संकल्पना नुसार समाज कृती करीत असतो.
आत्ताच्या वर्तमानात जगायचे असेल तर फक्त आत्ताच्या क्षणाच्या गरजेनुसार त्या क्षणाची कृती असायला हवी. तेव्हाच आपण संकल्पना रहित जीवन जगू शकतो. यासाठी आत्ताच्या क्षणाशी सतत सावधान आणि जागरूक असायला हवे. आपण आणि आपल्या कल्पना यांचे द्वैत नसले की विसंवाद उत्पन्न होत नाही. जेथे विसंवाद असतो तेथे प्रयत्न करावे लागतात. नदीच्या प्रवाह सारखा जीवन प्रवाह असतो त्या प्रवाह बरोबर सहज जगता येते. परंतु जीवन प्रवाह विरुद्ध जगताना त्रास, दुःख सहन करावे लागतात. म्हणजे आपले जीवन खडतर का असते तर आपण मानसिक कल्पनासाठी कृती करीत असतो आणि ते जीवन प्रवाहाशी विसंगत असते.
जीवन प्रवाह बरोबर प्रवास करता येत नाही याचे कारण आपण आपल्या कल्पनांचे हवेत पुल बांधून त्यावरून जात असतो. प्रवाह आणि पुल दोघे सहसा एकमेकांना भेटत नाहीत. जीवन प्रवाह समजण्यासाठी एकतर कल्पनांचे पुल कोसळायला हवेत किंवा प्रवाहात महापूर यायला हवा. यासाठी महापुरुष जीवनात दुःख मागतात.
जीवन जगण्यासाठी सतत कृती आणि कार्य करीत राहावे लागते. कार्य करताना ते जीवनाशी विसंगत असेल तर ते योग्य कार्य नसते. विसंगती निर्माण करणारे मानसिक, काल्पनिक कार्य हे आपल्या मी पणाच्या अज्ञानातून निर्माण होत असतात. मी चे अज्ञान आपणास स्वतः शोधावे लागते. ते दुसऱ्याकडून शिकता येत नाही. मी म्हणजे स्मृतींचा प्रतिसाद असतो, तो भूतकाळात असतो. तो कधीच वर्तमानकाळ अनुभवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सर्व कल्पना ह्या भूतकाळातील असतात. याचे ज्ञान झाले तरच आपण मी शिवाय, मी पणाच्या कल्पना शिवाय जगू शकतो. मी सोडून जे इतर अनंत जीवन आहे त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. त्या अनंत जीवनाच्या ऊर्जेच्या संपर्कात असताना जे सहज कार्य होते ती योग्य कृती असते, ती योग्य कृती जीवनाशी विसंगत नसते, आणि सहज होत असल्याने प्रयत्नांची आवश्यकता नसते. प्रयत्न आणि विसंगती यांच्या संघर्षामध्ये, त्यांच्या सततच्या विचाराने मेंदू थकला जातो. व्यक्तीचे वय लहान असले तरी जुनाट विचाराने ते वयस्कर वाटतात.
जीवन जगण्याची ही सहज वृत्ती नसेल तर मनुष्य जीवन जगत नसतो तर तो त्याच्या मनाने बनविलेल्या कल्पनांचा पाठलाग करीत असतो. मी आणि त्याच्या संकल्पनांचे जीवन अतिशय संकुचीत असते त्या उलट त्यांच्या शिवायचे जीवन अनंत ऊर्जेने भारलेले असते. त्या अनंत जीवनाची सर मानवी शब्दात पकडता येत नाही.
The Collected Works of J. Krishnamurti -Volume XIV 1963-1964: The New Mind
(October 25, 1964.)






