ध्यान कसे करावे? ध्यान करताना सुद्धा विचार थांबत नाहीत, मग विचारशून्य अवस्था कशी प्राप्त करावी?
विचारशून्य अवस्था म्हणजे अजिबात विचार नसणे असे समजले जाते. त्या ऐवजी ते अनावश्यक विचार नसणारी अवस्था असे समजावे.
विचार नाहीत हे कोणास समजते? विचारांना. विचार नसतील तर ते समजू शकत नाही. आपण विचारपूर्वक जे विचार करतो तेच आपणास समजतात. इतरवेळी आपला मेंदू जे काही विचार करीत असतो ते सजग विचारांना समजत नाही. आणि त्याही पलिकडील अशी निर्विचार अवस्था असते तिचा आपणास पत्ता लागू शकतं नाही.
जीवन जगण्यासाठी विचार आवश्यक आहेत, त्याला आपण जीवनावश्यक विचार म्हणुया. परंतु इतर असंख्य अवांतर विचार आहेत त्यामुळे मेंदू वर प्रचंड ताण येतो ते अनावश्यक विचार काढणे आवश्यक ठरते.
विचारशून्य होण्यासाठी ध्यान साधना करताना सुद्धा विचार येतात. ध्यान करताना आपण येणाऱ्या विचारांकडे लक्ष ठेवून त्या वेळी आपण थोडेफार विचार कमी करू शकतो. जसे लहान मुलांवर लक्ष ठेवले की तेव्हढा वेळ मुले अवखळपणा कमी करतात. तसे ध्यान करताना जे विचार येतात ते कोठून येतात, कोण विचार करीत आहे, थोडा वेळ शांत बसता येत नाही काय? असे प्रश्न विचारीत राहिलो की विचारांवर त्या वेळी काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. विचारांवर लक्ष ठेवणे याला ध्यान समजले जाते. मंत्र म्हणणे सुद्धा विचार आहे. श्वासावर लक्ष दिले तर श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा नैसर्गिक नाद तयार होतो, त्याला संप्रदायीक मंत्र बनविला गेला आहे.
सतत विचार करणे हा मनाचा स्थायी स्वभाव आहे (default mode of mind). त्या सततच्या विचारांना शक्य होईल तसे अटकाव करणे (धारणा / धरण) आपणास सहज शक्य आहे.
ध्यान केले अथवा नाही केले तरी दिवसभर आपण जे काही कार्य करीत असतो त्यावेळी फक्त त्या कृतीचा विचार करावा. त्या वेळी इतर विचार येवू देवू नये. याला निरपेक्ष सजगता असे म्हटले जाते.
जीवनावश्यक विचार आले तरी चालतील परंतु अनावश्यक विचार येवू न देण्यासाठी आपण आपल्या अनावश्यक सवयी बंद करायला हव्यात. अनावश्यक सवयी आपणास अनावश्यक विचार करण्यास भाग पाडतात.
जसे की राजकारण, समाजकारण, टीव्ही, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, शेजाऱ्यांच्या कुचाळक्या आदि विषय बंद केले तर किती प्रमाणात आपण विचार कमी करू शकतो. तेव्हढा बोजा आपण मेंदूचा कमी करीत असतो.
एकदा वरील अवांतर विषय कमी झाले की आपण आपल्या कुटुंबात, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामध्ये नसल्या सारखे राहू शकतो (संन्यास). विचार अजून कमी होतील, मेंदूचा बोजा अजून कमी होईल.
या नंतर देव, देश, धर्म, जात, संप्रदाय, गुरु, ग्रंथ आदि सर्व संकल्पना जर सोडता आल्या तर विचार अजून कमी होतील, मेंदू अधिक मोकळा होईल (वानप्रस्थ).
वरील सर्व गोष्टी आणि इतर अनेक गोष्टी आपण स्वतः पकडून ठेवल्या आहेत आणि तरीही thoughtless, peaceful होण्यासाठी परत साधना कोणत्या कराव्यात, कशा कराव्यात याच्या विचारांची भर टाकतो. मनाचा हा चतुरपणा सहसा लक्षात येत नाही.
आपला मी म्हणजे आपला पूर्व माहिती संग्रह, सर्व संकल्पना त्या बाबतचे सर्व विचार आहेत आणि त्या सर्व विचारांचा प्रतिनिधी असलेला मी हा विचारांपासून वेगळा होवू शकत नाही.
वरील सर्व गोष्टी टाळता येत नसतील, बंद करता येत नसतील तर आपण फक्त जीवनावश्यक काय आहे आणि अनावश्यक - अवांतर काय आहे याचा शोध घ्यावा. मी म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घ्यावा.
आपला नशिला मी तसे करू देत नाही. नशा सुरू करता येतात पण बंद करणे मी ला जमत नाही. नशा सोडणे जितके अवघड आहे तितके मी पण सोडणे अवघड आहे, परंतु अशक्य नक्कीच नाही. जो जीव ते सोडल्या नंतरचे हलाहल अवस्थेचे प्राशन करतो तोच शिव होतो.

No comments:
Post a Comment