Sunday, March 31, 2024

अज्ञान आणि स्वार्थ हे एकच आहेत

स्वार्थ म्हणजे स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करणे. मी आणि माझे हितसंबंध यांची जपणूक करणे म्हणजेच स्वार्थ होय. 

मानवाच्या गरजेपेक्षा जास्त संसाधने पृथ्वीवर उपलब्ध असताना मानव प्राणी अती स्वार्थी का बनला गेला असेल? 

सजीवांची उत्क्रांती हि एक पेशिय जीव ते अनेक पेशीय जीव अशी होत गेली आहे. ज्या पेशीमध्ये विचार करणारे किंवा निर्णय घेणारे मेंदू किंवा मज्जासंस्था सारखे अवयव नाहीत त्या पेशी सुद्धा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी इतर पेशिंबरोबर सहयोग करीत असतात. 

‘स्वतः इतरांशी सहकार्य करीत जगणे आणि स्वतःचा विस्तार करणे’ या उद्देशानेच निसर्गात वैविध्य निर्मिती शक्य झाली आहे. अन्न सोडून इतर कारणासाठी सजीव स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतर सजीवांची हत्या करत नाहीत. स्वतः बरोबर इतरांनी सुद्धा जगावे हा सृष्टी नियम सर्व सजीवांच्या ठायी दिसत असतो. 

नवीन संशोधनानुसार मनुष्य प्राणी सुद्धा आदिम काळापासून ते अलीकडच्या १० हजार वर्षा पर्यंत इतर मनुष्याची विनाकारण हत्या करीत नव्हता. (The Dawn of everything - new human history).

पशु पालन आणि शेतीचा शोध लावल्या नंतर मालमत्ता आणि संपत्ती निर्माण होऊ लागली. आपली संपत्ती आपल्याच संततीस मिळावी या उद्देशाने विवाह संस्था सुरू झाल्या. कुटुंबीय, भाऊबंद आणि नातेवाईक यांच्या वस्ती निर्माण झाल्या. वस्तीमधील लोकांनी काय करावे आणि काय करू नये यांचे नियम ठरले जाऊ लागले आणि त्याच्या नियमनासाठी वरिष्ठ पंच कार्य करू लागले. वस्तीचे नियम भंग करणाऱ्यांना वस्तीच्या वेशी बाहेर काढले जात असे. वेशी बाहेरील पुरुषाला वैश्य आणि स्त्रियांना वेश्या म्हटले जाऊ लागले. वेशी बाहेरील स्त्री पुरुषांनी स्वतःच्या उपजिविकेसाठी व्यापार आणि करमणुकीचे नवीन व्यवसाय सुरू केले. 

पशुपालन, शेती आणि त्यांना पूरक व्यवसाय करणाऱ्या वस्तीच्या आतील कष्टकरी लोकांपेक्षा वेशी बाहेरील वैश्य आणि वेश्या यांची संपत्ती निर्मिती जास्त होऊ लागली. जास्त संपत्तीच्या रक्षणासाठी वैश्य आणि वेश्या यांनी सुरक्षा रक्षकांची फौज तयार केली, त्यांच्या कडे सुद्धा अतिरिक्त संपत्तीचा ओघ सुरू झाला. वस्तीच्या आतील लोकांनी वस्ती बाहेरील लोकांना श्रेष्ठ समजावे यासाठी वस्ती बाहेरील लोकांनी अजून एक पुजारी वर्ग तयार केला. अतिरिक्त सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर वेशी बाहेरील वैश्य, क्षत्रिय, ब्राम्हण हे स्वतःला समाजातील श्रेष्ठ वर्ग समजु लागले तर वेशीच्या आतील कष्टकरी जनता हि सत्ता आणि संपत्तीच्या अभावी शूद्र आणि अतिशूद्र ठरवली गेली. 

मानव समाजातील सत्ता आणि संपत्तीच्या स्पर्धेतून निर्माण झालेली श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रकारची वर्ण व्यवस्था हि वैयक्तिक पातळीवर सुद्धा येऊन ठेपली. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ ठरवली गेली. शूद्र आणि अतिशूद्र, आदिवासी अशी कनिष्ठांची सुद्धा वर्गवारी होत गेली. 

जसे उत्पादक वर्ग हा जास्त संपत्ती साठी वेगवेगळी परंतु खरी उत्पादने सुरू करतात तसे श्रेष्ठ समाजात सुद्धा मग अनेक देव, अनेक संप्रदाय, अनेक देश आणि अनेक धर्म यासारखे उपजिविकेची नवनवीन काल्पनिक साधने तयार केली गेली. शूद्र जनतेने आपले कायमचे गिऱ्हाईक बनून रहाण्यासाठी जीवनावश्यक मालापेक्षा हि मानसिक साधने श्रेष्ठ ठरवली गेली, त्यासाठी त्यांच्या भोवती भ्रामक श्रद्धांचे जाळे निर्माण केले गेले. सर्वांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धा सुरू झाल्या, संघर्ष निर्माण होत गेले आणि त्यासाठी त्यांच्या मध्ये हिंसाचार आणि युद्धे सुरू झाली. श्रेष्ठ वर्गांचे भक्त बनलेले शूद्र अनुयायी हे श्रेष्ठ वर्गांचे हितसंबंध जोपासण्यासाठी मरायला आणि मारायला तयार केले गेले.

गेल्या दहा हजार वर्षांपासून श्रेष्ठ वर्गाच्या सुनियोजित अपप्रचार तंत्राने त्या पूर्वीचे वर्ग आणि वर्ण विरहित समाज व्यवस्थेचे सत्य कायमचे गाडले गेले आहे. या हजारो वर्षातील लाखो पिढ्यांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ वर्गांचे अज्ञान प्रत्येक पेशीत ठासून भरले गेले आहे. हे असत्य आहे याचे आकलन होणे सुद्धा अशक्य झाले आहे. कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर अज्ञानी श्रद्धांनी कलुशित झालेले श्रेष्ठ समाज नेते आणि त्यांचे शूद्र समाज भक्त हे दोघेही त्याचा विरोध करतात, अगदी त्याची हत्या सुद्धा करतात. 

काल्पनिक कथा आणि काव्ये रचणारे, त्या अनुसार शिल्पे आणि वास्तू बनविणारे, त्यांची नाटके आणि सिनेमे बनविणारे मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकार मंडळी हे वेशी बाहेर काढलेल्या वेशेचे वारसदार आहेत. श्रेष्ठ वर्गाच्या अपप्रचार तंत्राला यांनी सदैव मोलाची साथ दिलेली आहे. 

मानवी अज्ञान आणि त्याबरोबर स्वार्थ हा पराकोटीला पोहोचण्याचे महत्वाचे कारण म्हणजे जे असत्य आहे त्याला श्रेष्ठ (ब्रम्ह) ठरविले गेले आहे आणि जे सत्य आहे त्याला शूद्र (मिथ्या) ठरविले गेले आहे.

मी म्हणजे आत्मा आहे आणि तोच ब्रम्ह आहे या भ्रामक समजुतीमुळे “मी म्हणजे स्मृती मध्ये साठविलेल्या अनुभवांचा प्रतिसाद आहे” हे साधे तथ्य कोणाच्याही लक्षात येत नाही. मी नेमका कोण आहे हे माहिती नसल्यामुळे, मी याच्या अज्ञानामुळे आपण सर्वजण चुकीचे निर्णय घेत राहतो, जीवनाचा चुकीचा अर्थ लावीत राहतो.

Friday, March 15, 2024

सत्य हे आस्तिक आणि नास्तिक या दोघांच्या पलीकडे असते

सत्य हे आस्तिक आणि नास्तिक यांच्या विचारांच्या पलीकडे असते काय?

एखादी व्यक्ती ही आस्तिक किंवा नास्तिक असते ते त्याच्या विचारांच्या आधारावर. विचार म्हणजेच मन असते. मन हे वास्तविक नसून भ्रामक असते. म्हणजे भ्रामक मनाच्या विचारातून आस्तिक आणि नास्तिक विचार निर्माण होत असतात, म्हणजे दोन्हीही भ्रामक असणार. 

मग सत्य काय असावे? 

सजीवांचे शरीर हे त्यांचे वास्तविक अस्तित्व असते. शरीराचे हे वास्तविक Hardware चालविण्यासाठी मन नावाच्या Software ची आवश्यकता असते. विचारांच्या मालिका म्हणजे मन असते. विचार म्हणजे आपल्या शरीराच्या पाच ज्ञानिंद्रियास येणाऱ्या अनुभवांच्या प्रतिक्रिया असतात. प्रतिक्रिया म्हणजे ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांची स्मृती मधील आठवणी होत. 

स्मृती मधून येणाऱ्या असंख्य विचारामधील एक विचार स्वताला मी असे समजतो आणि तो मी इतर विचारांचा नेता बनतो. जसे समुहांचा नेता हा त्या समूहाचा भाग असतो तसेच मी हा सुद्धा विचारच असतो.  या आकलनाच्या अज्ञानातून मी म्हणजे आत्मा असे पारंपरिक शास्त्रात सांगितले गेले आहे. आत्मा ही कल्पना आहे हे कळले तर आपोआप परमात्मा सुद्धा कल्पना आहे याचे आकलन होते. 

समूहाचा नेता इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. स्वतःची नेतेगिरी दीर्घकाळ चालावी असे त्याला नेहमी वाटत असते. त्यासाठी तो नवनवीन कल्पना लढवीत राहतो. अगदी तसेच आपल्या मी या विचाराचे असते. मी हा सुद्धा स्मृती मधून उठणाऱ्या असंख्य विचाररूपी प्रतिक्रियांचा प्रतिनिधी असतो. त्याला अखंड अस्तित्व हवे असते. तो इतर विचारांना आपल्या पेक्षा वेगळे समजत असतो. 

मुळात विचारांना शरिरासारखे अस्तित्व नसते, ते फक्त मानसिक विचार असतात म्हणून विचारांना भ्रामक समजले जाते. 

मी नामक विचार आणि इतर विचार अशी या भ्रामक अस्तित्वात भ्रामक विभाजनी होत असते. या विभागणी मधून सगळे द्वैत निर्माण झाले आहेत. जेथे दोन असतात तेथे स्वार्थ असतो, संघर्ष असतो, दुःख असते. 

प्रत्येक जीवाचे शरीर हे वास्तविक आहे परंतु जीवनावश्यक गरजा पूर्तता करण्यासाठी भ्रामक मन निर्माण झाले आहे. भ्रामक मन हे त्याच्या श्रेष्ठत्व आणि स्वार्थ यासाठी divide and rule नियमाचा वापर करत असते. स्वतःच्या श्रेष्ठत्व आणि स्वार्थ यासाठी तो इतरांचे शोषण करीत असतो. 

मी पणाच्या या स्वार्थी वागणुकीचा परिणाम म्हणून समाजात अनेक देव, अनेक धर्म, अनेक देश, अनेक जाती, अनेक कुटुंबे अशी विभागणी होत राहते आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होत राहतो. या मानसिक विभागणी मधून प्रत्यक्ष संघर्ष होत असतो आणि यामधून दुःख निर्माण होत असते. 

मन म्हणजे त्याच्या पूर्व अनुभवांचे गाठोडे होय. या गाठोड्यात कुटुंब, समाज, देव, देश, धर्म या सर्व मानसिक संकल्पनांची सामग्री ठासून भरलेली असते. 

जेव्हा एखाद्याच्या लक्षात हे सत्य येते  त्या क्षणी त्याच्या मनाची मानसिक सामग्री नाहीशी होते, त्याचे मन पूर्ण रिते होते. तो शून्य अवस्थेत स्थित होतो. जीवनावश्यक गरजा साठी विचार येतात परंतु अनावश्यक कल्पनांचे विचार शुण्यता येते. 

मनाची काल्पनिक सामग्री नसेल तर मन असेल काय? जीवनातील विभागणी असेल काय? जीवनात दुःख असेल काय?

मानसिक सामग्रीचे नाहीसे होणे म्हणजे, मनापासूनची मुक्ती होय, मानसिक मी याच्या अस्तित्वाचा मृत्यू होय. या नंतरचे जीवन हे सत्य जीवन असते, त्याची कल्पना करता येत नाही, ते क्षणोक्षणी नित्य नूतन ताजे तवाने असे असते. 

ज्या जीवनात भूतकाळातील मानसिक स्मृतींचा आणि संकल्पनांचा लवलेश नसतो ते जीवन हेच सत्य जीवन असते, तेच सत्य असते.