Wednesday, August 18, 2021

श्रद्धा आणि त्यांची हुकूमशाही

 


आपण आपल्या घरातील तसेच समाजातील वडीलधारी मंडळींचा आदर, मान सन्मान ठेवत असतो. आपण कुटुंब प्रमुख किंवा समाजातील नेत्यांचा आदर करीत असतो, प्रसंगी त्यांचे आदेश मानत असतो. समाजाचे संरक्षण करणारे नियम आणि त्या नियमांच्या अमलबजावणीसाठी असणाऱ्या यंत्रणेचा सुद्धा आपण आदर करीत असतो. शाळा कॉलेज मधील शिक्षक आपले आदरणीय असतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण वरिष्ठ आणि ग्राहक यांचा आदर ठेवीत असतो. 

आपण सर्वजण भौतिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असतो. तसेच कुटुंब किंवा समाजात राहताना एकमेकांचा आदर राखला तर सौहार्द पूर्वक राहता येते. हे आपल्या सर्वांच्या गरजेचे असते त्यामुळे आपण एकमेकांचा आदर करीत असतो. शेजारी एखादा उगाच दादागिरी करू लागला तर आपण ते सहन करीत नाही. तसेच लोकशाही देशात हुकूमशहा टिकत नाहीत त्यांना जावेच लागते. कितीही मोठा अधिकारी असला आणि जर तो आपल्या हितसंबंधांच्या विरुद्ध जात असेल तर आपण त्याला नाकारतो.

लहान मुले मोठ्यांचा संसार पहात त्याचे भातुकलीच्या खेळात ते रूपांतरण करीत असतात. अगदी तसेच भौतिक जगातील जे काही वास्तव असते त्याचे आपले मन त्याच्या मानसिक जगात, मानसिक कल्पनांच्या रुपात रूपांतरण करीत असते. मनाने देव, देश, धर्म आणि त्यांचे गुरू यांच्या मानसिक कल्पना बनविल्या आहेत. ते मानसिक आहेत कारण प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या असण्या नसण्याचा काही फरक पडत नसतो. मनाने त्यांची मानसिक भीती तयार केली आणि त्यावर मानसिक उपचार करण्यासाठी, मानसिक सुरक्षेसाठी गुरूंचा अधिकार निर्माण केला. प्रत्यक्षात कसलाच कशाला आधार नसताना मन अधिकाधिक मानसिक कल्पना तयार करीत राहते आणि मग स्वतःला त्यांचा त्रास होवू नये म्हणून मग मानसिक आधार शोधते. आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींचा ते गुरु म्हणून अधिकार मान्य करते आणि त्यांच्या पूर्ण आहारी जाते. अनेकदा आपल्या भौतिक गरजा आणि जबाबदाऱ्या टाळून गुरु आणि त्यांच्या आश्रमात अहोरात्र राबत राहतात.  धार्मिक किंवा अध्यात्मिक गुरू हे त्या अर्थाने हुकूमशहा असतात. समाजाच्या नियमापेक्षा त्यांना वैयक्तिक जे हवे असते तेच नियम ते इतरांवर लादतात आणि त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करतात. त्यांचे ईश्वरी शक्तीशी संबंध आहेत असे ते थापा मारीत असतात आणि आपण ते खुशाल मान्य करीत असतो. राजकारणात एखादा नेता थापा मारत असला तर ते आपणास कळते कारण त्याच्यावर सतत माध्यमांची नजर असते. परंतु श्रद्धेच्या आणि परंपरेच्या आड धर्मात आणि आश्रमात सहसा इतर डोकावत नाहीत. आणि त्यांच्या वरील अंधश्रद्धा मुळे आपणास त्यांचे खरे सत्य समजत नाही.

कुटुंबात आणि समाजात आपणास  स्वातंत्र्य हवे असते परंतु श्रद्धेच्या ठिकाणी आपण आपली अक्कल गहाण टाकतो आणि आपले स्वातंत्र्य आपण त्यांच्या हवाली करतो. पाच दहा टक्के लोक अनुभव घेवून त्यांच्या पासून लांब राहतात परंतु त्यांना नित्य नवे बकरे मिळत राहतात. दहा जुने बकरे सोडून गेले तरी शेकडो नवीन बकऱ्यांची waiting list तयार असते. 

ज्या समाजात धर्म आणि धर्मगुरू यांचे प्राबल्य जास्त आहे तो समाज आपली अधिक चांगली भौतिक प्रगती करू शकत नाही. धर्माच्या नावाखाली भारत पाकिस्तान वेगळे झाले. पाकिस्तान तेव्हाच मुस्लिम राष्ट्र झाले, कालांतराने का होईना भारताचे सुद्धा हिंदू राष्ट्र होत आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान येत आहे. 

हे सर्व घडत आहेत केवळ आणि केवळ मानसिक कल्पनांमुळे. अत्याधुनिक मानव प्राणी सुद्धा अजूनही त्याच्या मानसिक विश्वात जगत आहे. देव, देश, धर्म यांच्या सारख्या मानसिक संकल्पना जो पर्यंत समाजात विद्यमान आहेत तो पर्यंत समाजाला सत्य समजणार नाही. सत्य साक्षात्कार अभावी समाज सुजाण होवू शकत नाही आणि तोपर्यंत त्या समाजाचा घटक असलेल्या प्रत्येक मानव प्राण्यास दुःखात जीवन कंठीत राहावे लागणार. 

Why is it that we accept authority? In a democratic world, politically we shun any dictator. But religiously they are all dictators. Why do we accept it? Why do we accept the priest as an intermediary to something which he says he knows? So we stop reasoning. Politically we reason; we see how important it is to be free – free speech, everything free, as much as possible – but we never think freedom is necessary here. Spiritually we don’t feel the necessity of freedom, and therefore we accept any Tom, Dick or Harry, which is horrifying.

J Krishnamurti in Dialogue with Allan W. Anderson in San Diego, 27 February 1974