Tuesday, June 22, 2021

भिती

 


भिती कशी तयार होते आणि ती कशी नाहीशी करावी?

मानव प्राणी हा सतत भीती खाली वावरत असतो. मृत्यू, आजार, वृद्धत्व, अपघात, एकटेपणा, अंधार, आपण कोणीच नसण्याची भीती, नोकरी - व्यवसायात मोठे यश न मिळण्याची भीती, नेता नसण्याची भीती अशा वेगवेगळ्या गोष्टींची भीती आपणास सतावत असते. 

अनेकांना भीतीची जाणीव असते तर काही जण आपला न्यूनगंड लपविण्यासाठी आपण खरे कोण आहोत, आपणास कशाची भीती आहे याचा विचारच करीत नाही. या गोष्टी त्यांच्या जाणिवेत सुद्धा नसतात. आणि जर अशा गोष्टी लपविलेल्या असतील तर त्या उघड कशा होणार? 

भीतीची संपूर्ण रचना आकलन करून घेणे अगत्याचे आहे, केवळ २-३ मिनिटे ऐकून नंतर ते विसरून जाण्यासारखे नाही. 

भीतीचे मूळ सापडले तर तिच्या विविध प्रकारावर उपचार करण्याचा वेळ आणि श्रम वाचविता येतील. 

भीतीचे द्रष्टा आणि दृष्य एक आहेत या द्वारे अवलोकन केले तर भीतीचा समूळ उच्चाटन करता येणे सहज शक्य आहे. 

उदाहरणादाखल आपण एकाकीपण मधून निर्माण होणाऱ्या भीतीचे अवलोकन करू यात. एकाकीपणा हे वास्तविक आहे की ती एक कल्पना आहे. एखादी व्यक्ती खरीच एकटी असते तर दुसरी व्यक्ती गर्दीमध्ये असून सुद्धा स्वतःला एकटी समजते. दोघांना त्या एकटेपणाची भीती वाटत असते. भिती खरी आहे की भीतीची केवळ कल्पना केलेली आहे याचा आपण विचार केलेला असतो काय? कारण बऱ्याचदा भीती ही केवळ मानसिक असते. 

समजा आपली एकटेपणाची भीती हि कल्पना नसून वास्तविक आहे तर एकटेपणा म्हणजे नेमके काय? 

एकटेपणाची भीती निर्माण होण्यास आपली स्वकेंद्रित वृत्ती, केवळ स्वतःचा विचार करणे, स्वतःचे पुढे पुढे करणे, स्वतःची मते, वैयक्तिक स्वप्ने, दृष्टिकोन, मानमरातब, महत्त्व स्वतःकडे घेणे आदि कारणीभूत असतात. हे सर्व आपणास अप्रत्यक्षरीत्या एकाकी करत असतात हे आपल्या लक्षात येत नसते. दररोज वर्षानुवर्षे आपण हे करत आलो आहोत आणि अचानक आपल्याला आढळून येते की आपण पूर्णपणे एकटे आहोत. एकटेपणाची तीव्र भावना मधून भीती निर्माण होते. 

भीतीची भावना कोणाला होत असते? आपल्या मी याला. आपला मी आणि आपली भीती हे वेगवेगळे असतात अशी मी याची समजूत झाल्याने मी भीती घालविण्यासाठी प्रयत्न करतो अथवा पलायन करतो. आपला मी आणि आपली भीती यांच्या मधील संबंध जर आपल्या लक्षात आला तर दोघांचे मूळ उलगडू शकते आणि त्या साक्षात्कार मध्ये दोघांचे भ्रम नाहीसे होवू शकतात. 

आपण भीती या अनुभवाचे सूक्ष्म अवलोकन केले तर आपला मी म्हणजे भीती आणि भीती म्हणजे मी हे लक्षात येते, ते दोघे एक असल्यामुळे भीती पासून मी पलायन करू शकत नाही, तो भीती टाळू शकत नाही. मी कोणतीही साधना करून, सत्कर्म करून, गुरूकडे जावून अथवा देवाची प्रार्थना करून भीती पासून वेगळा होवू शकत नाही. मी आणि मी याने बनविलेली भीतीची मानसिक कल्पना हे दोघे एक आहेत, दोघेही काल्पनिक आहेत, दोघेही भ्रम आहेत हे अवलोकन केल्या नंतर लक्षात आले तर? ना मी उरतो आणि ना त्याची भीती उरते.

मी आणि भीती एक कसे असू शकतात?

आपली भीती म्हणजे आपणास भीती विषयक असणारी पूर्व माहिती होय. ही पूर्व माहिती आपल्या मेंदूच्या स्मृतीमध्ये वर्षानुवर्षे साठवीलेली असते. म्हणजे भीती हि एक प्रकारे स्मृती मधील केवळ माहिती होय. आपला मी हा या स्मृतींचा प्रतिनिधी असतो, स्मृतींचा प्रतिसाद असतो, तो स्मृती मध्येच तयार होत असतो, म्हणून मी सुद्धा स्मृतींचा एक भाग आहे. भिती आणि मी हे दोघे स्मृतींचा भाग आहेत म्हणजे ते दोघे एक आहेत. 

मी आणि मीची भीती हे वेगवेगळे नसून एकच आहेत, ते दोन्ही स्मृती आहेत, ते भूतकालीन आहेत याचे यथार्थ आकलन झाले तर आपण मी आणि त्याची भीती या द्वैत भावने मधून मुक्त होतो. मी आणि मिची भीती हे एकच आहेत याच्या आकलनामधून आपण दोघांचा होणारा संघर्ष टाळू शकतो, भीतीच्या समग्र भावनांचे उच्चाटन करू शकतो. 

एकाकीपणाच्या एका भीतीद्वारे आपण समग्र भीतीची मध्यवर्ती वस्तुस्थिती पाहू शकलो. भिती ही मी पणाच्या अस्तित्वामुळे आहे. मी आहे म्हणून मी याच्या भीती सारख्या अनेक संकल्पना आहेत. मी पणाची भावना नसेल तर भीती सारख्या भावना नसतील. 

आपण आपल्या शिक्षण, संस्कार यातून मीपणा जतन करीत असतो. मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, मी अमका आहे, मी तमका आहे यातून आपण मी पणाचे संगोपन करीत राहतो. 

आपण “मी” शिवाय या मी च्याच जगात राहू शकतो काय? जेव्हा आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर “मी” चा शिक्का असतो : संस्कृती, सभ्यता, कला, व्यवसाय, राजकारण, धर्म, आपल्या सभोवतालच्या या प्रत्येक गोष्टीद्वारे आपणास सतत ठामपणे सांगितले जाते की, ‘मी व्हा’ - ‘मी’ वाढवा. अशा मानवी संस्कृतीत किंवा सभ्यतेत ‘मी’ शिवाय कोणी जगू शकेल काय? अध्यात्मिक म्हणतात की ते शक्य नाही, म्हणून ते जगापासून दूर पळतात, मठात राहतात, आपले नाव बदलतात, ते आपले जीवन अज्ञातास समर्पित करतात. परंतु “मी” अजूनही तेथे आहे कारण “मी” आणि ईश्वर यांच्या प्रतिमेसह मी स्वतःची ओळख जिवंत ठेवतो. “मी” वेगळ्या अध्यात्मिक रूपात अजूनही जिवंत राहतो.

तर मग एखादी व्यक्ती मी” शिवाय जगू शकते काय? - कृपया, हा एक अत्यंत महत्वाचा आणि अतिशय गंभीर प्रश्न आहे, हे केवळ एक चर्चेची गोष्टच नाही - या राक्षसी जगात कोणीही “मी” शिवाय जगू शकेल का? म्हणजेच वेडेपणाच्या जगात एखादा शहाणा माणूस जगू शकतो का? आस्तिक, श्रद्धाळू आणि धार्मिक जगात सर्व वेडे आहेत. तुम्हाला जे काही घडत आहे ते माहित आहे, मी तुम्हाला ते सांगत बसत नाही. 

 https://kfoundation.org/the-root-of-fear





No comments: