Monday, March 15, 2021

प्रेम हे सत्य आहे की वास्तव आहे?


कृष्णमूर्ती: सत्य अवस्थेत प्रेमाचे काय स्थान असावे?

डेव्हिड बोहम: प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे हे समजले नाही.

कृष्णमूर्ती: प्रश्नाचा अर्थ असा आहे की ज्यास आपण प्रेम म्हणतो ते वास्तविकतेच्या क्षेत्रात असते की ते सत्य अवस्थेचा आविष्कार आहे?

डेव्हिड बोहम: मला असे वाटत नाही की ते वास्तवाच्या क्षेत्रात असू शकते.

कृष्णमूर्ती: पण आपण त्याचे अधःपतन केले आहे हे कबूल आहे?

डेव्हिड बोहम: हो, त्यामुळे ते वास्तवाच्या क्षेत्रात कार्य करू शकते.

कृष्णमूर्ती: मग प्रेम आणि सत्य यांच्यात काय संबंध आहे? सत्य हे प्रेम आहे का? ‘प्रेम’ म्हणजे काय, सर?

डेव्हिड बोहम: करुणा, सद्भावना, परोपकार परंतु प्रेमाचा बहुतेक अर्थ विविध प्रकारचे आनंद या सदरात मोडतात.

कृष्णमूर्ति: अगदी बरोबर. मग वास्तविकतेच्या क्षेत्रात आनंद आहे का?

डेव्हिड बोम: होय तो वास्तविक जीवनाचा भाग आहे.

कृष्णमूर्ती: अर्थातच मग वास्तविक आनंदाचा सत्याशी काही संबंध असणार नाही.

कृष्णमूर्ती: मग वास्तवाच्या क्षेत्रात करुणेचा काय संबंध असेल? जर आपण म्हणालो की करुणा म्हणजे प्रेम आणि तेच सत्य ...

डेव्हिड बोहम: करुणा हि सत्याच्या कृतीचा भाग आहे.

कृष्णमूर्ती: बरोबर. मानवी प्रेम हे वास्तवाच्या ठिकाणी असते तर करुणा ही सत्य अवस्थेच्या ठिकाणी असते.  हे समजणे तसे खूप कठीण जाते. ज्यावेळेस एखादा यथार्थपणे पाहतो तेव्हा त्याला कळते आणि ती करुणा असते. 

डेव्हिड बोहम: सत्य हे पूर्ण आणि अविभाज्य ( अद्वैत ) असते. करुणेचा अभाव विभाजनातून (द्वैत) उद्भवू शकतो. जर कोणी निसर्गापासून आणि इतर मानवी समुहा पासून स्वतःला विभक्त समजत असेल तर तो विभाजित असणार त्याला करुणा येणार नाही.

कृष्णमूर्ति: जेव्हा विचारांची प्रक्रिया आपल्या मी मध्ये ‘मी’ आणि ' इतर ' म्हणून चालत असते तेव्हा द्वैताची भावना असते, तेव्हा तेथे प्रेम असते की तेथे करुणा असते?

डेव्हिड बोहम: त्यात वेगळेपण आहे, विभाजन आहे, द्वैत आहे तिथे करुणा नसते.

कृष्णमूर्ती: वास्तविक जीवनात आपण इतरांवर आपल्या स्वार्थासाठी अवलंबून असतो आणि त्यासाठी आपण त्यांच्यावर प्रेम करत असतो. जेव्हा आपला स्वार्थ साधला जात नाही तेव्हा आपले प्रेम सुद्धा समाप्त होते. हा वास्तविक जीवनातील प्रेमा आडचा स्वार्थ ज्याच्या लक्षात येतो त्याच्यासाठी प्रेम हि भावना समाप्त होते. त्यासाठी त्याचे इतर जनावरील अवलंबत्व नाहीसे होते, तेव्हढा तो स्वतंत्र कुवतीचा असावा लागतो याचा अर्थ तो कठोर झाला असे नसते. या बदला नंतर त्याच्या स्वार्थी प्रेमाचे रूपांतरण निस्वार्थी करुणेेत होते. तो कोणावर अवलंबून नसला तरी तो सर्वांवर सारखेच प्रेम करेल.

डेव्हिड बोम: होय. करुणेसाठी तो बदल आवश्यक आहे.

कृष्णमूर्ती: परंतु जोपर्यंत मी इतरांवर अवलंबून आहे तोपर्यंत करुणा निर्माण होत नाही. 

(जोपर्यंत आपण जीवन जगण्याच्या आनंदातून आणि संघर्षातून स्वतंत्र होत नाही तोपर्यंत सत्य आपणास कळत नाही).

डेव्हिड बोहम: जेव्हा आपण इतरांवर अवलंबून असतो तेव्हा आपले ते वास्तविक जीवन असते ज्यात अज्ञान आणि असत्य असते.

कृष्णमूर्ती: नक्कीच. यातून आपण काय सुचवीत आहोत? जो माणूस वास्तवात जगतो आणि त्या क्षेत्रातील असमंजसपणाचे तर्कसंगत निरीक्षण करतो त्याच्यासाठी ते तर्कशुद्ध पाहणे हे सत्य आहे कारण त्यामुळे त्याला त्या क्षेत्रातील संपूर्ण असमंजपणा, विकृती दिसते.

डेव्हिड बोहम: होय, ते सार आहे.

कृष्णमुर्ती: आणि कारण तो तर्कसंगत पाहतो - ते पाहणे म्हणजे कृती करणे होत, तेच सत्य होय. म्हणून तो जरी वास्तवाच्या क्षेत्रात दिसत असला तरी तो सत्यात जगत असतो.

डेव्हिड बोम: होय. जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍यावर अवलंबून असते (गुरु, ग्रंथ, ईश्वर वगैरे) तेव्हा त्या अवस्थेत तो तर्कसंगत, निष्पक्ष पाहण्यात असमर्थ असतो. तो वास्तविक क्षेत्रात त्या क्षेत्राच्या योग्यतेपेक्षा कमालीचे जास्त व्यग्र राहिल्याने तो वास्तविक क्षेत्रास खूपच जास्त महत्त्व देत असतो.

कृष्णमूर्ती: अगदी बरोबर.

डेव्हिड बोहम: आणि म्हणून आपले सर्व जीवन विकृत झाले आहे.

No comments: