Monday, January 28, 2019

मी कोण आहे?


मानवाच्या मुलभुत गरजांचे निरसन झाल्यानंतर म्हणजे त्याचे पोट भरल्या नंतर त्याला तत्वज्ञानात्मक जिज्ञासा ऊत्पन्न होते यालाच शास्त्रामध्ये ब्रम्हजिज्ञासा असे म्हटले आहे.

आपण खरे कोण आहोत? हे विश्व कोणि बनविले आहे? त्याचा आणि आपला काय संबंध असावा? असे प्रश्न पडायला जोपर्यंत सुरुवात होत नाहि तोपर्यंत आपले अध्यात्म सुरू झाले असे म्हणता येत नाहि. ऊपनिषदांचि सुरुवातच मुळि ‘अथातो ब्रम्हजिज्ञासा’ या वाक्याने झाली आहे.

आपणास असे वाटते कि आपणास प्रश्न अगोदर पडतात व नंतर आपण त्यांची ऊत्तरे शोधत असतो. परंतु खरे पाहता ज्यावेळी आपणास हे प्रश्न पडले नव्हते त्यावेळी आपण त्यांच्या ऊत्तरांचि अपेक्षाच केली नव्हती. लहानपणापासून आपण आपल्या मुलभुत गरजांचि ऊकल करत असताना समाजाकडुन हे विशेष ज्ञान आपणाकडे यायला लागते आणि ज्यावेळी आपणाकडे त्याविषयी बरीचशी माहिती जमा होते त्यावेळी आपण तो विषय गांभीर्याने घ्यायला लागतो. याचाच अर्थ प्रथम माहिती गोळा होते व तिची खातरजमा करण्यासाठि वा तिच्या वेगवेगळ्या स्त्रोतांपैकि कोणता स्त्रोत खरा आहे हे जाणुन घेण्यासाठि आपणामध्ये जिज्ञासा ऊत्पन्न होते. बरेचसे चौकशीच्या भानगडीत न पडता सरळ श्रध्दायुक्त मनाने भक्त बनुन मोकळे होतात तर काहि जण हे थोतांड आहे असे समजुन नास्तिक बनतात. बुध्दिमत्तेच्या अभावी एखादा भक्त बनतो तर तर्कांच्या अभावी एखादा नास्तिक बनतो.

निसर्गामध्ये ईतर सर्व पशुपक्षी कामधंदा न करता आपले पोट भरत असतात. मनुष्यासह प्रत्येक जिवाच्या शरीरास स्वतःचे भरणपोषण करण्याचि ऊपजत अक्कल असते. ईतर सजीव व मनुष्य प्राण्यामधिल सर्वात मोठा फरक म्हणजे मनुष्याचि बुध्दिमत्ता होय. ज्ञान ग्रहण व आकलन करून त्याचे भाषेच्या संवाद माध्यमातुन ईतरांना शिकविण्याचि हातोटि फक्त मानव प्राण्याकडे आहे. संवाद, भाषा, ज्ञान, बुध्दिमत्ता यांचा मुळ आधार असते ते आपले मन होय. आपला मेंदु हा मनाला आपल्या शरीरास जोडण्यासाठिचे एक यंत्र आहे. मनाचे अस्तीत्व हे विचारांपासुन निर्माण होते. विचारांच्या अविरत मालीका म्हणजे मन होय, विचारांव्यतीरीक्त मनास अन्य अस्तीत्व नाहि. ज्यावेळी विचार नसतात त्यावेळी मन नसते. विचार करणे बंद होताच आपणास गाढ झोप तरी लागते वा ध्यान करताना समाधि लागते. गाढ झोप व समाधि अवस्थेमध्ये आपणास आपल्या स्वतःच्या अस्तीत्वाचि सुद्धा जाणीव नसते याचाच अर्थ निर्विचार अवस्थेमध्ये मन नसते व त्यावेळि आपणही नसतो. विचार असतात म्हणून मन आहे आणि मन आहे म्हणून ज्याला आपण मी मी म्हणत असतो तो आहे.

निसर्गतः आपले अस्तीत्व हे फक्त शरीरापुरते मर्यादित आहे व शरीराच्या संगोपनार्थ काहि ठराविक विचार असतात परंतु त्या विचारांपेक्षा अधिक वासनायुक्त विचार जेव्हा मनुष्य करू लागतो तेव्हा मन निर्माण होते. या वैषयीक मनापासून विश्वाचा व्यापार सुरू होतो आणि आपलाहि अनावश्यक संसार सुरू होतो.

I think therefore I Am - Descartes

जसे अग्नी, चंद्र, सूर्य यांच्या प्रकाशाच्या मुळाशी त्यांचे तेज आहे तसेच आपल्या मी पणाच्या अस्तित्वाच्या मुळाशी आपले विचार आहेत.

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् |
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् || गिता १५:१२ ||

No comments: