Saturday, January 12, 2019

राजकारण आणि अध्यात्म


सत्ता प्राप्त करणे हे राजकारण्यांचे लक्ष्य असते तर मुक्ति प्राप्त करणे हे अध्यात्मिकांचे लक्ष्य असते.

मुक्ति साठि भक्ति व ज्ञान हे दोन मार्ग शास्त्रात सांगितले आहेत. ज्यांच्या बुध्दिचे वैभव ऊच्च कोटिस गेलेले आहे ते कठोर संन्यस्त ब्रम्हचारी असे ज्ञानी अध्यात्मीक होऊ शकतात व त्यांना निर्गुण निराकार वेदांताचे, ऊपनिषदांचे, गितेचे ज्ञान आकलन होते. त्या मधिल यथार्थ ज्ञानामृताने त्यांच्या मुक्तिचे दरवाजे खुले होतात.

ज्यांचि बुध्दिमत्ता यथातथा आहे असे लोक जास्त भावनीक असतात त्यांना देवादिकांचि, धर्मांचि कर्मकांडे व ऊपासना जास्त आकर्षित करतात. त्यांना यथावकाश निष्काम कर्म व सगुण साकार भक्तिच्या मार्गाद्वारे मुक्तीच्या ऊंबरठ्यावर आणले जाते.

राजकारण वा समाजकारणामध्ये देखील बुध्दिचेच वैभव कार्य करीत असते. ज्यांचि बुध्दिमत्ता ऊच्च कोटिचि आहे अशी लोक निस्वार्थी वृत्तीने मानवतावादी, निधर्मी, समाजहितैषी कार्यामध्ये स्वतःस झोकुन देतात. त्यांच्या ऊत्तुंग चारित्र्यामुळे सत्ता त्यांच्या पायाशी लोटांगण घालत येते.

अल्पमतीचे राज्यकर्ते भावनीक पातळीवर राजकारण करत असतात. देव, देश, धर्म, राष्ट्रीयता, जातपात व त्यांचि प्रतिके यांचा वापर करून ते अल्पमतीच्या जनतेला भुलवीत राहतात.

राष्ट्रपुरूष कोणत्या विचारसरणिंचा आहे यापेक्षा तो समाजमनावर किती प्रभावशाली आहे यावरून सत्तेचे पागडे फिरत राहते.

अध्यात्मिकांना त्यांचे सद्गुरू व भक्तांना त्यांचे महाराज भक्ति मुक्तिचे गाजर दाखवीत असतात त्याचप्रमाणे सामाजिक व राजकिय नेते त्यांच्या अनुयायांना सुराज्याचे स्वप्न दाखवित असतात.

या सर्वांच्या अनुभवामधुन पलीकडे गेल्यानंतर समजते कि जशी मुक्तावस्था अस्तित्वात नाहि तसे सुराज्यहि अस्तित्वात नाहि. आपण एकतर सगळे विसरून जाऊन शांत बसायचे नाहितर फसवले गेल्याचे समजुन शंख करीत रहायचे.

स्वप्नांचा बाजार हा आदि अनादि चालुच राहतो कारण त्यामधिल नवनवीन ऊत्पादने, नवीन विक्रेते व नाविन्याचे हौशी ग्राहक येतच असतात. निसर्गाचे चक्र जोपर्यंत थांबत नाहि तोपर्यंत हा बाजार चालुच राहणार.

No comments: