Thursday, May 27, 2021

नात्यांचे सत्य


आपला मी म्हणजे आपल्या स्मृतींचा प्रतिसाद होय, तो विचारातून व्यक्त होतो, तो भूतकाळ असतो. हे जर व्यवस्थित समजले तर त्यामधून आपणास आपल्या जीवनाचा भाग असणाऱ्या नात्यांचा खरा अर्थ लागू शकतो. 

कोणताही अनुभव येणे म्हणजे त्या अनुभवाच्या संदर्भातील सर्व गोष्टींच्या, घडामोडींच्या, व्यक्तींच्या आपल्या स्मृतिमध्ये साठविल्या गेलेल्या प्रतिमा असतात. आपण प्रथम आपली स्वतःची एक प्रतिमा बनविलेली असते, हीच आपल्या मी ची प्रतिमा असते. आपली ओळख, आपली जायदाद, आपल्या भावना, श्रद्धा, अनुभव, अपेक्षा या सर्वांची मिळून आपली स्मृती मध्ये प्रतिमा बनलेली असते आणि या सर्वांचा प्रतिनिधी हा आपला मी असतो. 

जशी आपण आपली स्वतःची प्रतिमा आपल्या स्मृतिमध्ये बनवलेली असते तशाच असंख्य प्रतिमा आपण इतरांच्या बनविलेल्या असतात. प्रत्यक्षातील एखादी व्यक्ती आणि त्या व्यक्तीची आपण बनविलेली प्रतिमा यामध्ये अंतर असते. आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे इतरांच्या प्रतिमा बनविलेल्या असतात. एखादा आपणाशी चांगला वागत असेल तर त्याची चांगली प्रतिमा आपण बनवितो. तसेच एखाद्याने आपला अपमान केला असेल, धोका दिला असेल तर त्याची आपण वाईट प्रतिमा बनवितो. आपल्या मनामध्ये आपल्या मी ची प्रतिमा आणि इतरांच्या प्रतिमा यांचे पूर्व अनुभवानुसार संबंध बनलेले असतात. प्रतिमा आणि प्रत्यक्ष व्यक्ती हे संपूर्णतः वेगळे असतात. व्यक्ती हे तथ्य असते तर त्या व्यक्तीची आपण बनविलेली प्रतिमा हा भास असतो. 

आपला मी हा एक भास असतो, आभासी मी ने आपल्या मी ची बनविलेली प्रतिमा सुद्धा भास असतो, आपल्या मी ने इतरांच्या बनविलेल्या प्रतिमा सुद्धा भास असतात. या सर्व भासमान प्रतिमांचे एकमेकांशी आभासी संबंध मनामध्ये जुळलेले असतात. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, एकमेकांपासून वेगळी असते. 

आपल्या भासमान मी ला स्वसंरक्षनासाठी, संवर्धनासाठी, मनोरंजनासाठी इतर प्रतिमा हव्या असतात. आपल्या मी ची प्रतिमा त्याच्या इतर प्रतीमांवर त्या प्रमाणे अवलंबून असते. त्यानुरूप आपल्या मी च्या प्रतीमेने इतर प्रतिमांवर विश्वास, श्रद्धा, भरवसा, आपुलकी, मैत्री, प्रेम प्रस्थापित केलेले असते. इतर प्रतीमांनी आपल्या मीच्य प्रतिमेला धोका दिला, विश्वासघात केला, अपमान केला, संबंध तोडले तर आपल्या मी ची प्रतिमा व्यथित होते, दुःखी होते, राग धरते. 

नातेसंबंध असोत अथवा इतर कोणतेही संबंध असोत ते सर्व मानसिक असतात, ते संबंध प्रतिमांचे एकमेकांशी असलेले असतात प्रत्यक्षात कसलेही संबंध नसतात.

मी चा विचार नसेल, मी नसेल, मि ने बनविलेल्या प्रतिमा नसतील तर व्यक्ती व्यक्तींमध्ये राग, लोभ, असूया, क्रोध, स्वार्थ असणार नाही. ज्यावेळेस व्यक्तींना काही कामासाठी एकमेकांची गरज लागेल ती गरज (मनातील कुविचारांच्या अभावी) सहज नैसर्गिक करूणेतून, नैसर्गिक बुद्धीच्या आधारे भागविल्या जातील. 

महाशहरे असोत अथवा मोठमोठे उद्योग असोत जिथे वेगवेगळ्या पार्श्वभूमीची, विना ओळखीची, परकी माणसे एकत्र येतात तरीही सहजीवन व्यतीत करू शकतात. या उलट जवळच्या नात्यात जेव्हा स्वार्थ आडवा येतो तेव्हा संघर्ष उभा राहतो.

Soulmate सुद्धा मानसिक प्रतिमा बनवीत असते. विचारांवर आधारित कोणतेही नाते हे मानसिक असते.