आज बौद्ध पौर्णिमा आहे. नेहमी प्रमाणे संध्याकाळी शेतात फिरत असताना उगवत्या चंद्राचे पूर्ण रूप खूपच विशाल भासत होते. त्याच वेळी एका अध्यात्मिक मित्राचा फोन आला आणि गप्पा सुरू झाल्या.
कोणत्याही मानसिक संकल्पना नसणे म्हणजे पूर्णत्व असते या कृष्णमूर्ती यांच्या लेखावर चर्चा चालू होती. त्यातूनच पुढे मग मी म्हणजे काय, द्रष्टा आणि दृष्य म्हणजे काय आणि ते दोन्ही एक कसे यावर सखोल चर्चा झाली. त्यावेळच्या चर्चेचे शब्दांकन करावे या मित्राच्या आग्रहास्तव खालील चिंतन लिहिले गेले आहे.
अध्यात्मात मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असते. पारंपरिक शास्त्रांनी तो आत्मा आहे असे सांगून ठेवल्याने सर्व साधक आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी साधना करीत राहतात.
सत्य हे नेहमी अज्ञात असते आणि जे ज्ञात आहे ते सत्य नसते या साध्या कसोटीवर कोणतेही पारंपरिक शास्त्रे आणि त्यांचे ज्ञान हे ज्ञात असल्यामुळे ते सत्य नसते हे मान्य करणे अवघड जाते. याचे कारण श्रद्धा असतात. श्रद्धा या सत्य संशोधनातील सर्वात मोठा अडसर आहे हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही.
मी म्हणजे नेमके काय हे न समजल्यामुळे पारंपरिक शास्त्रांनी तो आत्मा आहे अशी कल्पना केली. वैयक्तिक शरीरात आत्मा आणि वैश्विक जगताचा परमात्मा अशा नंतर पुढील अनेक कल्पना वाढत गेल्या.
आता आपण कोणतीही कल्पना न करता शास्त्रशुध्द रित्या आपल्या मी चा शोध घेऊया. आपले शरीर सतत अनुभव घेत असते. अनुभव करताना नेहमी दोन घटक असतात, एक अनुभव घेणारा मी असतो आणि दुसरा अनुभवात येणाऱ्या घटना असतात. अनुभव करणारा जो मी असतो त्याला द्रष्टा संबोधले जाते आणि तो जे काही अनुभव करीत असतो ते त्याचे दृष्य असते.
आकाशात बौद्ध पौर्णिमेचा चंद्र झळकत होता त्याच्या दर्शनाच्या अनुभवाचा उदाहरणासाठी उपयोग केला आहे. आपण जेव्हा चंद्र पहात असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळे चंद्र पहात असतात. डोळे कॅमेरा प्रमाणे चंद्राची प्रतिमा काढतात आणि ती प्रतिमा ते मेंदूकडे पाठवितात. मेंदूकडे आलेली चंद्राची प्रतिमा मेंदूच्या स्मृतीमध्ये साठविली जाते. स्मृतिमधून हा अनुभव विषद करण्यासाठी एक प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रतिक्रिया म्हणजे आपला मी असतो. मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद विचारांच्या माध्यमातून व्यक्त होतो. मी म्हणजे द्रष्टा असतो. हा मी प्रत्यक्ष चंद्र पहात नसतो तो नेहमी स्नृतीमधील साठविलेल्या प्रतिमा / माहिती पहात असतो. द्रष्टा असणाऱ्या मी चे दृष्य हे नेहमी स्मृती मधील माहिती असते.
द्रष्टा मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो तर स्मृती मधील माहिती म्हणजे दृष्य असते. या अर्थाने द्रष्टा आणि दृष्य हे एका स्मृतीचे भाग असतात, ते दोन्ही स्मृती असतात, एक असतात.
वर्तमान काळातील दृष्य स्मृतीमधील मिला समजे पर्यंत ते भूतकाळ झालेले असते. याचाच अर्थ आपला मी हा स्वतः भूतकाळात जन्मत असतो आणि तो भूतकाळातील स्मृती मधील माहिती अनुभव करीत असतो.
मी चे हे सत्य स्वरूप खरोखर आकलन झाले तर त्याच्या बद्दलच्या भ्रामक कल्पना आपोआप गळून पडतील, भ्रामक मी ने बनविलेल्या त्याच्या आत्मा, परमात्मा, ईश्वर, धर्म, देश आदि असंख्य भ्रामक कल्पनांचा निरास केला जातो. आणि मनाचे भ्रामक पण लक्षात आले की त्याच्या सर्व मानसिक संकल्पना शुन्यवत होतात, त्या बरोबरच आपले जीवन यथार्थ होते, परिपूर्ण होते, पूर्णत्व प्राप्त होते.
- vitthal@viyoddha.com

No comments:
Post a Comment