सामान्यतः योद्धा हा बाह्य शत्रूंशी लढत असतो. त्यास आपले शत्रू कोण आहेत हे माहीत असते व त्यामुळे तो योद्धा आपली रणनीती ठरवू शकतो.
वियोद्धा हा विशेष योद्धा आहे. तो आपल्या अंतर्गत शत्रूशी लढत असतो आपल्या आत मध्ये काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर आदी षडरिपू दडलेले असतात. आपणास या आपल्या अंतर्गत शत्रुंचा पत्ताच नसतो व त्यामुळे आपण त्यांच्याशी लढण्याच्या फंदात पडत नाही व उलट आपण त्यांचे पालन पोषण करत असतो. आपले हे अंतर्गत शत्रूच आपले खरे शत्रू असतात परंतु ते आपणास बाहेरील शत्रूंचा बागुलबुवा दाखवीत असतात. चुकीच्या निर्णयामुळे व चुकीच्या माणसांशी लढण्यांमध्ये आपले संपूर्ण जीवन बाहेरच्या भूलभुलैया मध्ये वाया जाते परंतु तरीही पूर्ण समाधान प्राप्त होत नाही.
वियोध्दा हा आपल्या अंतरंगात लपलेल्या खऱ्या शत्रूंचा शोध घेतो व त्यांना हिंसक क्रांतीने नाही तर अहिंसक शांतीने जिंकून त्यांना आपल्या खऱ्या जीवन मुल्यांसाठी वापरात आणतो. षडरिपु चुकीच्या ठिकाणी वापरले तर त्यांचा रावण होतो व तेच षडरिपु योग्य ठिकाणी वापरले तर त्यांचा राम होतो. मन हे एकच असते. जे मन आपणास अधोगतीस नेत असते तेच मन आपणास परमगतीस नेवून सोडत असते.
चुकीची जीवन शैली आपणास चुकीची जीवन ध्येये दाखविते आणि आपणास जीवनाचे यथार्थ लक्ष्य सापडत नाही. दररोज व्यायाम, योगासने, प्राणायाम व ध्यान केले तर आपली जीवनशैली योग्य मार्गावर येते व आपल्या जीवनाचे ध्येय दृष्टिपथात येते. चुकीच्या माहिती व चुकीच्या संकल्पना पासून मुक्त होणे हेच खरे परमज्ञान आहे व तीच खरी मुक्ती होय. हे परमज्ञान व मुक्ती ही आपले आपण प्राप्त करावयाची असते दुसरा कोणीही आपणास ते देवू शकत नाही व आपणास मुक्त करू शकत नाही. आत्मसाक्षात्कार हा उसणा असू शकत नाही तो फक्त आणि फक्त आपला स्वतःचा मुक्त आनंद असतो.
- विठ्ठल योग धाम, नागेवाडी, सातारा.

No comments:
Post a Comment