Wednesday, July 25, 2018

पांडुरंग... विठ्ठला



पांडुरंग विठ्ठलाचि ईतरत्र अनेक मंदिरे आहेत परंतु मुळ क्षेत्र हे पंढरपुर आहे. पंढरपुरच का यामागचा इतिहास जाणणे खुप महत्वाचे आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्या | वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।

ई.स.आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी भिमा नदीकाठच्या महायोगाचे क्षेत्र असणाऱ्या पंढरपुर येथील पांडुरंगाचे स्तोत्र 'पांडुरंगाकष्टकम' गायले आहे. वरं पुंडरीकाय (पुंडलीक वरदा...) म्हणजे भक्त पुंडलीकाला आशीर्वाद देण्यासाठी अवतरलेल्या परब्रह्मलिङ्गं, शिवं, शांतं परमेश्वराचे हे स्तोत्र आहे. याचा अर्थ पांडुरंगाचे क्षेत्र हे आठव्या शतकापुर्वीचे आहे व क्षेत्रपती पुंडलिकांचा त्यामध्ये स्पष्ट ऊल्लेख आहे. विठ्ठल हे नाव नंतर आलेले आहे.

भक्त पुंडलीक हे सहाव्या शतकापुर्वी होऊन गेलेले असावेत कारण सहाव्या शतकातील राष्ट्रकुटांच्या ताम्रपटामध्ये पांडुरंगाचा ऊल्लेख आहे. भक्त पुंडलिकांचा फार मोठा संप्रदाय असावा ज्याचे त्यावेळचे व नंतरचे राजे महाराजे शिष्य असावेत. भक्त पुंडलीक व पांडुरंगाचि मुर्ती पाहता या दोघांचा शैव संप्रदायामधिल कुंडलीनी महायोगाशी खुप जवळचा संबंध असावा असे नक्किच लक्षात येते.

कुंडलिनी, कुंडलीक, पुंडलीक, पांडुरंग, पंढरपुर या नावामधुन सुध्दा बऱ्याच गोष्टि स्पष्ट होतात. कुंडलिनी महायोगाचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये खुप लांबलचक व सुंदर वर्णन केलेले आहे. कुंडलिनी महायोग हा शिव व शक्ति यांच्या अध्यात्मिक व सांसारिक समन्वयाचा शास्त्रशुध्द योगप्रकार आहे. शैव संप्रदायामधिल नाथ संप्रदाय व तांत्रीक संप्रदायांनी त्याचा अध्यात्मिक साधनेसाठि खुप वापर केलेला आहे. नंतरच्या ईतर सामान्य संप्रदायांमुळे हा योगप्रकार सामान्य जनते पासुन अलिप्त राहिला आहे.

साधनावस्थेच्या सुरूवातीस साधक हा संसारी असतो म्हणजे स्त्रीशक्तिस्वरूप असतो परंतु जसजशी त्याचि साधना वाढत जाते व पराकोटिस पोहोचते त्यावेळी तो शिवस्वरूप होतो. हि कुंडलिनी महायोगाचि अतिशय थोडक्यात  माहिती म्हणता येईल. पाठिच्या मेरूदंडाच्या तळाशी मुलाधार चक्र आहे तिथे कुंडलिनी शक्ति साडेतीन वेटोळे घातलेल्या सर्पाच्या आकारामध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये असते. ध्यानसाधने मुळे मुलाधार चक्रास गती मिळते व शक्ति जागृत होऊन ती मेरूदंडामधिल सुषुम्ना नाडिमधुन वरवर सरकु लागते. ऊर्ध्वगमन करताना ती नाभी, ह्रदय, कंठ, दोन्ही भुवयांमधिल चक्रांना गतिमान करत मस्तकावरील सहस्त्रार चक्रापर्यंत येते जिथे भगवान शिवांचे स्थान आहे. शक्तिचे शिवाशी मिलन होते व साधकास परम समाधिअवस्था प्राप्त होते. समाधि अवस्थेमध्ये त्याला शिवाच्या पांढऱ्या शुभ्र म्हणजे त्यावेळच्या भाषेमधिल पांढुर रंगाचे दर्शन होते व त्यावरून पांढुररंग... पांडुरंग हे ईश्वराचे नाव पडले असावे.

साधकाच्या मुलाधार ते सहस्त्रार चक्रापर्यंतचा प्रवासाचे मुर्त स्वरूप म्हणजे पांडुरंगाचि मुर्ती होय. पांडुरंग वा मुर्तीमधिल आकाराचे कोणत्याहि वैदिक वा पौराणिक ग्रंथांमध्ये ऊल्लेख नाहित म्हणजेच हि मुर्ती कोणत्याहि हिंदु दैवतांची नाहि. जैन वा बौध्दांच्या शिल्पकलेशी कसलेहि साधर्म्य नाहि त्यामुळे ती महावीर वा बुध्दाचिहि नाहि. हिंदु, जैन व बौध्द या भारतीय धर्माशि कसलाहि संबंध नसतानाही हे क्षेत्र ईतके प्रसिध्द का असावे याचा विचार होणे आवश्यक आहे.

भक्त पुंडलिकांच्या कुंडलिनी महायोगामुळे अनेकांना अध्यात्मिक अनुभवांचि प्रचीती तात्काळ येत असावी त्यामुळे हे क्षेत्र ऊत्तर भारतीय धर्मांचे प्राबल्य निर्माण होण्यापुर्वी दक्षिणेकडिल निधर्मी सर्वसामान्यांच्या अध्यात्मिक ऊन्नतीचे फार मोठे केंद्र झाले असावे.

पांडुरंगाच्या ऊघड्या मुर्तिचा अभ्यास केला असता, पायाशी विट आहे, विट म्हणजे साधनेचा मुळ आधार असलेल्या मुलाधार चक्राची ती प्रतीक आहे. मुर्तीच्या मान ते कंबरेचे साधर्म्य हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. कमरेवरील हात हे एकमेकांना भेदुन जाणाऱ्या ईडा व पिंगळा नाडिंचे ते प्रतिक आहे. मधले शरीर हे सुषुम्ना नाडिचे प्रतिक आहे. डोक्यावरील शिवलींग हे शिवाचे प्रतिक आहे. कुंडलिनी महायोगाचे प्रतिक म्हणुन शिवलिंग व काहि ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचे प्रतिके वापरतात. शिवलिंगाचा खालील भाग योनी व वरील भाग हा लींग असा बिभस्त प्रकार दिसतो म्हणुन कदाचित भक्त पुंडलिकांनी शिव-शक्तिंच्या समाधि योगाचे नवीन प्रतिक म्हणुन हि मुर्ती तयार केली असावी. गळ्याखाली हि मुर्ती स्त्रीशक्ति स्वरूप दिसते तर गळ्यावरती ती शिवस्वरूप दिसते. तामिळ, आंध्रा, केरळ, कर्नाटक सहित महाराष्ट्र, गुजरात मधिल मुल निवासी भारतीय या मु्र्तीच्या ईतक्या प्रेमात का पडला असावा याचे खरे कारण म्हणजे शिव-शक्तिच्या समाधि मिलनाच्या साधनेचे ते एकमेव सत्य स्वरूप होय. सुमारे पाचशे वर्षानंतरच्या मराठि व कानडी संतांना हि माहीती ऊपलब्ध असणे शक्य नव्हते. त्यामुळे नंतरच्या वैष्णवी भक्ती संप्रदायांनी तिचि विष्णु, कृष्ण व विठ्ठल या स्वरूपामध्ये भक्ति सुरू केली असावी. भक्त पुंडलिकांच्या मंदिरा शेजारी मोठया पितळी नागाचि मुर्ती नेहमी असते, कुंडलीनी शक्तिचे तेही एक प्रतीक आहे.