घराच्या आतील सेक्युरिटी कॅमेरा हा घराबाहेरील दृश्य टिपू शकणार नाही. घरातील चार भिंतींच्या आतील कॅमेराची कक्षा ही त्याची मर्यादा असते, कॅमेरा त्याच्या मर्यादित कक्षेच्या बाहेरचे जग बघू शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅमेरा लावलेला असतो, त्यामधील प्रत्येक दृश्य पाहण्याची गरज नसते फक्त जे अत्यावश्यक असते ते पाहावे लागते, कदाचित काही दृश्ये दीर्घ काळासाठी साठवावी लागतात. आणि उर्वरित बहुसंख्य अनावश्यक दृश्ये आपण न पाहता आपोआप निघून जात असतात. आपल्या निवडी नुसार कॅमेरा मधील कोणती दृश्ये आवश्यक आहेत आणि कोणती दृश्ये अनावश्यक आहेत हे नवीन intelligent कॅमेरे सुद्धा ओळखू शकतात, आवश्यक दृश्ये साठवून ठेवतात आणि अनावश्यक दृश्ये काढून टाकतात.
आपल्या शरीराच्या सुरक्षेसाठी असणारे कॅमेरे (ज्ञानेंद्रिये) हे शरीराच्या बाहेर आहेत आणि बाहेरील ज्ञानेंद्रिये त्यांची दृश्ये मेंदूमधील स्मृतीमध्ये साठवित असतात. आपला मी हा मेंदू मधील स्मृती मध्ये असतो त्याला प्रत्यक्ष शरीर आणि शरीराच्या ज्ञानेंद्रिय यांनी वर्तमानात बाहेर काय टिपले हे त्या गोष्टी स्मृती मध्ये आल्या नंतर समजते.
खरे जीवन आणि त्याचा बाहेरील जीवन प्रवाह हा आपल्या आतील मी ला तत्क्षणी समजणे शक्य नसते. खरे जीवन आणि त्यातील घटना हे वर्तमानात घडत असतात आणि आपला मी हा भूतकाळात असतो. खऱ्या जीवनात वर्तमानात होवून गेलेल्या घटनांची मी मुळे मिला नंतर जाणीव होत असते.
आपण रस्त्याने चालताना अचानक साप पाहिला तर थबकून शरीर थांबते. शरीराने पाहिलेल्या सापाची प्रतिमा मेंदूमधील स्मृतीमध्ये जाताच लगेच मी ची प्राथमिक प्रतिक्रिया भीतीच्या स्वरूपात येते. म्हणजे यामध्ये शरीर सापाला पाहते हे खरे जीवन आहे तर ते मिला समजल्या नंतर त्याची प्रतिक्रिया, त्याचे विचार आणि त्याची भीती हि केवळ मानसिक असते, भासमय असते.
आपले सर्व अनुभव असेच असतात. नैसर्गिक नियमांप्रमाणे आपले आणि इतर सर्व विश्वाचे खरे जीवन यथावस्थित चाललेले असतात. फक्त आपला मी त्याच्या भूतकाळातील अनुभवानुसार वर्तमानातील घटनांचा अर्थ लावीत असतो आणि भविष्यकालीन योजना आखित असतो. आपला मी हा आपल्या स्मृतीमध्ये साठविलेल्या असंख्य प्रतिमांचा, माहितीचा प्रतिनिधी असतो. स्मृती मधील माहिती हेच त्याचे अस्तित्व असते त्यामुळे तो अनावश्यक माहिती संग्रह आणि अनावश्यक प्रतिमा काढून टाकीत नाही उलट अर्थाचा अनर्थ लावीत त्यातून असंख्य मानसिक कल्पना बनवीत राहतो.
मी हा भास आहे आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी कधी स्पर्श होवू शकत नाही त्यामुळे तो प्रत्यक्ष जीवना ऐवजी भासाच्या मानसिक जीवनामध्ये जगत असतो. मी स्वतःचे मानसिक मनोरंजन मध्ये व्यस्त राहून स्वतःची निरंतरता टिकवून ठेवतो.
दररोजच्या त्याच त्या प्रतिमा आणि तीच ती माहिती मिचे मनोरंजन करू शकत नाही. म्हणून आपला मी हा इतर असंख्य मानसिक कल्पना बनवितो आणि त्याद्वारे स्वतःचे सतत मनोरंजन कसे होत राहील याची काळजी घेत असतो.
आपल्या खऱ्या जीवनात कोणत्याही सुखाची, आनंदाची, समाधानाची आवश्यकता नसते परंतु आपला मी आणि त्याचे सततचे विचार मिळून जे मन बनलेले असते ते त्यांच्या मनोरंजनासाठी सुख - दुःख, समाधान - असमाधान, निराशा - आनंद, प्रीती, राग, द्वेष, हिंसा - अहिंसा आदि द्वैत निर्माण करतात आणि आपल्या सहज, नैसर्गिक जीवनाचा स्वर्ग बनविण्याच्या नादात नरक बनवितात. आणि शरीरास काही फरक पडत नाही ते स्वर्गात आहे की नरकात आहे. शरीरास ते जिवंत आहे हे सुद्धा त्याला मनच सांगत असते !!!
जे मन त्याच्या मनोरंजना साठी खेळ, कला, साहित्य आदि बनवीत असते तेच मन त्याहीपुढे जावून देव, देश, धर्म, अध्यात्म आदि श्रद्धा युक्त अमर्याद मनोरंजनाची सोय करून ठेवीत असते. आणि आपला मी दैनंदिन खरे जीवन जगायचे सोडून या कल्पना विकणाऱ्या गारुड्यांच्या नादी लागत असते. अध्यात्मिक संत, बुवा, महाराज त्यांच्या नवनवीन संकल्पना आपल्या माथी मारीत राहतात आणि आपण त्यांच्या तथाकथित धार्मिक - अध्यात्मिक प्रभावाखाली आपले खरे जीवन जगायचे सोडून त्यांच्या कल्पना प्रमाणे जगू लागतो.
जागृत अवस्थेतील हे ढळढळीत सत्य आपणास आकलन होत नसते तरीही आपण त्याही पलिकडील त्यांचे स्वप्न, सुशुप्ती, तुरिया आणि त्या पलिकडील अवस्थांचा भाकडपणा ऐकत राहतो. आपणास आत्ता या क्षणी आपल्या आसपास काय चालले आहे याची काळजी नसते परंतु दिल्लीत काय चालले आहे आणि स्वर्गात देव आहे की नाही याची खूप उत्सुकता असते.
सत्य म्हणजे मनाने, विचारांनी, मी ने बनविलेल्या सर्व संकल्पनांचा, भाकड तत्वज्ञानाचा त्याग करणे होय. Truth is nothing but the total freedom from all known concepts. Negation of all, नेती नेती. नेती नेती हे हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे तरीही समाजातील चतुर लोकांनी सतत ग्रंथ लिहून अज्ञान जिवंत ठेवले आहे.