Tuesday, October 13, 2020

मन आणि श्रद्धा



आपण जिथे रहात आहोत तिथे इतरही असंख्य जीव रहात आहेत. लाखो वर्षांच्या संघर्षातून प्रत्येक जीव आपले जीवन निसर्ग नियमांशी सुसंगत ठेवीत जीवन कंठीत असतात. मनुष्य प्राण्याच्या मेंदूमध्ये अतिरिक्त विचार जन्म घेवू लागले, त्यातून त्याची बुद्धिमत्ता इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित झाली आणि त्याने आपले जीवन जास्तीत जास्त सुरक्षित आणि सुखी केले. त्याच बुध्दीचा वापर करून तो जास्तीत जास्त स्वार्थी सुद्धा बनला. सुखी जीवन हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असे तो मानू लागला. आपण सर्वजण निसर्गाचे भाग आहोत, सर्वांनी सलोख्याने राहायला हवे हे तो विसरला. निसर्गातील इतर जीवांची हत्या करत तो स्वतःच्या मनुष्य बांधवांची सुद्धा हत्या करू लागला. इतर जिवांपेक्षा सुसंस्कृत होवून सुद्धा तो अजून आपली आदिवासी हिंसक वृत्ती सोडायला तयार नाही. सत्ता आणि संपत्ती मिळविण्यासाठी तो अजुनही असंख्य जीवांची हत्या करीत आहे. बलिष्टांच्या हव्यासामुळे इतर जीवांची कुचंबणा होते, त्यांच्या जगण्याच्या हक्कावर अतिक्रमण केले जाते. त्यातून गरिबी, अज्ञान यामुळे सामान्य जन दुःखात पिचत आपले जीवन कंठत राहतात. आशेचा किरण दिसत नसताना अज्ञात, दैवी शक्तीचा मानवी मनाने आभास तयार केला. आपणच आपल्या अधोगतीला जबाबदार आहोत, आपण निसर्गाशी घेतलेल्या फारकती मुळे आपण दुःख भोगत आहोत हे समजून घेण्या ऐवजी दैवी शक्तीच्या प्रसादाने आपण दुःख मुक्त होवू अशी घट्ट मानसिकता तयार केली गेली. दैवी शक्तींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मग त्यांची आराधना, उपासना यांचे स्तोम निर्माण झाले. आपल्या दुःखाचे मूळ कारण विसरून जावून त्या ऐवजी दुःख निवारणार्थ श्रद्धांचे डोंगर उभे केले गेले. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्र्वरी मुळे मनुष्य जातीचे दुःख निवारण तर झालेच नाही उलट श्रद्धांचे भूत मानगुटीवर बसले. 

आपले मन हे जसे एक आभास असून त्याने आपल्या अस्तित्वाचा पूर्ण ताबा घेतला आहे तद्वत श्रद्धा स्थानानी संपूर्ण मानव समाजाच्या बुध्दीचा ताबा घेतला आहे. 

God is an abstraction made by thought which cannot understand the world in which it lives - its suffering, agony and misery. Thought therefore creates an outside agency which it worships. - J Krishnamurti

Public Talk 1 in New Delhi, 24 November 1973