Sunday, August 09, 2020

जिदु कृष्णमूर्ती यांची ध्यान साधना




कृष्णमूर्ती यांच्या ध्यान प्रक्रियेमध्ये पहिली पायरी आहे विचारांचे आकलन करणे ही होय. हे आकलन आपल्या दिवसभरच्या कार्याचे करावयाचे आहे. त्यांचे ध्यान केवळ अर्ध्या तासाचे नाही. आपल्या विचारांचे अवलोकन करताना त्यांचे विश्लेषण करू नका, त्यांची चिरफाड करू नका, त्यांना तिखटमीठ लावू नका, त्यांचे समर्थन करू नका, त्यांचा विरोध करू नका, ते अजून काहीतरी वेगळे असायला हवे होते अशी अपेक्षा करू नका, आपल्या मी ला केंद्रस्थानी आणू नका. केवळ त्रयस्थपणे संपूर्ण दिनक्रम उरकावा. अर्थात हे दिसते तेवढे सोपे नाही परंतु निकाल अभूतपूर्व आहे याची खात्री बाळगा. 

जेव्हा आपण विचारांना त्रयस्थपणे पाहण्यास शिकतो तेव्हा प्रत्येक विचार आकलनात आल्यानंतर त्या विचारांना तिथेच संपवून टाकायचे, संपूर्ण विसरून जायचे, ते विचार स्मृतीत राहिलेच पाहिजे असा प्रयत्न करूच नये. हातातून कपबशी पडली की ती फुटते आणि निकामी होते, परत वापरात येत नाही. थोडक्यात प्रिय आणि अप्रिय घटना विसरून जाणे. जर प्रिय आणि अप्रिय घटनांचे विचार तिथेच संपविले नाहीत तर त्यांना लगेच इतर विचारांचे फांदोरे फुटू लागतात, विचार सुरूच राहतात. भूतकाळातील विचार भविष्यकालीन योजना आखित काळाच्या कोठडीत बंधनात अडकले जातात. 

विचारांना थांबविणे हे महत्त्वाचे आहे हे जर आपल्या लक्षात आले तर आपण आपले सर्व व्यर्थ व्याप कमी करायला हवेत. वृथा भार वाहने थांबले पाहिजे.


विचारांचा कधी अंत शक्य आहे काय?

कृष्णमूर्ती यांच्या ध्यानाचा तो महत्वाचा भाग आहे. मेंदूमधून विचारांचे समूळ उच्चाटन करणे हेच त्यांच्या ध्यानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कारण जर विचारांची शृंखला चालू राहिली तर ती जुन्या विचारांची पुनरावृत्ती आहे, तो भूतकाळ आहे, कारण विचार म्हणजे स्मृती आहे, विचार म्हणजे स्मृतीचा प्रतिसाद आहे, विचार म्हणजे अनुभव आहे, विचार म्हणजेच माहितीचा संग्रह आहे. 

प्रश्न: कृष्णमूर्ती ध्यान म्हणजे दिवसभरच्या कार्याकडे सतत जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे होय. पण ते कसे करायचे आणि शक्य आहे काय?

केवळ त्या त्या वेळी आपण काय करीत आहोत यावर संपूर्ण जाणीव पूर्वक लक्ष देणे, यामुळे विचारांच्या साखळ्या तोडल्या जातात.  आपण मनाचा सहज स्वभाव जाणीवपूर्वक मोडला पाहिजे.  मनाचा धर्म आहे सतत बडबड करणे हा होय.

आपण कदाचित सतत लक्ष देणे विसरू शकतो, परंतु लक्षात येताच परत परत प्रयत्न करावयास हवे. आम्ही नेहमीच लक्ष देवू शकत नाही परंतु आम्ही मनामध्ये जे काही छेद निर्माण करतो ते मनाची विशाल भिंत मोडीत काढण्यासाठी तेवढे छोटे छेद पुरेसे असतात.  सत्याचा अविरत वर्षाव उर्वरित काम पूर्ण करेल.

ध्यानाकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन म्हणजे मनाला नियंत्रित करणे, धरून ठेवणे किंवा एकाग्र होणे शिकणे. हे जे पूर्वीचे ज्ञान आहे, हेच मन आहे आणि तेच नियंत्रक आहे, नियंत्रक स्वतः मन आहे त्यामुळे ते मनाला नियंत्रण करू शकत नाही.  म्हणून मनाला नियंत्रण न करता त्याचे केवळ निरीक्षण केले की मनाची निरंतरता संपली जाते. आणि जेव्हा मन पूर्णपणे शांत राहून निरीक्षण करते तेव्हाच मी ला समजण्याची शक्यता असते. जेव्हा आपण लक्षपूर्वक न्याहाळत असतो तेव्हा मनाची बडबड शांत झालेली असते तीच मनाची शांतता होय. 

शांतता पूर्णपणे आवश्यक आहे, केवळ वरवरच्या पातळीवरच नव्हे तर अत्यंत खोल स्तरावर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी संपूर्ण शांतता असणे आवश्यक आहे. आपले वास्तविक अस्तित्व पूर्ण शांत स्वरूपाचे आहे. मनाच्या बडबडीने आपल्याला त्याची जाणीव नसते, मनाची बडबड थांबली की आपण आपल्या मूळच्या अस्तित्वाच्या परमशांत अवस्थेशि एकरूप होतो. 

देहाच्या नैमित्तिक कर्मा एव्हढेच विचार येतील, कर्म संपले की विचार बंद होतील परत परम शांत अवास्थेशी एकरूपता साधली जाईल.

सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये असे setting करता येते की तो फक्त हालचाल आपल्या स्मृत्तीमध्ये साठवू शकतो आणि उर्वरित वेळेत काहीही साठवले जाणार नाही. 

म्हणून मनाने फक्त अवलोकन केले पाहिजे, प्रत्येक अनुभव करताना विना निवड जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्वरित त्या जाणिवेची आणि अनुभवाची समाप्ती होणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. 

पाहणे, पाहिलेले विसरून जाणे आणि तेच सतत करत राहणे हेच कृष्णमूर्ती यांचे ध्यान आहे आणि तीच केवळ साधना आहे, सर्व साधनांचे हेच मूळ आहे, विचारांची निरंतरता संपवून टाकणे.


ध्यानासाठी लागणारी ऊर्जा

आपणास कदाचित हे कळले असेल की सत्य आकलनात येण्यासाठी प्रचंड चैतन्य आणि ऊर्जेची आवश्यकता असते.  आता ही ऊर्जा कशी येते हे शोधूया.

प्रश्न असा आहे की आपली सामान्य उर्जा अधिक वाढवता येऊ शकते काय? कोणत्याही प्रकारच्या विचलन शिवाय ही उर्जा पूर्णपणे वापर केली जाऊ शकते काय? आपणास कोणत्या गोष्टी विचलित करतात याचा आता आपण शोध घेऊया. वेगवेगळी मतं मतांतरे, वादविवाद, संघर्ष यामुळे आपली शक्ती व्यर्थ वाया जात असते. हा संघर्ष वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक ते आंतरराष्ट्रीय युद्धे असा वाढत जात असतो. संघर्ष आणि मतांतरे यामुळे आपली ऊर्जा वाया जात असते. चुकीच्या संस्कारांनी अंधश्रद्धा वाढीस लागतात, मनाला नियंत्रित करण्यासाठीचे विविध उपायांनी आपण भरकटले जातो. ज्याक्षणी आपल्या हे लक्षात येते की संघर्षाचा प्रत्येक प्रकार आपणास विचलित करीत आहे, आपणास भरकटत ठेवण्याचे कार्य करीत आहे   त्या क्षणीचे ते आकलन आपल्यातील विकृती नष्ट करते. जर त्या वेळी आपण ती विकृती नष्ट करण्याची कृती नाही केली व नंतर पाहु असे म्हणून टाळली तर हातातोंडाशी आलेली संधी आपण दडवित असतो. आणि म्हणून मेंदूच्या पेशींच्या संरचनेत, मेमरीच्या रचनेत कोणतेही मूलगामी बदल होत नाहीत.