Monday, May 31, 2021

मानव दुःखी का आहे?

आपणास दुःख का सहन करावे लागते?

आपण इतर जनावरांची कत्तल होताना त्यांची तडफड पाहतो तसेच मृत्यू, हिंसा, अपघात यामधून होणारे दुःख पाहतो ते सर्व भौतिक दुःख आहे आणि ते खरे असते. हे भौतिक दुःख पाहून आपले मन मानसिक दुःखाची कल्पना बनविते.

एखादी भौतिक दुःखद घटना घडली की त्याला पर्याय नसतो. म्हणजे आपला एखादा नातलग मृत्युमुखी पडला तर भौतिक दृष्ट्या त्याला परत आणता येत नाही. त्या loss ची भरपाई करता येत नाही, ते accept करावेच लागते. आपला माणूस कायमचा गेला आहे आणि आता तो परत येणार नाही. ही समज, हे आकलन यातून ते दुःख खरेतर संपुष्टात यायला हवे असते. 

परंतु आपले मन हे काळ आणि त्यावर आधारित विचार यांच्या मार्फत तो incidence, तो loss दुःखद आठवणींच्या विचारांनी  जिवंत ठेवते.

भौतिक दुखापासून पळवाट नसते परंतु आपले मन अनेक कल्पना लढवीत राहते, नवीन आशा दाखवीत राहते आणि आपणास आपल्या झालेल्या दुःखातून पळवाट शोधण्यास मार्ग हवा असतो.

भौतिक घटना घडून गेल्या नंतर आपला मी ते दुःख जिवंत ठेवत असतो. म्हणजे भौतिक घटना घडून गेल्या नंतर जे दुःख होत असते ते आपल्या मी ला.

आपला मी हा एक विचार आहे, तो एक भास आहे, तो काल्पनिक आहे, तो खरा नाही त्यामुळे त्याचे सुख दुःख खरे नसतात, काल्पनिक असतात.

एकदा आपणास मी आणि त्याच्या कल्पना यांचा साक्षात्कार  झाला की सर्व मानसिक दुःखे ही मी या भासाची आहेत, प्रत्यक्षात तसे काही नसते याचे आकलन होते आणि नंतर आपण कधीच दुःखी होणार नाही.

संपूर्ण मानवजात अशा मानसिक कल्पनांमुळे दुःखी आहे आणि आपला मी त्या कल्पना आपल्या आयुष्यात आणतो म्हणून आपला मी दुःखी आहे 

आपण मानसिकरीत्या दुःखी आहोत कारण संपूर्ण मानवजात मानसिकरीत्या दुःखी आहे. 

 I am the world and world is me. - J Krishnamurti

Thursday, May 27, 2021

नात्यांचे सत्य


आपला मी म्हणजे आपल्या स्मृतींचा प्रतिसाद होय, तो विचारातून व्यक्त होतो, तो भूतकाळ असतो. हे जर व्यवस्थित समजले तर त्यामधून आपणास आपल्या जीवनाचा भाग असणाऱ्या नात्यांचा खरा अर्थ लागू शकतो. 

कोणताही अनुभव येणे म्हणजे त्या अनुभवाच्या संदर्भातील सर्व गोष्टींच्या, घडामोडींच्या, व्यक्तींच्या आपल्या स्मृतिमध्ये साठविल्या गेलेल्या प्रतिमा असतात. आपण प्रथम आपली स्वतःची एक प्रतिमा बनविलेली असते, हीच आपल्या मी ची प्रतिमा असते. आपली ओळख, आपली जायदाद, आपल्या भावना, श्रद्धा, अनुभव, अपेक्षा या सर्वांची मिळून आपली स्मृती मध्ये प्रतिमा बनलेली असते आणि या सर्वांचा प्रतिनिधी हा आपला मी असतो. 

जशी आपण आपली स्वतःची प्रतिमा आपल्या स्मृतिमध्ये बनवलेली असते तशाच असंख्य प्रतिमा आपण इतरांच्या बनविलेल्या असतात. प्रत्यक्षातील एखादी व्यक्ती आणि त्या व्यक्तीची आपण बनविलेली प्रतिमा यामध्ये अंतर असते. आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे इतरांच्या प्रतिमा बनविलेल्या असतात. एखादा आपणाशी चांगला वागत असेल तर त्याची चांगली प्रतिमा आपण बनवितो. तसेच एखाद्याने आपला अपमान केला असेल, धोका दिला असेल तर त्याची आपण वाईट प्रतिमा बनवितो. आपल्या मनामध्ये आपल्या मी ची प्रतिमा आणि इतरांच्या प्रतिमा यांचे पूर्व अनुभवानुसार संबंध बनलेले असतात. प्रतिमा आणि प्रत्यक्ष व्यक्ती हे संपूर्णतः वेगळे असतात. व्यक्ती हे तथ्य असते तर त्या व्यक्तीची आपण बनविलेली प्रतिमा हा भास असतो. 

आपला मी हा एक भास असतो, आभासी मी ने आपल्या मी ची बनविलेली प्रतिमा सुद्धा भास असतो, आपल्या मी ने इतरांच्या बनविलेल्या प्रतिमा सुद्धा भास असतात. या सर्व भासमान प्रतिमांचे एकमेकांशी आभासी संबंध मनामध्ये जुळलेले असतात. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, एकमेकांपासून वेगळी असते. 

आपल्या भासमान मी ला स्वसंरक्षनासाठी, संवर्धनासाठी, मनोरंजनासाठी इतर प्रतिमा हव्या असतात. आपल्या मी ची प्रतिमा त्याच्या इतर प्रतीमांवर त्या प्रमाणे अवलंबून असते. त्यानुरूप आपल्या मी च्या प्रतीमेने इतर प्रतिमांवर विश्वास, श्रद्धा, भरवसा, आपुलकी, मैत्री, प्रेम प्रस्थापित केलेले असते. इतर प्रतीमांनी आपल्या मीच्य प्रतिमेला धोका दिला, विश्वासघात केला, अपमान केला, संबंध तोडले तर आपल्या मी ची प्रतिमा व्यथित होते, दुःखी होते, राग धरते. 

नातेसंबंध असोत अथवा इतर कोणतेही संबंध असोत ते सर्व मानसिक असतात, ते संबंध प्रतिमांचे एकमेकांशी असलेले असतात प्रत्यक्षात कसलेही संबंध नसतात.

मी चा विचार नसेल, मी नसेल, मि ने बनविलेल्या प्रतिमा नसतील तर व्यक्ती व्यक्तींमध्ये राग, लोभ, असूया, क्रोध, स्वार्थ असणार नाही. ज्यावेळेस व्यक्तींना काही कामासाठी एकमेकांची गरज लागेल ती गरज (मनातील कुविचारांच्या अभावी) सहज नैसर्गिक करूणेतून, नैसर्गिक बुद्धीच्या आधारे भागविल्या जातील. 

महाशहरे असोत अथवा मोठमोठे उद्योग असोत जिथे वेगवेगळ्या पार्श्वभूमीची, विना ओळखीची, परकी माणसे एकत्र येतात तरीही सहजीवन व्यतीत करू शकतात. या उलट जवळच्या नात्यात जेव्हा स्वार्थ आडवा येतो तेव्हा संघर्ष उभा राहतो.

Soulmate सुद्धा मानसिक प्रतिमा बनवीत असते. विचारांवर आधारित कोणतेही नाते हे मानसिक असते.

Wednesday, May 26, 2021

आत्मसाक्षात्कार

 


आज बौद्ध पौर्णिमा आहे. नेहमी प्रमाणे संध्याकाळी शेतात फिरत असताना उगवत्या चंद्राचे पूर्ण रूप खूपच विशाल भासत होते. त्याच वेळी एका अध्यात्मिक मित्राचा फोन आला आणि गप्पा सुरू झाल्या. 

कोणत्याही मानसिक संकल्पना नसणे म्हणजे पूर्णत्व असते या कृष्णमूर्ती यांच्या लेखावर चर्चा चालू होती. त्यातूनच पुढे मग मी म्हणजे काय, द्रष्टा आणि दृष्य म्हणजे काय आणि ते दोन्ही एक कसे यावर सखोल चर्चा झाली. त्यावेळच्या चर्चेचे शब्दांकन करावे या मित्राच्या आग्रहास्तव खालील चिंतन लिहिले गेले आहे. 

अध्यात्मात मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असते. पारंपरिक शास्त्रांनी तो आत्मा आहे असे सांगून ठेवल्याने सर्व साधक आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी साधना करीत राहतात. 

सत्य हे नेहमी अज्ञात असते आणि जे ज्ञात आहे ते सत्य नसते या साध्या कसोटीवर कोणतेही पारंपरिक शास्त्रे आणि त्यांचे ज्ञान हे ज्ञात असल्यामुळे ते सत्य नसते हे मान्य करणे अवघड जाते. याचे कारण श्रद्धा असतात. श्रद्धा या सत्य संशोधनातील सर्वात मोठा अडसर आहे हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. 

मी म्हणजे नेमके काय हे न समजल्यामुळे पारंपरिक शास्त्रांनी तो आत्मा आहे अशी कल्पना केली. वैयक्तिक शरीरात आत्मा आणि वैश्विक जगताचा परमात्मा अशा नंतर पुढील अनेक कल्पना वाढत गेल्या. 

आता आपण कोणतीही कल्पना न करता शास्त्रशुध्द रित्या आपल्या मी चा शोध घेऊया. आपले शरीर सतत अनुभव घेत असते. अनुभव करताना नेहमी दोन घटक असतात, एक अनुभव घेणारा मी असतो आणि दुसरा अनुभवात येणाऱ्या घटना असतात. अनुभव करणारा जो मी असतो त्याला द्रष्टा संबोधले जाते आणि तो जे काही अनुभव करीत असतो ते त्याचे दृष्य असते. 

आकाशात बौद्ध पौर्णिमेचा चंद्र झळकत होता त्याच्या दर्शनाच्या अनुभवाचा उदाहरणासाठी उपयोग केला आहे. आपण जेव्हा चंद्र पहात असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळे चंद्र पहात असतात. डोळे कॅमेरा प्रमाणे चंद्राची प्रतिमा काढतात आणि ती प्रतिमा ते मेंदूकडे पाठवितात. मेंदूकडे आलेली चंद्राची प्रतिमा मेंदूच्या स्मृतीमध्ये साठविली जाते. स्मृतिमधून हा अनुभव विषद करण्यासाठी एक प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रतिक्रिया म्हणजे आपला मी असतो. मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद विचारांच्या माध्यमातून व्यक्त होतो. मी म्हणजे द्रष्टा असतो. हा मी प्रत्यक्ष चंद्र पहात नसतो तो नेहमी स्नृतीमधील साठविलेल्या प्रतिमा / माहिती पहात असतो. द्रष्टा असणाऱ्या मी चे दृष्य हे नेहमी स्मृती मधील माहिती असते. 

द्रष्टा मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो तर स्मृती मधील माहिती म्हणजे दृष्य असते. या अर्थाने द्रष्टा आणि दृष्य हे एका स्मृतीचे भाग असतात, ते दोन्ही स्मृती असतात, एक असतात. 

वर्तमान काळातील दृष्य स्मृतीमधील मिला समजे पर्यंत ते भूतकाळ झालेले असते. याचाच अर्थ आपला मी हा स्वतः भूतकाळात जन्मत असतो आणि तो भूतकाळातील स्मृती मधील माहिती अनुभव करीत असतो. 

मी चे हे सत्य स्वरूप खरोखर आकलन झाले तर त्याच्या बद्दलच्या भ्रामक कल्पना आपोआप गळून पडतील, भ्रामक मी ने बनविलेल्या त्याच्या आत्मा, परमात्मा, ईश्वर, धर्म, देश आदि असंख्य भ्रामक कल्पनांचा निरास केला जातो. आणि मनाचे भ्रामक पण लक्षात आले की त्याच्या सर्व मानसिक संकल्पना शुन्यवत होतात, त्या बरोबरच आपले जीवन यथार्थ होते, परिपूर्ण होते, पूर्णत्व प्राप्त होते. 


- vitthal@viyoddha.com





Monday, May 24, 2021

परिवर्तन

कितीही सामाजिक क्रांत्या झाल्या तरी मानव समाज फक्त एका संकल्पना मधून दुसऱ्या काल्पनिक संकल्पना मध्ये ढकलला जात असतो. मानव समाजामध्ये कोणताही आमूलाग्र बदल बाहेरील बदलाने होत नसतो. बाहेरून आदिवासी समाज असो किंवा आधुनिक उच्च शिक्षित समाज असो सर्वजण आतमधून तितकेच स्वार्थी, राग, लोभ, मत्सर बाळगणारे असतात. 

आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये परिवर्तन झाले तरच समाजामध्ये परिवर्तन होवू शकते. समाजमन आणि आपले मन एकमेकांशी घट्ट जुळलेले असते 


आपल्या आतमध्ये परिवर्तन कसे होवू शकेल?


आपण आपल्या स्मृतीमध्ये जसा संपूर्ण मानवजातीचा इतिहास भरून ठेवलेला असतो तसाच आपण आपले कुळ, आपला धर्म, जात, संप्रदाय, देश, भाषा आदींचा स्वाभिमान सुद्धा जपत असतो. यातून आपली स्वतःची एक वैयक्तिक वैचारिक भूमिका बनलेली असते. अशाच वैचारिक भूमिका इतरांच्या बनलेल्या असतात. अगदी नवरा बायको सुद्धा त्यांच्या वैयक्तिक वैचारिक भूमिका जपत असतात. आणि कोणत्याही दोन वैचारिक भूमिका मध्ये संघर्ष हा अटळ असतो. यामुळेच आपले कुटुंब असो किंवा देश असोत प्रत्येकामध्ये संघर्ष होत राहतात. या संघर्षामुळे प्रत्येक मनामध्ये वितुष्ट, कलह आणि त्यामधून दुःख निर्माण होत राहते. त्यामध्ये आपण धर्म, राजकारण, अध्यात्म, खेळ अशा अनेक इतर विषयांची भर घालत असतो. 


आपला मेंदू आणि त्यामध्ये निर्माण होणारे विचार हे आपल्या शरीराच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी निसर्गाने दिलेले असतात. परंतु कलह, संघर्ष, मनोरंजन इत्यादी अनावश्यक विचारांनी आपण सतत विचार करीत असतो आणि तेव्हढा जास्त वेळ मेंदूचा दुरुपयोग होत असतो. यामुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो, विचार भरकटले जातात परिणामी निर्माण होणाऱ्या नैराश्य आदि मानसिक विकारामुळे आपण आपले खरे जीवन जगणं विसरून जातो.


यावर उपाय म्हणून आपण मन शांत करण्याच्या साधना करू लागतो. कोणत्या साधना कराव्यात, त्या कशा कराव्यात, त्याने काय होईल इत्यादी विचार सुरू होतात. म्हणजे जुन्या विचारांना शांत करण्यासाठी नवीन विचार सुरू होतात !!!


मग विचारांना कसे बंद करता येतील?


जेव्हा आपण शांत बसतो, कशावरही लक्ष ठेवत नसतो, मनाला कोठेही केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत नाही जेव्हा मनात कोणताही विचार नाही तेव्हा आपण आपल्या आसपास काय चालले आहे हे स्वच्छपणे पाहु शकतो, सर्वकाही ऐकू शकतो. एरव्ही अवांतर विचारांमुळे आपल्या आसपास काय चालले आहे याकडे आपले लक्ष लागत नसते. 


मनाला असे काही क्षण शांत करणे, स्थिर करणे यासाठी कोणतीही साधना करावी लागत नाही. फक्त शक्य होईल तेव्हा मनाला आपण जे काही करीत आहोत त्याजागी आणण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे आता या क्षणी काय चालले आहे त्याच्या फक्त जाणिवेत राहण्याचा सतत प्रयत्न करीत राहायचे. भूतकाळात काय घडले होते किंवा भविष्यकाळात काय होईल याचे विचार येवू द्यायचे नाहीत. 


सतत भटकत राहणाऱ्या विचारांना, मनाला अशा प्रकारे अधूनमधून अटकाव केल्याने त्यांचा मूलभूत चौफेर उधळण्याचा स्वभाव नाहीसा होईल आणि आपणास खरे जीवन समजू लागेल. खऱ्या जीवनातील खरे सौंदर्य, खरे प्रेम अपेक्षा न करता उमजू लागेल. काहीच अवांतर विचार नसताना जे घडत जाते त्यांना विचारात पकडता येत नाही. 


Have you ever sat very silently, not with your attention fixed on anything, not making an effort to concentrate, but with the mind very quiet, really still? Then you hear everything, don't you? 


You hear the far off noises as well as those that are nearer and those that are very close by, the immediate sounds—which means really that you are listening to everything. 


Your mind is not confined to one narrow little channel. If you can listen in this way, listen with ease, without strain, you will find an extraordinary change taking place within you, a change that comes without your volition, without your asking; and in that change there is great beauty and depth of insight. - J Krishnamurti


Wednesday, May 19, 2021

निरपेक्ष निरक्षण


कृष्णमूर्ती यांच्या Choiceless awareness ची व्यावहारिक उपयुक्तता


Choiceless awareness - निरपेक्ष निरीक्षण म्हणजे कसलीही अपेक्षा न करता केलेले निरीक्षण होय. कोणताही विचार न करता केलेले फक्त निरीक्षण होय. म्हणजे एखादे झाड बघताना ते झाड फक्त पाहणे होय. ते झाड कशाचे आहे वगैरे इतर अवांतर माहिती उगाच मनात येवू न देणे होय. 

जसे एखाद्या अनभिज्ञ व्यक्तीशी आपण फक्त व्यावहारिक पातळीवर संबंध ठेवतो तसेच आपण आपल्या नातेवाईक आणि जोडीदार यांच्या बरोबर नाते लक्षात न घेता सौजण्यपूर्ण आणि सौहार्दाचे व्यावहारिक संबंध ठेवता यायला हवे !!!

यामुळे काय होते?

विचार नाही, अपेक्षा नाही म्हणजे पूर्वज्ञान, पूर्वग्रह नाहीत, म्हणजे काहीच नाही. हे काहीच नसणे म्हणजे मुक्तावस्था असते, पूर्ण स्वातंत्र्य असते. अशा काहीच विचार, काहीच कल्पना नसलेल्या अवस्थेत जुन्याची तीच ती उजळणी बंद झालेली असते. त्यामुळे नवीन शिकणे किंवा नवीन आकलन करणे शक्य होते. 

सततचे विचार, त्यांचा माहिती संग्रह, त्यांची परत परत उजळणी हे सर्व मनाचे संमोहन आहे. संमोहित मनामुळे जीवनातील सत्य अवस्था लक्षात येत नाही. 

एखादी भौतिक समस्या असो अथवा एखादी मानसिक समस्या असो, समस्येकडे तटस्थ निरपेक्ष वृत्तीने पाहिले तर मानसिक समस्येचा फोलपणा लक्षात येतो आणि ती समस्या रहात नाही. भौतिक समस्येकडे तसेच तटस्थ निरपेक्ष वृत्तीने पाहिले तर त्या समस्ये भोवतालच्या मानसिक कल्पना गळून पडतात आणि फक्त समस्या काय आहे हे लक्षात येते. तत्क्षणी त्यावरील उपाय सुद्धा लक्षात येतो. 

मानसिक अहंकारामुळे आपल्या लक्षात खरी समस्या येत नाही आणि त्यावरील उपाय सुचत नाही. आपला अहंकार हा आपल्या समस्या तशाच ठेवून तो मनाला इतर गोष्टींकडे वळवित असतो. अहंकार, मानापमान, स्वाभिमान हे केवळ मानसिक विचार मात्र आहेत, त्यांना बाजूला ठेवले तरच जीवनातील सत्य निदर्शनास येते. 

vitthal@viyoddha.com


Monday, May 03, 2021

तथ्य आणि भास

जीवनातील तथ्य आणि जीवनातील भास हे दोन वेगवेगळे विभाग आहेत. मनुष्य सोडून इतर सर्व जीवसृष्टी हि फक्त तथ्य मध्ये जगत असते. मनुष्याने आपली बुद्धिमत्ता वापरून अफाट विचार निर्मिती केली आहे. या विचाराने त्याने भौतिक प्रगती करून आपले जीवन अधिकाधिक सुखी आणि सुरक्षित केले आहे परंतु त्याच विचारांनी बनविलेल्या इतर मानसिक संकल्पना मुळे त्याचे जीवन त्याने मनोरुग्ण करून दुःखी केले आहे.

आपले विश्व आणि आपले शरीर आणि आसपासचे सर्व नैसर्गिक जीव हे आपण बदलू शकत नाही ते जसे आहे तसे स्वीकारावे लागते त्यामध्ये त्या अर्थाने निवडानीवड करता येत नाही, त्यांना टाळता येत नाही. मी माझे शरीर निवडू शकत नाही, माझे आई वडील निवडू शकत नाही, माझे भाऊबंद निवडू शकत नाही, माझे शेजारी, माझा समाज आदि मी जसे असतील तसे स्वीकारून त्या प्रमाणे राहतो. 

निसर्गाने प्रत्येक जीवास त्याच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी विचार करण्याची सोय केली आहे. इतर सर्व जीव विचारांचा तेव्हढाच विचार करतात फक्त मनुष्य प्राणी अधिक, अवांतर विचार करतो. मनुष्य प्राणी सुद्धा फक्त जीवनावश्यक विचार करून नैसर्गिक अवस्थेत राहू शकतो. इथपर्यंत विचार ठीक आहेत, आवश्यक आहेत, नैसर्गिक आहेत, त्यांना थांबविता येत नाही.

परंतु जे इतर अवांतर विचार आहेत जे कल्पना बनविते आणि त्या कल्पना रंजन करीत मनुष्य प्राणी काल्पनिक जीवन जगू लागतो, मरू आणि मारू लागतो ते गैर आहेत. 

कृष्णमूर्ती सारख्या विचारवंतांच्या हे द्वैत लक्षात येते आणि ते सांगतात की, जे काही नैसर्गिक आहे ते जसे आहे तसे स्वीकारा (what is) न बदलता (choiceless). आणि जे जीवनावश्यक विचार आहेत (reality) ते सुद्धा आवश्यक आहेत, त्यांना सुद्धा राहू द्या. फक्त ज्या धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व्यवस्था आपण विचारांच्या माध्यमातून बनविलेल्या आहेत आणि ज्या मानसिक संकल्पना मुळे आपण दुःख भोगतो फक्त त्याचे आकलन करा आणि त्यांचे खंडन करा. त्या मानसिक व्यवस्था कशा परंपरेतून तयार झाल्या हे ते स्पष्ट करतात, त्यामुळे मानसिक परंपरा मोडीत काढणे किती अगत्याचे आहे हे ते आयुष्यभर सांगत राहिले. मानसिक परंपरा आणि त्यांची अव्यवस्था लक्षात येणे ही Insight आहे त्यासाठी आत्मसाक्षात्कार लागत नाही की अपरोक्ष अनुभूती लागत नाही. हे सर्व थोतांड स्वार्थी विचारातून निर्माण झालेले आहे. 

आता या नंतर आपण समुद्र आणि समुद्रावरील लाटा या विषयाकडे येवू. वर सांगितल्या प्रमाणे तथ्य काय आहे आणि भास काय आहे हे आपण आपल्या सतसत्विवेक बुद्धी ने ओळखणे महत्वाचे आहे. हा दृष्टांत आहे त्या द्वारे असे समजविन्याचा प्रयत्न आहे की समुद्र हे एक तथ्य आहे आणि त्यावरील लाटा/फेस हे भास आहेत. 

शेत जमिनीत गवत सुद्धा उगवणार आणि पिके सुद्धा उगवणार. गवत उगवले म्हणून आपण शेत जमीन नाकारू शकत नाही, पिके नाकारू शकत नाही फक्त गवत जे अनावश्यक आहे ते उपटून फेकून देणे हि सत्सत्विवेक बुद्धी आहे. 

कृष्णमूर्ती जेव्हा आपण आणि झाड यांचे उदाहरण देवून म्हणतात की द्रष्टा आणि दृष्य एक आहे तेव्हा त्यांचा असा उद्देश नसतो की आपण म्हणजे झाड आणि झाड म्हणजे आपण. आणि ते हे नेहमी स्पष्ट करतात. 

जेव्हा आपण विचार करीत मी मी म्हणत असतो ते आपण म्हणजे आपला मानसिक मी होय, मी ची आपण मानसिक प्रतिमा बनविलेली असते आणि झाडाचा अनुभव येतो तो त्या झाडाच्या मानसिक प्रतीमेतून. या दोन्ही प्रतिमा आहेत, त्या स्मृतीमध्ये आहेत म्हणून ते मानसिक भास दृष्ट्या एक आहेत. प्रत्यक्षात आपले शरीर आणि झाड वेगवेगळे आहेत.