Saturday, October 31, 2020

अंतर्दृष्टी

ज्ञान प्राप्तीसाठी आपल्या मेंदूमध्ये काय बदल आवश्यक आहे?

आपल्या मेंदूमध्ये ईश्वरा बद्दल, विश्वाबद्दल आणि स्वतःबद्दल ज्या अफाट कल्पना आहेत त्या प्रथम सोडून द्यायची तयारी हवी. 

कल्पना कोण तयार करते त्याच्या मुळाशी आपण जायला हवे. कल्पना म्हणजे आपल्या मेंदूमधील विचारांचा अविष्कार होय. विचार हे विचार असतात ते ज्ञानीयांचे आणि अज्ञानीयांचे वेगळे असतात असे नाही. जिज्ञासा निर्माण होणे हे खूप चांगले लक्षण आहे परंतु जिज्ञासा ही ब्रह्मजिज्ञासा आहे की भीतीपोटी निर्माण झालेली जिज्ञासा आहे हा मूलभूत फरक आहे. 

ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घेणे होय. मीच ब्रह्म आहे किंवा मी ईश्वराचा अंश आहे अशा आपल्या अहंकारी मनाची ठाम समजून झालेली असेल तर ब्रम्ह आपल्या अहंकारामुळे समजणारच नाही.

संसारात निर्माण झालेले दुःख हे मेंदूतील विचारांच्या अज्ञाना मुळे आपणास भोगावे लागत असतात. अशा दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी मेंदूतील विचारांना त्यांच्या अज्ञानातून मुक्त करावे लागते. 

परमात्मा, आत्मा, पुनर्जन्म हे सर्व या परंपरा आणि श्रद्धांनी संमोहित केलेल्या मेंदूतील विचारांच्याच उत्पत्ती आहेत, कल्पना आहेत. हे लक्षात येणे म्हणजे insight आहे आणि ही insight पुढील action साठी कारणीभूत ठरते. 

बाहेर पाण्याच्या टाकी मध्ये भरपूर पाणी आहे, टाकीमधून आपल्या घरामध्ये नळ आलेला आहे, आपणास पाणी हवे आहे परंतु तो नळ आपोआप का चालू होत नाही किंवा चालू केला आणि तो परत बंद करावा लागेल परत चालू करावा लागेल, टाकीतील पाणी संपले तर काय अशा अनेकविध भीतीने आपण नळ चालूच करत नाही. 

परंपरा आणि श्रद्धा आपणास त्यांच्या विरुद्ध प्रश्न निर्माण होऊ देत नाही. 

हि मुळामध्ये निर्माण झालेली विकृती हीच महान संस्कृती आहे असे जनमानसावर हजारो वर्षांपासून ठसवले गेले आहे. त्यामुळे जनमानसांच्या हे अज्ञान सामान्यतः लक्षात येत नाही. आपल्या संकुचित विचारांच्या पलीकडे जाणे हेच त्यामुळे खूप अशक्य झाले आहे. 

जिज्ञासू मनाला प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर ते संस्कृतीने निर्माण केलेल्या संकुचित माहिती मधूनच शोधावी लागतात त्यामुळे जिज्ञासू मन पाप आणि पुण्य या विचारांच्या बाहेर पडू शकत नाही. पाप आणि पुण्यावर आधारित कर्मसंकल्पणा या आपल्या संमोहित मेंदुंच्या उत्पत्ती आहेत. त्यांच्या शिवाय इतर मार्ग शोधण्यास धाडस आवश्यक असते.

Insight अतर्दृष्टी

संसारात निर्माण झालेले दुःख हे मेंदूतील विचारांच्या अज्ञाना मुळे आपणास भोगावे लागत असतात. अशा दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी मेंदूतील विचारांना त्यांच्या अज्ञानातून मुक्त करावे लागते. आत्मा, परमात्मा या परंपरा आणि श्रद्धांनी संमोहित केलेल्या मेंदूतील विचारांच्याच उत्पत्ती आहेत, कल्पना आहेत. हे लक्षात येणे म्हणजे insight आहे आणि ही insight पुढील action साठी कारणीभूत ठरते. 

समजा एखादी व्यक्ती अतिशय दुःखामध्ये आहे, दुःख ओसरल्यावर जे काही नुकसान झाले आहे ते नुकसान भरून येणारे नाही, ते कटू सत्य आहे, आता आपणास ते विसरायला हवे, आपल्या सारखे इतर अनेकजण असेच दुःख भोगत असतात हे आकलन होणे, कळणे म्हणजेच अंतर्दृष्टी होय. हे दिसते तितके सहज नसते परंतु ते तेव्हढेच सहज ठेवणे आपल्या हिताचे असते. जीवनातील हे असे कसोटीचे क्षण आपणास सत्याच्या निकट घेऊन जात असतात. 

Insight म्हणजे अतर्दृष्टी कशी काम करते?

आपण हे असे प्रसंग सहज का घेत नाही? कुटुंब, समाज आणि त्यांचे नीतीनियम यांनी बनलेले आपले विचार आपणास त्यातून काहीतरी भलतेच करावयास भाग पाडतात आणि आगीतून निसटलेला जीव फुफाट्यात अडकत राहतो. संसारात राहून संसारातील दुःखातून मुक्त होण्याचे संसारात कोणतेही साधन उपलब्ध नाही. संसार हा ज्या विचारांनी बनलेला आहे, त्याच विचारांचे दुःख बनलेले आहे.  

Insight अंतरदृष्टि हि अचानक असते, विचारपूर्वक केलेली कृती नसते, तिचा आपल्या पूर्वज्ञानाशी संबंध नसतो, तिचा उगम आपल्या स्मृतीमधून झालेला नसतो, तिचा आपल्या भूत काळाशी संबंध नसतो, तिचा काळाशी संबंध नसतो. अंतरदृष्टी म्हणजे संपूर्ण विचार प्रक्रियेचा अभाव असतो. तिथे सत्याचे प्रत्यक्ष दर्शन असते. आणि ही अंतर्दृष्टि आपल्या मेंदूमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असते जी आपणास सत्य अवस्थेत प्रस्थापित करत असते.

सत्य अवस्था ही नित्य आहे परंतु आपले विचार तिला गाठू शकत नाहीत. त्या अवस्थेचे नामकरण आणि विवरण म्हणजे ती अवस्था नव्हे.

Saturday, October 24, 2020

Question Authority

 Question Authority – Krishnamurti

साधना म्हणजे आपण जे मान्य केले आहे अशा सर्व श्रद्धा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय. सर्व मानव निर्मित श्रद्धांचा चींतना द्वारे निरास करणे म्हणजे साधना होय. आपण गृहीत धरलेल्या ज्या सर्व श्रद्धा आहेत त्यांच्यामुळे जर आपणास सत्य समजत नसेल तर त्यांचा चींतना द्वारे निरास होणे खूप आवश्यक असते. सत्य आकलन करण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे.

अनुभव आणि माहितीद्वारे आपणास श्रद्धा माहीत झालेल्या असतात. श्रद्धा या सर्व बाहेरून आलेल्या असतात. बाहेरून आलेल्या माहितीने आपला आतील अहंकार आणि मी जास्तीत जास्त बळकट होत राहतात. श्रद्धा आणि मी चा अहंकार यातून आपली प्रत्येकाची ठराविक जीवनशैली बनत जाते. बाहेरून आलेली माहिती आणि त्यावर बनलेला आपला मी याबाबत आपण कधीच प्रश्नचिन्ह निर्माण करीत नाही. श्रद्धा बाबत आपणास माहिती असते. त्या कशा निर्माण झाल्या, कुठून आल्या यांची उत्तरे माहित असतात कारण त्यांची भरमसाठ उत्तरे अपप्रचारा द्वारे आपणापर्यंत आलेली असतात, आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. त्यामुळे त्यांच्या विषयी प्रश्न निर्माण आपण करतच नाही. अशाप्रकारे हजारो वर्षापासून मानवी मन संमोहित झाले आहे, फसत गेले आहे, मानवी समाज अजूनही दुखांच्या खाईत आहे. मानवी मनाने निर्माण केलेल्या श्रद्धांनी मानवी समस्या अधिकच भीषण बनल्या आहेत, म्हणून मला सर्व प्रकारच्या मानवी श्रद्धांचा पुनर्विचार करणे क्रमप्राप्त आहे हे लक्षात येणे यालाच कृष्णमूर्ती इंटेलिजन्स असे संबोधतात, परंपरा त्याला विवेक बुद्धी असे समजते, हीच ज्ञानप्राप्ती ची गुरुकिल्ली आहे. 


Tuesday, October 20, 2020

समाधि

In meditation, life is a total movement, not fragmented, not broken up as the ‘me’ and the ‘you’. In meditation, there is no 'me' to experience. – J Krishnamurti

आपली अशी अवस्था जेव्हा होईल कि ज्या अवस्थेमध्ये मी आणि तू असा भेदभाव असणार नाही, आपले संपूर्ण जीवन हे एकच असेल, जीवनामध्ये अहंकार नसेल, मी नसेल, अशा अवस्थेस समाधिस्थ अवस्था म्हणता येईल.

जाणिवेचे दोन प्रकार म्हणता येतील एक वैयक्तिक आणि दुसरी वैश्विक. वैयक्तिक जाणीव मध्ये आपल्या मेंदूतील विचार येत असतात आणि वैश्विक जाणिवेस आपण वैश्विक मन असे म्हणू शकतो. वैश्विक जाणीव मध्ये अपार ज्ञान, अपार करुणा, अपार प्रेम समाविष्ट असते याउलट मेंदूतील विचारांमध्ये स्वार्थी विचार, द्वेष, मत्सर, अज्ञान आदी समाविष्ट असतात. आपल्या मेंदूतील वैयक्तिक स्वार्थी विचारांमुळे आपणास सुख दुःख भोगावे लागतात. आपणास आपल्या दुःखापासून मुक्ती हवी असेल, अज्ञानापासून मुक्ती हवी असेल तर आपणास आपले स्वार्थी विचार थांबवावे लागतील. स्वार्थी विचार थांबविल्या नंतर वैश्विक ज्ञान, वैश्विक करुणा आपल्या अंतरंगात प्रवेश करते आणि आपणास मानसिक सुख दुःखापासून मुक्ती प्राप्त होते. 

जो स्वतः शांत झाला नाही आणि जो स्वतः सुखदुःखा पलीकडे गेला नाही तो इतरांना सुखी करू शकत नाही, इतरांना मार्गदर्शन करू शकत नाही. जी अज्ञानी मंडळी राजकीय नेते असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, धार्मिक गुरु असोत जे इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात, इतरांचे जीवन बदलण्याचे मार्गदर्शन करतात ते सर्व स्वार्थी विचारातून निर्माण होत असतात. स्वार्थी विचारातून निर्माण झालेले कोणतेही तत्त्वज्ञान मनुष्य समाजाला सुख दुःखा पासून मुक्ती देऊ शकणार नाही.

मानसिक सुख दुःखापासून मुक्ती प्राप्त होण्यासाठी आपणास मेंदूतील स्वार्थी विचारापासून अलिप्त राहून वैश्‍विक मनाच्या दालनात प्रवेश करावाच लागेल. आणि हे प्रत्येकाने स्वतः करावयाचे आहे, इतर कोणीही मदत करू शकत नाही. जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. 

हजारो वर्षांपासून आपणावर हेच संस्कार झाले आहेत की कोणीतरी स्वर्गातून येवुन मदत करील, कोणी साधू संत मदत करतील, सरकार मदत करेल, सामाजिक संस्था मदत करतील, शेजारी मदत करतील, घरातील वडीलधारी मदत करतील आपण वाट पहात राहायचे. अहंकार प्रत्येकास मी किती महान ज्ञानी आहे हेच सतत सांगत असतो त्यामुळे आपण ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच करत नाही, ज्ञान प्राप्ती साठी केलेला प्रयत्नातून आपण अज्ञानी आहोत हे लपविण्यासाठी.

Sunday, October 18, 2020

विचार आणि मन

एका साधक मित्रा बरोबर चर्चा करताना त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की, ब्रम्ह तत्व हे स्वतःस जाणीत नाही, त्याच्या ठायी जाणीव नेणीव नाही. पृथ्वी तलावरील जीवांना काय हवे व काय नको हे त्या तत्वाच्या गावीही नसेल. मग बऱ्याचदा आपणास अज्ञात शक्ती कडून मदत आणि मार्गदर्शन केले जाते असा अनेकांचा अनुभव असतो. हे नेमके कोण करते? की तो योगायोग असतात?

या विषया वर तत्वचींतक श्री विजय पांढरे सरांचे चिंतन ( https://vijaypandhare.blogspot.com/2020/10/blog-post_17.html?m=1 ) वाचण्यात आले आणि J Krishnamurti आणि Dr Bohm यांची चर्चा याच विषयावर ऐकायला मिळाली. ( https://youtu.be/VVTiAw7K-bw ) हा सुद्धा योगायोग नसावा.

श्री पांढरे सरांनी consciousness चे वेगवेगळे स्तर सांगून ते एकमेकांशी कसे संबंधित आहे हे सांगितले.

कृष्णमूर्ती आणि Dr Bohm यांच्या संवादातून अनेक नवीन गोष्टी समजल्या. पूर्वसुरिंचे न ऐकता या दोघांचे का ऐकावे? असा प्रश्न उपस्थित केला जावू शकतो. Dr Bohm हे Einstein बरोबर काम केलेले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या analytical mind ने कृष्णमूर्ती सारख्या दार्शनिका कडून जास्तीत जास्त तत्वांचे निरसन करून घेतले आहेत. दोघांनी एकेक पायरी चढत, एकेक संकल्पना विशद करत सत्याप्रत साधकास ते त्यांच्या सुसंवाद द्वारे घेवून जातात, कोणत्याही धार्मिक श्रद्धांचा आधार न घेता.

या दोघांच्या चर्चेमध्ये असे समजते की, आपला प्रत्येकाचा वैयक्तिक मेंदू हा जन्मतः आपल्या वांशिक जडण घडणी नुसार आणि नंतरच्या बालपना पासूनच्या संस्कारांनी संमोहित झालेला असतो. त्या समोहनानुसर आपला मेंदू विचार करीत असतो, जे विचार आपल्या वरील संस्कार नुसार संकुचित असतात.

या उलट मन हे वैश्विक असते, सर्वत्र असते ज्यामध्ये intelligence, compassion, silence यांचा भरणा असतो. आपला मेंदू आणि आपले संकुचित विचार जोपर्यंत वैयक्तिक, स्वार्थी, संकुचित विचार करणे थांबत नाहीत तोपर्यंत वैश्विक मन आपल्या अंतरंगात प्रवेश करत नाही. 

Silence is the key. अपेक्षा रहित जीवन जगताना वैश्विक मन आपल्या मध्ये अवतरीत होते, त्यामध्ये आपला मी विरघळत जातो आणि आपले स्वार्थी आचार आणि विचार सुद्धा वैश्विक होतात. 

विचार आणि मन यामध्ये फरक करायला हवा. आपल्या मेंदूतील विचार ज्यांना खरेतर अविचार म्हणायला हवेत थांबले की वैश्विक बुद्धिमत्ता, वैश्विक शांती आणि वैश्विक करुणा यांचे संयुक्तिक मन आपल्या अस्तित्वात उतरते आणि आपले जीवन वैश्विक होते. अशा अद्वैत अवस्थेमध्ये दुही नाही, द्वेष नाही, अपेक्षा नाही, चिंता नाही, काळजी नाही, देवाक काळजी अशी नैसर्गिक अवस्था निर्माण होते.

Saturday, October 17, 2020

गुरु आणि संप्रदाय

आपणा बहुतेकांचा अध्यात्मिक प्रवास हा कोणत्या तरी अध्यात्मिक संप्रदायाशी संबंध आल्याने सुरू होतो अथवा आपण त्या संप्रदायाशी संबंध जोडतो. याचे कारण असे असते की त्यांनी आपणास आपल्या दुःखातून मुक्तीचे आश्वासन दिलेले असते. आणि आपण सर्वजण जीवनामध्ये सुरक्षा अपेक्षित असतो तसेच मानसिक आणि भावनिक सुखाची लालसा ठेवून असतो. आपली हीच लालसा त्यांच्या कडून आपले शोषण करण्यास कारणीभूत ठरते. अशा कोणत्याही संप्रदायाच्या जवळ अथवा गुरु जवळ काहीही अध्यात्मिक शक्ती नसते. बाह्य संप्रदाय आणि गुरु आपणास आपल्या दुःखातून, अज्ञानातून मुक्ती देवू शकत नाहीत याची खात्री बाळगा आणि तीच शक्ती स्वतःचा शोध घेण्यात खर्च करा. काय सत्य आहे आणि काय सत्य नाही असे काहीही गृहीत न धरता फक्त अनुभव म्हणजे काय आहे आणि त्यामध्ये मी कसा निर्माण होतो याचा शोध घ्यावा.

Most of us follow so-called spiritual organizations because they promise rewards. and as most of us are seeking spiritual security, emotional or mental comfort, we succumb to these promises and become instruments of exploitation. these organizations exist because of our craving for our own spiritual well-being and comfort. They have nothing spiritual about them, nor can they free man from sorrow, confusion and ignorance.

J Krishnamurti.

Ojai

17 May 1936


Tuesday, October 13, 2020

मन आणि श्रद्धा



आपण जिथे रहात आहोत तिथे इतरही असंख्य जीव रहात आहेत. लाखो वर्षांच्या संघर्षातून प्रत्येक जीव आपले जीवन निसर्ग नियमांशी सुसंगत ठेवीत जीवन कंठीत असतात. मनुष्य प्राण्याच्या मेंदूमध्ये अतिरिक्त विचार जन्म घेवू लागले, त्यातून त्याची बुद्धिमत्ता इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित झाली आणि त्याने आपले जीवन जास्तीत जास्त सुरक्षित आणि सुखी केले. त्याच बुध्दीचा वापर करून तो जास्तीत जास्त स्वार्थी सुद्धा बनला. सुखी जीवन हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असे तो मानू लागला. आपण सर्वजण निसर्गाचे भाग आहोत, सर्वांनी सलोख्याने राहायला हवे हे तो विसरला. निसर्गातील इतर जीवांची हत्या करत तो स्वतःच्या मनुष्य बांधवांची सुद्धा हत्या करू लागला. इतर जिवांपेक्षा सुसंस्कृत होवून सुद्धा तो अजून आपली आदिवासी हिंसक वृत्ती सोडायला तयार नाही. सत्ता आणि संपत्ती मिळविण्यासाठी तो अजुनही असंख्य जीवांची हत्या करीत आहे. बलिष्टांच्या हव्यासामुळे इतर जीवांची कुचंबणा होते, त्यांच्या जगण्याच्या हक्कावर अतिक्रमण केले जाते. त्यातून गरिबी, अज्ञान यामुळे सामान्य जन दुःखात पिचत आपले जीवन कंठत राहतात. आशेचा किरण दिसत नसताना अज्ञात, दैवी शक्तीचा मानवी मनाने आभास तयार केला. आपणच आपल्या अधोगतीला जबाबदार आहोत, आपण निसर्गाशी घेतलेल्या फारकती मुळे आपण दुःख भोगत आहोत हे समजून घेण्या ऐवजी दैवी शक्तीच्या प्रसादाने आपण दुःख मुक्त होवू अशी घट्ट मानसिकता तयार केली गेली. दैवी शक्तींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मग त्यांची आराधना, उपासना यांचे स्तोम निर्माण झाले. आपल्या दुःखाचे मूळ कारण विसरून जावून त्या ऐवजी दुःख निवारणार्थ श्रद्धांचे डोंगर उभे केले गेले. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्र्वरी मुळे मनुष्य जातीचे दुःख निवारण तर झालेच नाही उलट श्रद्धांचे भूत मानगुटीवर बसले. 

आपले मन हे जसे एक आभास असून त्याने आपल्या अस्तित्वाचा पूर्ण ताबा घेतला आहे तद्वत श्रद्धा स्थानानी संपूर्ण मानव समाजाच्या बुध्दीचा ताबा घेतला आहे. 

God is an abstraction made by thought which cannot understand the world in which it lives - its suffering, agony and misery. Thought therefore creates an outside agency which it worships. - J Krishnamurti

Public Talk 1 in New Delhi, 24 November 1973