Wednesday, July 25, 2018

पांडुरंग... विठ्ठला



पांडुरंग विठ्ठलाचि ईतरत्र अनेक मंदिरे आहेत परंतु मुळ क्षेत्र हे पंढरपुर आहे. पंढरपुरच का यामागचा इतिहास जाणणे खुप महत्वाचे आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्या | वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।

ई.स.आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी भिमा नदीकाठच्या महायोगाचे क्षेत्र असणाऱ्या पंढरपुर येथील पांडुरंगाचे स्तोत्र 'पांडुरंगाकष्टकम' गायले आहे. वरं पुंडरीकाय (पुंडलीक वरदा...) म्हणजे भक्त पुंडलीकाला आशीर्वाद देण्यासाठी अवतरलेल्या परब्रह्मलिङ्गं, शिवं, शांतं परमेश्वराचे हे स्तोत्र आहे. याचा अर्थ पांडुरंगाचे क्षेत्र हे आठव्या शतकापुर्वीचे आहे व क्षेत्रपती पुंडलिकांचा त्यामध्ये स्पष्ट ऊल्लेख आहे. विठ्ठल हे नाव नंतर आलेले आहे.

भक्त पुंडलीक हे सहाव्या शतकापुर्वी होऊन गेलेले असावेत कारण सहाव्या शतकातील राष्ट्रकुटांच्या ताम्रपटामध्ये पांडुरंगाचा ऊल्लेख आहे. भक्त पुंडलिकांचा फार मोठा संप्रदाय असावा ज्याचे त्यावेळचे व नंतरचे राजे महाराजे शिष्य असावेत. भक्त पुंडलीक व पांडुरंगाचि मुर्ती पाहता या दोघांचा शैव संप्रदायामधिल कुंडलीनी महायोगाशी खुप जवळचा संबंध असावा असे नक्किच लक्षात येते.

कुंडलिनी, कुंडलीक, पुंडलीक, पांडुरंग, पंढरपुर या नावामधुन सुध्दा बऱ्याच गोष्टि स्पष्ट होतात. कुंडलिनी महायोगाचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये खुप लांबलचक व सुंदर वर्णन केलेले आहे. कुंडलिनी महायोग हा शिव व शक्ति यांच्या अध्यात्मिक व सांसारिक समन्वयाचा शास्त्रशुध्द योगप्रकार आहे. शैव संप्रदायामधिल नाथ संप्रदाय व तांत्रीक संप्रदायांनी त्याचा अध्यात्मिक साधनेसाठि खुप वापर केलेला आहे. नंतरच्या ईतर सामान्य संप्रदायांमुळे हा योगप्रकार सामान्य जनते पासुन अलिप्त राहिला आहे.

साधनावस्थेच्या सुरूवातीस साधक हा संसारी असतो म्हणजे स्त्रीशक्तिस्वरूप असतो परंतु जसजशी त्याचि साधना वाढत जाते व पराकोटिस पोहोचते त्यावेळी तो शिवस्वरूप होतो. हि कुंडलिनी महायोगाचि अतिशय थोडक्यात  माहिती म्हणता येईल. पाठिच्या मेरूदंडाच्या तळाशी मुलाधार चक्र आहे तिथे कुंडलिनी शक्ति साडेतीन वेटोळे घातलेल्या सर्पाच्या आकारामध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये असते. ध्यानसाधने मुळे मुलाधार चक्रास गती मिळते व शक्ति जागृत होऊन ती मेरूदंडामधिल सुषुम्ना नाडिमधुन वरवर सरकु लागते. ऊर्ध्वगमन करताना ती नाभी, ह्रदय, कंठ, दोन्ही भुवयांमधिल चक्रांना गतिमान करत मस्तकावरील सहस्त्रार चक्रापर्यंत येते जिथे भगवान शिवांचे स्थान आहे. शक्तिचे शिवाशी मिलन होते व साधकास परम समाधिअवस्था प्राप्त होते. समाधि अवस्थेमध्ये त्याला शिवाच्या पांढऱ्या शुभ्र म्हणजे त्यावेळच्या भाषेमधिल पांढुर रंगाचे दर्शन होते व त्यावरून पांढुररंग... पांडुरंग हे ईश्वराचे नाव पडले असावे.

साधकाच्या मुलाधार ते सहस्त्रार चक्रापर्यंतचा प्रवासाचे मुर्त स्वरूप म्हणजे पांडुरंगाचि मुर्ती होय. पांडुरंग वा मुर्तीमधिल आकाराचे कोणत्याहि वैदिक वा पौराणिक ग्रंथांमध्ये ऊल्लेख नाहित म्हणजेच हि मुर्ती कोणत्याहि हिंदु दैवतांची नाहि. जैन वा बौध्दांच्या शिल्पकलेशी कसलेहि साधर्म्य नाहि त्यामुळे ती महावीर वा बुध्दाचिहि नाहि. हिंदु, जैन व बौध्द या भारतीय धर्माशि कसलाहि संबंध नसतानाही हे क्षेत्र ईतके प्रसिध्द का असावे याचा विचार होणे आवश्यक आहे.

भक्त पुंडलिकांच्या कुंडलिनी महायोगामुळे अनेकांना अध्यात्मिक अनुभवांचि प्रचीती तात्काळ येत असावी त्यामुळे हे क्षेत्र ऊत्तर भारतीय धर्मांचे प्राबल्य निर्माण होण्यापुर्वी दक्षिणेकडिल निधर्मी सर्वसामान्यांच्या अध्यात्मिक ऊन्नतीचे फार मोठे केंद्र झाले असावे.

पांडुरंगाच्या ऊघड्या मुर्तिचा अभ्यास केला असता, पायाशी विट आहे, विट म्हणजे साधनेचा मुळ आधार असलेल्या मुलाधार चक्राची ती प्रतीक आहे. मुर्तीच्या मान ते कंबरेचे साधर्म्य हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. कमरेवरील हात हे एकमेकांना भेदुन जाणाऱ्या ईडा व पिंगळा नाडिंचे ते प्रतिक आहे. मधले शरीर हे सुषुम्ना नाडिचे प्रतिक आहे. डोक्यावरील शिवलींग हे शिवाचे प्रतिक आहे. कुंडलिनी महायोगाचे प्रतिक म्हणुन शिवलिंग व काहि ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचे प्रतिके वापरतात. शिवलिंगाचा खालील भाग योनी व वरील भाग हा लींग असा बिभस्त प्रकार दिसतो म्हणुन कदाचित भक्त पुंडलिकांनी शिव-शक्तिंच्या समाधि योगाचे नवीन प्रतिक म्हणुन हि मुर्ती तयार केली असावी. गळ्याखाली हि मुर्ती स्त्रीशक्ति स्वरूप दिसते तर गळ्यावरती ती शिवस्वरूप दिसते. तामिळ, आंध्रा, केरळ, कर्नाटक सहित महाराष्ट्र, गुजरात मधिल मुल निवासी भारतीय या मु्र्तीच्या ईतक्या प्रेमात का पडला असावा याचे खरे कारण म्हणजे शिव-शक्तिच्या समाधि मिलनाच्या साधनेचे ते एकमेव सत्य स्वरूप होय. सुमारे पाचशे वर्षानंतरच्या मराठि व कानडी संतांना हि माहीती ऊपलब्ध असणे शक्य नव्हते. त्यामुळे नंतरच्या वैष्णवी भक्ती संप्रदायांनी तिचि विष्णु, कृष्ण व विठ्ठल या स्वरूपामध्ये भक्ति सुरू केली असावी. भक्त पुंडलिकांच्या मंदिरा शेजारी मोठया पितळी नागाचि मुर्ती नेहमी असते, कुंडलीनी शक्तिचे तेही एक प्रतीक आहे.

शोध अस्तित्वाचा

वैज्ञानीक संशोधना मधुन हे सिध्द झाले आहे कि, १३.७ अब्ज वर्षांपूर्वी आतासारखे विश्व नव्हते. आताच्या विश्वामधिल सर्व ग्रह, तारे, आकाशगंगा मिळुन एक फार मोठि अजस्त्र अशी प्रचंड तापमानाचि एकच एक वस्तु अस्तित्वात होती. १३.७ अब्ज वर्षांपूर्वी त्या अजस्त्र वस्तुमध्ये प्रचंड मोठा महास्फोट झाला. त्या महास्फोटामुळे त्या अजस्त्र वस्तुमधिल सर्व काहि प्रचंड वेगाने सर्वदुर फेकले गेले. सुरूवातीस प्रचंड गती, प्रचंड ऊष्णता, एकमेकांवर आदळ आपट करत करत विश्व हळु हळु शांत होऊ लागले. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांच्या कोट्यावधि आकाशगंगा, तारे, ग्रह, ऊपग्रह, धुमकेतु आदि बनले गेले.
साधारणपणे महास्फोटा नंतर ६०० दशलक्ष वर्षांनंतर आपली आकाशगंगा बनली गेली. महास्फोटाच्या ९.५७ अब्ज वर्षांनंतर पृथ्वीसह आठ मोठ्या ग्रहांचे मिळुन आपले सौर मंडल विकसित झाले. पृ्थ्वी ग्रहावर थिअया नावाच्या एका छोट्या ग्रहाने जोरदार धडक मारली व त्यामधुन चंद्र या पृथ्वीच्या ऊपग्रहाचि निर्मिती झाली.
पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाल्यानंतर पृथ्वीवर जल निर्मिती झाली व कालांतराने सुमारे ३ अब्ज वर्षापुर्वी पासुन पृथ्वीवर जिवाश्म निर्मिती सुरू झाली. जिवाश्मापासुन प्राणवायु तयार झाला. नंतर वनस्पती, किटक, पशु, पक्षी यांनी पृथ्वी गजबजुन गेली. २ दशलक्ष वर्षांपूर्वी मनुष्याचा आद्य पुर्वज आदिमानव निर्माण झाला.
७५ हजार वर्षांपूर्वी आशिया खंडामधिल तोबा या बेटावर प्रचंड मोठा ज्वालामुखीचा विस्फोट झाला. संपुर्ण पृथ्वीवर त्यामधिल विषारी वायु, रसायने, राख पसरली गेली. ९९% जिवसृष्टिचा विनाश झाला, पृथ्वीचे तापमान ४°C ईतके कमी झाले, व नंतर १० वर्षे पृथ्वीवर हिमयुग अवतरले होते. अन्न व पाणि नाहिसे झाले होते. संपुर्ण पृथ्वीवर मध्य आफ्रिकेमधिल घनदाट जंगलामधिल फक्त ५००० च्या आसपास वन्यमनुष्य जिवंत राहिले होते. अचानक झालेल्या वातावरणा मधिल बदलाने घाबरून त्या सर्वांनी एकत्रीतपणे आफ्रिका सोडुन समुद्राच्या कडे कडेने पुर्व दिशेला मार्गक्रमण सुरू केले. अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये आफ्रिका, अरबस्तान मार्गे ते मजल दरमजल करत भारतामध्ये आले. भारतामध्ये तोपर्यंत वातावरण पुर्ववत झाले होते, अन्न व पाणि मुबलक मिळु लागले होते. भिषण परिस्थितीचा सामना करत आलेल्या त्या मनुष्य समुहाला भारत नंदनवन वाटु लागला व त्यांनी भारतामध्ये आपले बस्तान बसविले. शेती व गुरे पाळत त्यांनी आपली भाषा व रितीरिवाज समृध्द केले. हा एकत्र राहिलेला, समान भाषा बोलणारा व समान रीतीरिवाज पाळणारा मनुष्य समाज हळुहळू चारी दिशांना फैलावु लागला. भारतामधुन हाच मानव समाज युरोप, दक्षिण पुर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, ऊत्तर ध्रुव सगळीकडे पसरला. ५०,००० वर्षापासुन ते ३००० वर्षापुर्वी पर्यंतचा आधुनिक मानव हा देव व धर्म न मानता स्वतःच्या धाडसाच्या व बुध्दिमत्तेच्या जोरावर सर्व पृथ्वीवर निसर्गाशी एकरूप होऊन गुण्या गोविंदाने नांदत होता याचि साक्ष ईजिप्त, ईराण, भारतामधिल सिंधु संस्कृतीने दिली आहे. परंतु पोट भरले कि तत्वज्ञान सुचु लागते. माणसाची बुध्दिमत्ता जसजशी वाढु लागली तसतसे त्याला आकाश ठेंगणे वाटु लागले व त्याने आपल्या बुध्दिचि अचाट कल्पकता वापरून आकाशा मधिल बापाचा शोध लावला!!!
आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर 'आपण विचार करतो म्हणुन आपण आहोत' असे म्हणुन पाश्चात्य तत्वचिंतक गप्प बसले व वैज्ञानीक संशोधनाच्या मागे लागले. भारतीय नेहमी एक पाऊल पुढे असतात. आपल्या तत्वचिंतकांनी विचारशुन्य अवस्थेचा काल्पनीक शोध लावला व विचार नाहि म्हणजे आपण नाहि, हे जग सत्य नसुन एक माया आहे व या मायावी विश्वापलीकडे ईश्वर आहे व तोच एक सत्य आहे! झाले पिढ्यानपिढ्या सगळे अफाट बुध्दिमत्तेचे तरूण संन्यासी होऊन अफु गांजा सेवन करून विश्वा पलीकडिल ईश्वराचा शोध घेऊ लागले. देश दरिद्री झाला, नपुंसक झाला व परकिय सत्तांचा अगदि सहज गुलाम झाला. ज्या तत्वज्ञानाने भारत व भारतीयांचा विकास झाला नाहि तेच तत्वज्ञान परदेशात निर्यात केले जात आहे! विज्ञान व तंत्रज्ञान युगातील भारताचे पंतप्रधान परदेशात गायी घेऊन फिरत आहेत, हे किती भयानक व विदारक चित्र आहे?
करोडो वर्षामध्ये पृथ्वीवर जि काही उलथापालथ झाली त्यातुन अपवादाने प्रथम जिवसृष्टि व नंतर मानव प्राणि निर्माण झाला. पृथ्वी शिवाय ईतरत्र जशीच्या तशी उलथापालथ झाली असेल व तीथेहि जिवसृष्टि असेलच याचि फार कमी शक्यता आहे. त्यामुळे आपले अस्तीत्व फक्त या शरीरापुरतेच मर्यादित आहे. मनाच्या नादि लागुन आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यांचे खेळ बंद करून आपण आपला, आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास करूया.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पृथ्वीवरच्या सर्व जिवसृष्टिवर अधिराज्य गाजविणाऱ्या मानव प्राण्यामध्येच नंतर आपापसामध्ये स्पर्धा सुरू झाली. निसर्गाच्या नियमाविरूध्द राजसत्ता व धर्मसत्ता उदयास आल्या. त्यांच्यामध्ये एकमेकावर कुरघोडि करण्यासाठि एकिकडे रक्तरंजीत संघर्ष तर दुसरीकडे आधुनिक शस्त्रास्त्रांसाठिचे वैज्ञानिक संशोधन सुरू झाले. मानवता बाजुला पडली व सर्व गोष्टिंचे धर्मकारण व राजकारण सुरू झाले. या काळातील काहि महत्वाच्या घटना:

५००० वर्षापुर्वी ईजिप्त ते भारता पर्यंतचि सिंधु संस्कृती निर्माण झाली.
३५०० वर्षापुर्वी भारतामध्ये ऋग्वेदाचि निर्मिती
३२०० वर्षापुर्वी ईस्त्रायल येथे मोजेस या ज्यु धर्मगुरूने १० धर्माज्ञा दिल्या
२८०० वर्षापुर्वीच्या छांदोग्य ऊपनिषदामध्ये श्रीकृष्णाचा ऊल्लेख
२६०० वर्षापुर्वी ईराण मध्ये पारशी साम्राज्य व धर्म स्थापना
२५०० वर्षापुर्वी महावीर जैन व गौतम बुध्द यांचा जन्म व त्यांच्या धर्मांचि स्थापना
२३०० वर्षापुर्वी चंद्रगुप्त मौर्य याचे भारतामध्ये तर अलेक्झांडर याचे युरोपमध्ये साम्राज्य
२२०० वर्षापुर्वी सम्राट अशोक याचे साम्राज्य
२०२७ वर्षापुर्वी १५०० वर्षे युरोप, आफ्रिका व आशिया वर अधिपत्य गाजविणाऱ्या रोमन साम्राज्याचा ऊदय.
२००० येशु ख्रिस्त यांचा जन्म
१८०० वर्षापुर्वी भारतामध्ये गुप्त साम्राज्य, पुराण कथा व मंदिर निर्मितीस चालना
१४०० वर्षापुर्वी अरबस्तानात मोहम्मद पैगंबर यांचा इस्लाम धर्म
१२०० वर्षापुर्वी आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचि शिकवण भारतामध्ये रूजविली जि पुढे जाऊन हिंदु धर्माचा पाया बनला.
१५२६ भारतामध्ये बाबरचे मुघल साम्राज्य
१६७४ शिव राज्याभिषेक, मराठा साम्राज्य
१७०० पंजाब मध्ये गुरू नानक यांनी शिख धर्माची स्थापना केली.
१८५० भारतामध्ये ब्रिटिश कंपनीचे राज्य
१९१४ प्रथम विश्व युध्द, ३-४ कोटि मनुष्य हानी
१९३९ - १९४५ द्वितिय विश्व युध्द, ६ - ७ कोटि मनुष्य हानी, ब्रिटिश साम्राज्याचा अंत
१९४७ भारताची फाळणि व स्वातंत्र्य

लाखो वर्षांच्या मानवी ईतिहासामध्ये अलीकडच्या २-३ हजार वर्षापासुन देव, देश व धर्म यांचे खुळ मुठभर चतुर लोकांनी बहुसंख्य अज्ञानी लोकांच्या गळी ऊतरवले आहे. बहुसंख्य अज्ञानी समाज हा देव व धर्म यांच्यावरील श्रध्दांमुळे धार्मिक गुरूंच्या मोहजालामध्ये अलगद सापडला जातो. राजकिय नेते हे धर्मगुरू व धर्माला राजाश्रय देतात व देवाधर्माच्या नावाखाली अनियंत्रीत राज्य करतात हा ढळढळीत ईतिहास आहे. अमेरिकन, फ्रेंच, रशियन सामाजिक क्रांतीने धर्माला राजकारणा पासून वेगळे केले होते. भारतामध्ये गांधी व नेहरूंनीही धर्मास बाजुस ठेऊन निधर्मी प्रजासत्ताक निर्माण केले होते. परंतु भारत व ईतरत्र धर्म व राजकारण परत एक होत आहेत, परत मानवी रक्त सांडण्यासाठि. जोपर्यंत बहुसंख्य समाजाला खरा शास्त्रीय ईतिहास माहित होणार नाही तोपर्यंत मुठभर धर्मगुरू व भ्रष्ट राज्यकर्ते खोटा ईतिहास अंधश्रध्दांच्या अपप्रचाराद्वारे पसरवुन त्यांचि पिळवणुक करत रहाणार.

https://youtu.be/MX8j7aPnAuI

Friday, July 20, 2018

विठ्ठला तु वेडा कुंभार


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार |
     विठ्ठला तु वेडा कुंभार ||

मुक्ततेसाठि पुर्ण स्वातंत्र्य व पुर्ण स्वावलंबन आवश्यक आहे. मुक्तता हि कोणत्याहि साधनेने, कोणत्याहि ज्ञानाने वा कोणाच्याहि मदति शिवाय मिळत असते. मुक्ततेसाठि आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर जगातील कोणताहि जिवंत अथवा मृत गुरू आपणास मदत करू शकणार नाहि. ऊलट त्याचि संगत, त्याचि शिकवण व त्यांच्या साधना आपल्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करून आपला प्रवास लांबवु शकतात. मुक्ततेचा मार्ग हा पुर्णपणे निर्मळतेच्या तत्वावर आधारीत आहे तिथे ऊष्टे, खरकटे, फुकटे, ऊसनवार वा कर्जदार ज्ञानी बिलकुल चालत नाहित.

आपण कधि लक्षपुर्वक विचार केला आहे काय कि आपणास नक्की काय हवे आहे व ति आपली स्वतःचि ईच्छा आहे कि दुसऱ्यांच्या ईच्छांना आपण आपली ईच्छा समजत आहोत? ज्यावेळी आपल्या हे लक्षात येते कि आपण ईतरांनी सांगितलेले प्राप्त करण्यासाठीच जिवनभर धडपडत आहोत, त्यावेळी मग आपली ती प्राप्तिचि धडपड कमी होत जाते व ते आपले मुक्ततेच्या मार्गावरील पहिले पाऊल असते.

सर्व ईच्छांचा त्याग करणे हे जरी आवश्यक असले तरी त्याग करणे हि सुध्दा एक ईच्छाच आहे. मुद्दामहून एखादि गोष्ट करणे वा न करणे हे काहितरी करण्यासारखेच असते व त्यामधुन आपली प्राप्तिचि ईच्छा झळकत असतेच. अतिशय साधे व सहज जिवन जगणे हे खुप अवघड असते. अंतिम अवस्थेमध्ये यामुळे साधक अतिशय गोंधळुन जातो. मुद्दामहून काहि विशेष न करता व कोणतीहि बाह्य मदत न घेता सहज जिवन जगता आले कि आपले विचार कमी होतात व आपले शोधकार्य समाप्त होते. जोपर्यंत काहि हवे आहे तोपर्यंत शोध चालूच रहातो. परंतु अशी एक अवस्था आपल्या जिवनामध्ये येते ज्यावेळी आपणास जगाकडुन कसलीच अपेक्षा रहात नाहि तीच मुक्तावस्था होय बाकी सुख, आनंद, शांती वगैरे सर्व मनाचे खेळ आहेत जे ईतरांनी आपल्या डोक्यामध्ये टाकलेले त्यांचे ऊष्टे ज्ञान असते. 

आपले शरीर व भोवतालचे विश्व हेच केवळ सत्य आहे. या विश्वापलीकडे दुसरा कोणताहि स्वर्ग वा अध्यात्मिक विश्व नाहिये. आपल्या कडील पुर्व ज्ञानाच्या आधारे आपण अवती भोवतीच्या गोष्टि ओळखतो वा त्या अनुभव करत असतो. जर हे पुर्व ज्ञान व विचार आपणाकडे नसतील तर आपण आपल्या शरिरा सकट आपल्या भोवतालच्या विश्वाचा अनुभव करू शकणार नाहि. दररोजच्या गाढ झोपेमध्ये आपण याचा नित्य प्रत्यय घेत असतो. मग समाधीच्या प्रगाढ शांत अवस्थेमध्ये कोणी कसा काय बरे निर्गुण, निराकार अवस्थेचा शोध लावु शकेल? अनुभव घेणे हि मनाची एक क्रिया आहे ती साधक व साधु या दोघांमध्ये सारखीच असते. साधकास अनुभव येऊ शकत नाही परंतु साधुस तो अनुभव येतो असे म्हणणे चुकीचे व तो एकप्रकारे फसवणुकिचा प्रकार आहे.

मानवी उत्क्रांतीच्या एका ठराविक टप्प्यावर चार पायांवर आडवे रेंगणारा आदिम मानव दोन पायांवर ऊभा राहू लागला. त्यावेळी त्याच्या मज्जासंस्था व मेंदुचा वेगाने विकास होऊ लागला, तो अधिक विचार करू लागला, त्याच्या भाषेचा ऊदय झाला, त्याचि संवाद प्रक्रिया सुधारली, तो शस्त्रे बनवु लागला, तो शेती करू लागला, तो कपडे घालु लागला व त्यामधुनच तो आपल्या अवती भोवतीच्या ईतर प्राण्यांहुन स्वतःस श्रेष्ठ व विशेष असा जिव समजु लागला. निसर्गापासुन तो स्वतःस वेगळे करू लागला व त्याचवेळी त्याने विचारांच्या कल्पनेमधुन आपल्या भोवती चैतन्य, ईश्वर, भुतप्रेत यांचे एक काल्पनीक विश्व निर्माण केले. आपल्या नैसर्गिक विश्वामध्ये नसलेल्या गोष्टींच्या कल्पना तो त्या काल्पनीक विश्वामध्ये रंगवु लागला. संपुर्ण मानवजातीचि हि एक शोकांतिका आहे कि जे विश्व अस्तित्वात नाहि त्याचा कधिहि न संपणारा अखंड शोध सुरू झाला. या शोधावर कोणी आक्षेप घेऊ नये यासाठी त्याला धर्माचे व श्रध्दांचे स्वरूप दिले गेले. यास मानवी संस्कार व संस्कृतीचा सुरेख मुलामा दिला गेला आहे व तो मुलामा ईतका घट्टपणे मिसळला गेला आहे कि आपण आता त्याविना जगु शकत नाहि, आपण त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. सतत प्राप्त होऊ शकणाऱ्या सुखाच्या व आनंदाच्या शोधाच्या प्रयत्नात मानवजातीने आपली नैसर्गिक अवस्था हरवली आहे व हेच आपल्या सर्वांच्या दुःखाचे मुळ कारण आहे. निसर्गाच्या या अद्भुत व अद्वितीय अशा वसुंधरेचा आपण जास्त सुखाच्या हव्यासाने ईतका विनाश केला आहे व तिला ईतके विद्रुप केले आहे कि तिच्यावरील सुखाने जगणारे ईतर अनेक जिवजंतु व पशुपक्षी नामशेष होत चालले आहेत.

आतापर्यंतच्या सर्व अध्यात्मिक गुरूंनी त्यांच्या या विश्वा पलीकडिल काल्पनीक ज्ञानाचि व ते प्राप्त करण्याच्या साधनांचि भर सतत मानवी संस्कृतीच्या जडण घडणिमध्ये टाकली आहे. या अतिमानवीय ज्ञानामुळे मनुष्याच्या दुःखद जिवनांचि व्याप्ती वाढवण्यास हातभार लागला गेला आहे. सर्व अध्यात्मिक गुरूंनी निस्वार्थी, निष्कलंक, निष्काम आदर्श मानवी जिवनाचि संकल्पना मांडली आहे. निसर्गास आदर्ष जिवाची आवश्यकता नसते तो कुंभाराप्रमाणे मातीमधुन वेगवेगळे आकार बनवण्यात मग्न असतो.

https://youtu.be/LCfz-VbM5eI

Thursday, July 05, 2018

धर्मसत्ताक ते प्रजासत्ताक



ई.स. पुर्व सुमारे ३००० वर्षापुर्वी पृथ्वीतलावर स्वर्ग साकारला होता. कारण त्या काळि कोणताहि देव, देश वा धर्म अस्तित्वात नव्हता. त्यावेळी आताच्या ईराण, ईजिप्त पासुन ते भारता मधिल महाराष्ट्रा पर्यंत पसरलेल्या सिंधु नदिच्या संस्कृतीमध्ये हस्तकला, धातुशास्त्र, अनेक मजली भाजक्या विटांचि घरे, कालवे, स्नानगृहे, सांडपाणि वाहुन नेण्याचि व्यवस्था, रूंद रस्त्यांचे आखीव रेखीव शेकडो शहरे अस्तित्वात होती. राजसत्ते शिवाय व्यापार ऊदिम जोरात चालत असे याचा अर्थ सर्वत्र शांततापुर्ण सहजिवन होते. 

नंतर धर्म व राजसत्ता ऊदयास आल्या व त्या दोघांच्या एकत्रीत शक्तिने अनेक शतके सामान्य जनतेवर जुलमी राज्य केले होते. १८व्या शतकामध्ये अनेक वैज्ञानीक शोधांमुळे औद्योगिक क्रांती सामान्यांच्या मदतीला आली. औद्योगिक क्रांतीमुळे नविन संघटित मजदुर वर्ग निर्माण झाला व त्यांनी ऊठाव करून प्रथम जुलमी राजसत्ता ऊलथवुन टाकल्या, लोकशाहि शासन आणले व नंतर धर्मसत्तेला राजकारणा पासुन वेगळे करून निधर्मी लोकशाहि शासन यंत्रणा निर्माण केल्या.

जगभरामधिल असंख्य क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांचे मोल देऊन लोकसत्ताक शासन आणल्या नंतर सुध्दा १९४७ साली पाकिस्तान हे जगामधिल पहिले मुस्लीम राष्ट्र निर्माण झाले.धर्माच्या अतिरेकि वापराने ते आज अतिरेकि राष्ट्र झाले आहे. हा अनुभव आपल्या शेजारी असताना सुध्दा भारतामधिल राजकारणी सत्तेसाठि परत धर्माचा वापर करत आहेत. जो धर्म कधि निर्माण झाला नाहि, ज्याचि कोणि स्थापना केली नाहि, ज्याचा कोणि संस्थापक नाहि, ज्याचा अधिकृत ग्रंथ नाहि, नियम नियमावली नाहित त्यावर आधारित पोकळ राष्ट्रवाद बनविला गेला आहे व त्याचा साम, दाम, दंड, भेद नितीने देश विदेशामध्ये प्रचार व प्रसार चालु आहे.

धर्म निर्मितीचा खालील ईतिहास पाहिल्या नंतर धर्म हि एक अफुचि गोळि आहे हे आपल्या लक्षात येते.

ई.स.पुर्व २००० वर्षापुर्वी ईजिप्त मध्ये कोणत्याहि धर्मा शिवाय पिरॅमिड व त्याबद्दलचा ग्रंथ अस्तित्वात होते. 

ई.स.पुर्व १५०० वर्षापुर्वी कोणताहि धर्म अस्तित्वात नसताना भारतामध्ये पहिला वेद म्हणजे ऋग्वेद जन्माला आला होता. 

धर्म व राजसत्तेशिवाय सिंधु संस्कृती सारख्या एका फार मोठ्या भुभागावर साहित्य, संस्कृती, कलाकृती, व्यापार वगैरे मानवास शांततापुर्वक जिवन जगण्यास आवश्यक असणारे सर्व काहि चरम अवस्थेमध्ये नैसर्गिकरित्या प्राप्त होत होते. 

कालांतराने अतिशय हुशार परंतु स्वार्थी मनुष्यांनी धर्म व राज्ये स्थापन केली. सामान्य जनतेला देवा धर्माच्या श्रध्दांचे व देशप्रेमाचे डोस पाजुन त्यांना स्वतःचे गुलाम बनविले. त्यामुळे लढण्यासाठि व मजुरीसाठि स्वस्तामध्ये प्रचंड प्रमाणात जन शक्ति ऊपलब्ध होत असे. 

मानवतावादि तत्वचिंतक धर्म प्रेषितांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांचे संप्रदाय निर्माण केले. नंतर संप्रदायांच्या वर्तणुकिसाठि धर्मग्रंथ लिहिले गेले. राज्यकर्त्यांनी संप्रदायांच्या सामुहिक लोकशक्तिचा फायदा राजकारणासाठि केला तर धर्मगुरूंनी राज्यसत्तेच्या शक्तिचा ऊपयोग धर्मप्रसारासाठि करून घेतला. 

नंतर अस्तित्वात आलेले सर्व धर्म हे ज्या तत्वज्ञानावर आधारित आहेत ती वैदिक ऊपनिषदे हि ई.स.पु्र्व १२०० वर्षापुर्वी निर्माण झाली होती. मध्य आशिया मधुन हे ज्ञान सर्वदुर पसरले होते. जगभरामधिल तत्ववेत्त्यांच्या विचारसरणिंचा ऊपनिषदिक ज्ञान हा पाया आहे.

ई.स.पु्र्व ८०० वर्षापुर्वीच्या छांदोग्य ऊपनिषदामध्ये श्रीकृष्णाचा देवकिपुत्र व घोर अंगिरसांचा शिष्य असा ऊल्लेख आहे. भगवद गिता या काळामध्ये लिहिली गेली. परंतु हिंदु वा ईतर धर्म नव्हते.

ई.स.पु्र्व ८०० वर्षापुर्वी पार्श्वनाथ हे जैन तिर्थंकर होऊन गेले. परंतु जैन धर्म महाविरा नंतर खऱ्या अर्थाने सुरूवात झाला.

ई.स.पु्र्व ६०० वर्षापुर्वी ईराण मध्ये पारशी धर्म अस्तित्वात आला. 

ई.स.पु्र्व ५०० वर्षापुर्वी महाविर जैन व गौतम बुध्द होऊन गेले. 

ई.स.पु्र्व २५० वर्षापुर्वी सम्राट अशोकाने बौध्द धर्म स्विकारला व त्याचा सर्वदुर प्रसार केला. 

ई.स.पु्र्व ३० वर्षापुर्वी येशु ख्रिस्ताचा जन्म. 

येशुच्या निधना नंतर ई.स.३५० साली बायबल लिहिले गेले व ई.स.३८० साली रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्मास राजमान्यता दिली.

ई.स.५७० - ६३२ पैगंबर मोहम्मद यांचा कालावधि. मोहम्मद यांच्या मृत्युनंतर ई.स. ६५० साली कुराण लिहिले गेले. 

ई.स. ७८८-८२० हा आदि शंकराचार्य यांचा कालखंड. त्यांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला. त्यांच्या विद्वत्तेमुळे बौध्द धर्माचा भारतामधिल प्रभाव खुप कमी झाला. या काळापासुन जैन व बौध्द व्यतिरिक्त भारतीयांचा हिंदु असा ऊल्लेख परदेशी करू लागले. हिंदु धर्म स्थापन झाला नाहि तर ती ईतर धर्माची एक प्रतिक्रिया आहे. 

ई.स.१६९९ साली गुरू गोविंदसिंग यांनी शिखांचा खालसा निर्माण केला. 

संदर्भ: 
https://en.m.wikipedia.org/wiki/Indus_Valley_Civilisation
https://en.m.wikipedia.org/wiki/Timeline_of_religion

Sunday, July 01, 2018

सुखांचे मृगजळ


मनुष्य हा सुखी जिवनासाठि अखंडपणे प्रयत्नशील असतो. आपल्या जिवनामध्ये सुख येण्यासाठि व ते टिकुन रहाण्यासाठि त्याचि सर्व मेहनत चाललेली असते. कष्ट, मेहनत व हुषारीचे प्रयत्न कमी पडायला नको म्हणुन तो नशिबाचे प्रयत्न हि अजमावत असतो.

ज्यांना कष्ट व मेहनत न करता एैषोआरामामध्ये सुखी जिवन जगायचे आहे अशा हुशार लोकांनी नशीब, देव, धर्म, अध्यात्माच्या मनगढंत मालीका ऊभ्या केल्या. सांसारीक जिवनापेक्षा धार्मिक जिवन चांगले आहे व या दोन्हिपेक्षा अध्यात्मिक जिवन सर्वश्रेष्ठ आहे हे समाजाच्या मनावर पुर्णपणे बिंबवले गेलेले आहे. खरेतर धार्मिक व अध्यात्मिक जिवन असे वेगवेगळे काहि नसतेच, सर्व काहि सांसारीक आहे. सांसारीक मनुष्य मेहनत करत असतो व त्याच्या मेहनतीच्या जिवावर देवांचि, धर्मांचि व अध्यात्माचि शिखरे ऊभी आहेत.

सांसारीक, धार्मिक व अध्यात्मिक अशा तिघांनाहि सुख हवे असते. सुखाचि, स्वर्गाचि ईच्छा व मुक्तिचि ईच्छा या सर्व ईच्छा या सांसारीक ईच्छा आहेत. त्यांना कनिष्ठ व श्रेष्ठ बनविणारे आपले मन असते. प्रत्येकजण आपापल्या बुध्दिमत्ते प्रमाणे सुखाच्या शोधात असतात. सुख हे नेहमी आपल्या कक्षा रूंदावित असते. सांसारीक व धार्मिक सुख अल्पकाळ लाभते म्हणुन मग मनुष्य चिरकाल टिकणाऱ्या अध्यात्मिक सुखांकडे आकर्षित होतो.

आपले मन आपणास फसवित असते. प्रथम ते सुखाचे मृगजळ तयार करते व त्यासाठी आपणास त्याचा पाठलाग करावयास भाग पाडते. मनाचे सामर्थ्य अचाट आहे, ते आपणास पाहिजे तो अनुभव देऊ शकते. सुखाचा, आनंदाचा, शांतीचा, ऊन्मादाचा अनुभव आपणास आपले मन देण्यास सक्षम असते.

जोपर्यंत आपण सुखाच्या शोधात असतो तोपर्यंत मन आपल्या कक्षा रूंदावित राहते व तोपर्यंत आपण दुःखी राहतो.

सुखाचा शोध थांबायला हवा, सुखांचा शोध संपताच स्वर्गाचे व मुक्तिचे मृगजळ आपोआप समाप्त होते.