Friday, July 20, 2018

विठ्ठला तु वेडा कुंभार


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार |
     विठ्ठला तु वेडा कुंभार ||

मुक्ततेसाठि पुर्ण स्वातंत्र्य व पुर्ण स्वावलंबन आवश्यक आहे. मुक्तता हि कोणत्याहि साधनेने, कोणत्याहि ज्ञानाने वा कोणाच्याहि मदति शिवाय मिळत असते. मुक्ततेसाठि आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर जगातील कोणताहि जिवंत अथवा मृत गुरू आपणास मदत करू शकणार नाहि. ऊलट त्याचि संगत, त्याचि शिकवण व त्यांच्या साधना आपल्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करून आपला प्रवास लांबवु शकतात. मुक्ततेचा मार्ग हा पुर्णपणे निर्मळतेच्या तत्वावर आधारीत आहे तिथे ऊष्टे, खरकटे, फुकटे, ऊसनवार वा कर्जदार ज्ञानी बिलकुल चालत नाहित.

आपण कधि लक्षपुर्वक विचार केला आहे काय कि आपणास नक्की काय हवे आहे व ति आपली स्वतःचि ईच्छा आहे कि दुसऱ्यांच्या ईच्छांना आपण आपली ईच्छा समजत आहोत? ज्यावेळी आपल्या हे लक्षात येते कि आपण ईतरांनी सांगितलेले प्राप्त करण्यासाठीच जिवनभर धडपडत आहोत, त्यावेळी मग आपली ती प्राप्तिचि धडपड कमी होत जाते व ते आपले मुक्ततेच्या मार्गावरील पहिले पाऊल असते.

सर्व ईच्छांचा त्याग करणे हे जरी आवश्यक असले तरी त्याग करणे हि सुध्दा एक ईच्छाच आहे. मुद्दामहून एखादि गोष्ट करणे वा न करणे हे काहितरी करण्यासारखेच असते व त्यामधुन आपली प्राप्तिचि ईच्छा झळकत असतेच. अतिशय साधे व सहज जिवन जगणे हे खुप अवघड असते. अंतिम अवस्थेमध्ये यामुळे साधक अतिशय गोंधळुन जातो. मुद्दामहून काहि विशेष न करता व कोणतीहि बाह्य मदत न घेता सहज जिवन जगता आले कि आपले विचार कमी होतात व आपले शोधकार्य समाप्त होते. जोपर्यंत काहि हवे आहे तोपर्यंत शोध चालूच रहातो. परंतु अशी एक अवस्था आपल्या जिवनामध्ये येते ज्यावेळी आपणास जगाकडुन कसलीच अपेक्षा रहात नाहि तीच मुक्तावस्था होय बाकी सुख, आनंद, शांती वगैरे सर्व मनाचे खेळ आहेत जे ईतरांनी आपल्या डोक्यामध्ये टाकलेले त्यांचे ऊष्टे ज्ञान असते. 

आपले शरीर व भोवतालचे विश्व हेच केवळ सत्य आहे. या विश्वापलीकडे दुसरा कोणताहि स्वर्ग वा अध्यात्मिक विश्व नाहिये. आपल्या कडील पुर्व ज्ञानाच्या आधारे आपण अवती भोवतीच्या गोष्टि ओळखतो वा त्या अनुभव करत असतो. जर हे पुर्व ज्ञान व विचार आपणाकडे नसतील तर आपण आपल्या शरिरा सकट आपल्या भोवतालच्या विश्वाचा अनुभव करू शकणार नाहि. दररोजच्या गाढ झोपेमध्ये आपण याचा नित्य प्रत्यय घेत असतो. मग समाधीच्या प्रगाढ शांत अवस्थेमध्ये कोणी कसा काय बरे निर्गुण, निराकार अवस्थेचा शोध लावु शकेल? अनुभव घेणे हि मनाची एक क्रिया आहे ती साधक व साधु या दोघांमध्ये सारखीच असते. साधकास अनुभव येऊ शकत नाही परंतु साधुस तो अनुभव येतो असे म्हणणे चुकीचे व तो एकप्रकारे फसवणुकिचा प्रकार आहे.

मानवी उत्क्रांतीच्या एका ठराविक टप्प्यावर चार पायांवर आडवे रेंगणारा आदिम मानव दोन पायांवर ऊभा राहू लागला. त्यावेळी त्याच्या मज्जासंस्था व मेंदुचा वेगाने विकास होऊ लागला, तो अधिक विचार करू लागला, त्याच्या भाषेचा ऊदय झाला, त्याचि संवाद प्रक्रिया सुधारली, तो शस्त्रे बनवु लागला, तो शेती करू लागला, तो कपडे घालु लागला व त्यामधुनच तो आपल्या अवती भोवतीच्या ईतर प्राण्यांहुन स्वतःस श्रेष्ठ व विशेष असा जिव समजु लागला. निसर्गापासुन तो स्वतःस वेगळे करू लागला व त्याचवेळी त्याने विचारांच्या कल्पनेमधुन आपल्या भोवती चैतन्य, ईश्वर, भुतप्रेत यांचे एक काल्पनीक विश्व निर्माण केले. आपल्या नैसर्गिक विश्वामध्ये नसलेल्या गोष्टींच्या कल्पना तो त्या काल्पनीक विश्वामध्ये रंगवु लागला. संपुर्ण मानवजातीचि हि एक शोकांतिका आहे कि जे विश्व अस्तित्वात नाहि त्याचा कधिहि न संपणारा अखंड शोध सुरू झाला. या शोधावर कोणी आक्षेप घेऊ नये यासाठी त्याला धर्माचे व श्रध्दांचे स्वरूप दिले गेले. यास मानवी संस्कार व संस्कृतीचा सुरेख मुलामा दिला गेला आहे व तो मुलामा ईतका घट्टपणे मिसळला गेला आहे कि आपण आता त्याविना जगु शकत नाहि, आपण त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. सतत प्राप्त होऊ शकणाऱ्या सुखाच्या व आनंदाच्या शोधाच्या प्रयत्नात मानवजातीने आपली नैसर्गिक अवस्था हरवली आहे व हेच आपल्या सर्वांच्या दुःखाचे मुळ कारण आहे. निसर्गाच्या या अद्भुत व अद्वितीय अशा वसुंधरेचा आपण जास्त सुखाच्या हव्यासाने ईतका विनाश केला आहे व तिला ईतके विद्रुप केले आहे कि तिच्यावरील सुखाने जगणारे ईतर अनेक जिवजंतु व पशुपक्षी नामशेष होत चालले आहेत.

आतापर्यंतच्या सर्व अध्यात्मिक गुरूंनी त्यांच्या या विश्वा पलीकडिल काल्पनीक ज्ञानाचि व ते प्राप्त करण्याच्या साधनांचि भर सतत मानवी संस्कृतीच्या जडण घडणिमध्ये टाकली आहे. या अतिमानवीय ज्ञानामुळे मनुष्याच्या दुःखद जिवनांचि व्याप्ती वाढवण्यास हातभार लागला गेला आहे. सर्व अध्यात्मिक गुरूंनी निस्वार्थी, निष्कलंक, निष्काम आदर्श मानवी जिवनाचि संकल्पना मांडली आहे. निसर्गास आदर्ष जिवाची आवश्यकता नसते तो कुंभाराप्रमाणे मातीमधुन वेगवेगळे आकार बनवण्यात मग्न असतो.

https://youtu.be/LCfz-VbM5eI

No comments: