Friday, August 24, 2018

‘मी’ च्या चैतन्याचि जाणिव हा मेंदु निर्मित भ्रम आहे


अध्यात्मिक ध्यान साधने मधुन जे काहि अतींद्रिय अनुभव साधकास येतात वा साधकाच्या जीवनशैली मध्ये जो आमुलाग्र बदल होतो तसेच बदल व तसेच अतिंद्रिय अनुभव हे Psilocybin या औषध सेवनाने सुध्दा येतात असे मानस शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. अपघातामध्ये वा भुल दिल्याने वा मादक पदार्थ सेवनाने मनुष्याचा मेंदु तात्पुरता नादुरूस्त होतो तरीहि मेंदुविना मनुष्य अनुभव घेऊ शकतो, विचार करू शकतो व ते अनुभव नंतर तो आठवु शकतो हे सिध्द झाले आहे. अशा मेंदुविरहित अवस्थेमध्ये मनुष्य प्रामाणिक व स्वच्छ विचार करतो व या अनुभवामुळे नंतरच्या आयुष्यामध्ये तो सात्वीक विचारसरणीचा अध्यात्मिक मनुष्य बनतो.

आपण ज्यास जिवन असे म्हणतो ते आपले शरीराच्या सांगाड्या मधिल वास्तव्य हे खरे जिवन नसुन तेच खरे जिवन आहे असे भासवुन मेंदु आपणास भ्रमित करत असतो. आपण अखंड, अनंत वाहणाऱ्या जिवनप्रवाहाचा एक भाग आहोत. मेंदु आपणामध्ये असे विचार निर्माण करतो कि ज्यामुळे आपण स्वतःस या जिवन प्रवाहापासून वेगळे समजु लागतो. या वेगळे पणाच्या भावनेमुळे मनुष्य दुःख भोगतो व वैयक्तिक संसारास बांधला जातो. मेंदु हाच चैतन्य शक्तिचा भ्रम तयार करत असतो. आपल्या मेंदु मधिल अगणित न्युरॉन्स हे आपणास चेतन अनुभव देण्यासाठी सतत कार्यरत असतात, ते आपल्या देहा सहित सभोवतालच्या विश्वाचा देखावा निर्माण करत असतात. शरिर व मेंदुविरहित बेशुध्दावस्थेमध्ये जिवंत असल्याचा अनुभव म्हणजे व्यावहारीक दृष्ट्या जिवंत नसताना जिवंतपणाचा अनुभव अनेकांस आलेला आहे.

स्वतंत्र व वेगळ्या अस्तित्वाच्या ओळखिचि जाणिव हि अहंकारामधुन येते. अहंकारामुळे वेगळ्या अस्तीत्वाच्या निरनिराळ्या सीमा आखल्या जातात, त्या सीमांचे प्राणपणाने रक्षण केले जाते. अहंकार वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळे रूप घेत असतो. लहानपणापासून ते प्रौढावस्थे पर्यंत त्याने अनेक रूपे बदललेली असतात, वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये तो वेगवेगळा दिसत असतो. अध्यात्मिक साधने द्वारा वा औषधि वनस्पती सेवनाने अहंकार हा कमी करता येतो.

आपल्या स्वतःच्या व ईतरांच्या सुरक्षेच्या दृष्टिने समाजा मध्ये वावरताना आपणास काहि बंधने घालावी लागतात. आपला मुळ स्वभाव हा अतिशय दयाळु, कमालीचा प्रामाणिक असा आहे परंतु काहिजण याचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा समाज विघातक शक्तिं पासुन आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आपणास अहंकाराचि आवश्यकता असते. आपण आपले हितसंबंध सुरक्षित केल्यानंतर आपला अहंकार कमी केल्याने बरेचसे फायदे होतात. मेंदुमधिल जुनी स्वार्थी केंद्रे बंद होऊन नवीन पारमार्थिक संवेदना प्रवाहित होऊ लागतात. षडरिपुंचे षडगुणांमध्ये रूपांतरण होते. मेंदु निर्मित वैयक्तिक ओळख कमी होऊन मुळच्या वैश्वीक जिवन प्रवाहाशी आपण एकरूप होऊन जातो.

https://qz.com/1196408/scientists-studying-psilocybin-accidentally-proved-the-self-is-an-illusion/

Sunday, August 19, 2018

बौध्दिक गुलामि

आदिमानवा पासुन आधुनिक मानवा पर्यंतचि ऊत्क्रांती हि मानवाच्या बुध्दिमत्तेमुळे झाली आहे. पिढि दरपिढि हि बुध्दिमत्ता अधिकाधिक विकास पावत आहे. आपल्या पुढिल पिढीच्या बुध्दिमत्तेचा विकास कळत नकळत आपल्या बुध्दीच्या विकासावर अवलंबुन असते. बुध्दिमान मनुष्य बिकट परिस्थिती मधुन आपला व आपल्या समाजाचि प्रगति करत असतो.

मनुष्याच्या बुध्दिमत्तेचा विकास झाला आहे हे त्याच्या वाचन, लेखण, कला, साहित्य, संगित, सामाजिक कार्ये व सामाजिक चळवळी मधिल सहभाग, व्यायाम, योग, ध्यान आदि अतिरिक्त छंदामधुन दिसून येतो.

सतत एकच प्रकारचा कामधंदा केल्याने, एकाच संप्रदायाचि वा एकाच गुरूंचि एककल्ली साधना केल्याने, एकाच राजकिय पक्षाची सतत पाठराखण केल्याने मनुष्याच्या विवेक बुध्दिचा पुर्ण विकास होत नाहि. विवेकि बुध्दि शिवाय कामाधंद्या मधिल बारकावे वा अध्यात्मा मधिल सुक्ष्मातीत सुक्ष्म ज्ञान आकलन होत नाहि.

काहितरी एकच छंद जोपासुन आयुष्यभर त्यामध्येच अडकण्याने त्या छंदाचे आपण गुलाम बनत असतो. 'सांग काम्या हो नाम्या' प्रकारच्या गुलाम अवस्थेमध्ये बुध्दिचा विकास संभवत नाहि. प्रत्येक स्त्री पुरूषास स्वातंत्र्य देण्याने त्यांचि बुध्दिमत्ता स्वतंत्र होत असते.

वेगवेगळे काम केल्याने, वेगवेगळे छंद जोपासल्यामुळे वा आहे त्या कामामध्ये व छंदामध्ये सतत नाविन्य आणल्यामुळे बुध्दिचा अधिक विकास होत असतो व मानसिक समाधान सुध्दा मिळत असते. विवेकि बुध्दि व समाधानी मानसिकता हि आर्थिक स्वावलंबनाचे आधारस्तंभ आहेत.

विवेकि बुध्दिस निरक्षीर बुध्दि असेहि म्हणतात. हंस हा पक्षी दुधामधिल पाणि वेगळे करतो व फक्त दुध पितो. सत व असत काय आहे हे समजावून घेऊन सत चा स्विकार करणे म्हणजे योग करणे होय व असतचा अस्विकार करणे म्हणजे असतचा संन्यास करणे होय. जि बुध्दि मनुष्यास अशाप्रकारच्या योग व संन्यासापर्यंत घेऊन येते तिला सदसद्विवेक बुध्दि असे म्हणतात.

|| तन्नो हंस प्रचोदयात ||

Monday, August 13, 2018

शरीर हार्डवेअर, मन सॉफ्टवेअर व आत्मा परमात्मा हे गेम्स आहेत


आपण कोण आहोत, सभोवतालचे विश्व काय आहे व हे सर्व कोणि व कशासाठी बनविले आहे हे प्रश्न ज्यावेळी आपणास पडायला लागतात त्यावेळी आपली ब्रम्हजिज्ञासा (कुंडलीनी) जागृत झाली असे समजावे. वेदांतात यालाच अथातो ब्रम्हजिज्ञासा असे संबोधले आहे.

पृथ्वीवरील सर्व संस्कृतींनी, धर्मांनी, गुरूंनी अशी शिकवण सर्व मानवजातीस दिलेली आहे कि ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे व तोच विश्वाचे पालन पोषण करत आहे. पिढि दर पिढि तेच ज्ञान सर्वत्र पसरविले जाते व आपण शहानिशा न करता केवळ श्रध्देने त्यावर विश्वास ठेवतो.

वैज्ञानिक संशोधनातुन असे सिध्द झाले आहे कि एका छोट्याशा अणुचा प्रचंड मोठा महास्फोट होऊन (big bang theory) हे विश्व निर्माण झाले. विश्वामधिल अगणित तारे व ग्रहांपैकि पृथ्वी हा एक ग्रह आहे. या ग्रहावर अनेक अपघातांमधुन जिवसृष्टिचि निर्मिती झाली आहे. लाखो वर्षांच्या जडण घडणि मधुन श्रेष्ठ पेशींचे संवर्धन व निकृष्ट पेशींचा विनाश होत अनेक प्रकारचे जैव वैविध्य पृथ्वीतलावर निर्माण झाले आहे. महास्फोटाच्या आवाजाचे ध्वनी व प्रतिध्वनी आजहि अवकाशामध्ये कंपनांच्या स्वरूपामध्ये निनादत आहेत. हि कंपने अवकाशाप्रमाणेच पृथ्वीवरील प्रत्येक अणुरेणुमध्येहि होत आहेत. या कंपनांच्या माध्यमातून सजिव आपल्या अस्तित्वासाठि व प्रजोत्पादनासाठि विचार निर्मिती करत असतात. सजिवांमधिल दोन पायांवर चालणाऱ्या मानव प्राण्याने आपल्या बुध्दिमत्तेच्या जिवावर या विचारांमधुन संवादासाठि भाषा विकसीत केली. भाषा विकसीत झाल्याने विचारांना स्मृतीमध्ये ठेवणे सहज शक्य झाले, यातुन नवनविन संकल्पना अस्तित्वात येऊ लागल्या. संकल्पनांना ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले. या काल्पनीक ज्ञानामधुन त्याने ईश्वराचि व धर्माचि निर्मिती केली व आपल्याच बुध्दिचा तो गुलाम बनला. हजारो वर्षांच्या संकल्पनांना चित्रे, मुर्ती, मंदिरे, ग्रंथ यामधुन मुर्त स्वरूप प्राप्त झाले व आपल्याच कल्पनांना तो सत्य समजु लागला व त्यांचा त्याने अध्यात्माच्या नावाने नविन शोधहि सुरू केला.

अध्यात्मिक साधने दरम्यान साधक आपल्या शरीरास व मनास तपश्चर्येच्या नावाखाली अत्यंतीक यातना देतो. खडतर साधनेच्या परिणाम स्वरूप मेंदु कडे जाणाऱ्या प्राणवायु व रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामुळे साधकाचा मेंदु काहिकाळ बधिर होतो. मेंदुविरहित अवस्थेमधिल अतींद्रिय अनुभव (out of body experiences) त्याला सुखावतात व त्याला स्वतःविषयी विशेष अभिमान होऊ लागतो व तो अधिकाधिक अध्यात्मिक, परोपकारी, विवेकि, संन्यस्त होऊ लागतो.

शरीर व मेंदु विरहित अवस्थेत आपण विचार करू शकतो, अनुभव घेऊ शकतो व ते स्मृतीतहि ठेऊ शकतो हे मानस शास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. अपघात वा गंभीर आजारा दरम्यान अनेक रूग्णांचा मेंदु निकामी होतो व ते बेशुध्द होतात. (Near death experience) सामान्य अवस्थेमध्ये मेंदु निकामी असताना विचार करणे वा कोणताहि अनुभव घेणे शक्य होत नाहि. परंतु बेशुध्द अवस्थेमधिल अनेक रूग्णांनी ते बेशुध्द असताना त्यांनी शरीराबाहेर येऊन काय पाहिले हे नंतर व्यवस्थीत सांगितलेले आहे. काहींनी त्यांच्या पुर्वजन्मा मधिल घटना सांगितलेल्या आहेत, काहींचा पुर्वजन्मी एखादा अवयव कापला गेला असेल तर याजन्मी तो अवयव अपंग होऊन त्यांनी जन्म घेतलेला आहे हे सुध्दा सिध्द झालेले आहे.

आपण जे काहि विचार करत असतो त्यामुळे आपल्या शरीरामधिल व आसपासच्या वातावरणामधिल कंपनामध्ये बदल होत असतो व ती कंपने आपल्या आयुष्यामध्ये त्यानुरूप बदल घडवीत असतात. विचारांशी निगडित कंपने हि आसमंतात जिवंत राहतात व एक शरीर नादुरूस्त झाल्यानंतर दुसऱ्या शरिराच्या संपर्कामध्ये येऊन परत आपला कार्यभाग चालु ठेवतात.

कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स हि अगदि अलीकडिल संशोधने आहेत फार पुर्वी ती अस्तित्वातहि नव्हती त्याप्रमाणे संपुर्ण विश्वाच्या कालगणनेच्या तुलनेमध्ये आधुनिक मनुष्य प्राणि हा खुप अलीकडिल आहे. कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स मध्ये एक हार्डवेअर रूपि सांगाडा असतो व दुसरे सॉफ्टवेअर रूपि प्रोगॅम्स व अॅप्स असतात. हार्डवेअर निकामी झाले तरी प्रोगॅम्स व अॅप्सचा बॅकअप दुसऱ्या हार्डवेअर मध्ये रिस्टोअर करून आपण तेच काम दुसऱ्या हार्डवेअर मधुन जसेच्या तसे करून घेतो. आपले शरीर हे एक हार्डवेअर आहे व मन हे एक सॉफ्टवेअर आहे. एक शरीर निकामी झाल्यानंतर मन दुसऱ्या नवीन शरीराचा आधार घेते. मनामध्ये कुटुंब, समाज, जात, धर्म, समाजकारण, राजकारण, संस्कृती, देश, स्वर्ग, देवता, आत्मा, परमात्मा, प्रेम, भक्ति, अध्यात्म आदि वेगवेगळे गेम्स लोड केलेले असतात. प्रत्येक जण तल्लीन होऊन आपापल्या आवडि प्रमाणे एकामागुन एक हे खेळ खेळत असतात.

(डॉ ब्रुस ग्रेसन यांचे मेंदु विरहित अवस्थेतील संशोधन जाणुन घेण्यासाठि हा व्हिडियो पाहु शकता: https://youtu.be/2aWM95RuMqU )

Sunday, August 05, 2018

देव, देश व धर्म कोणांसाठि?


हजारो वर्षापुर्वी ज्यावेळी पृथ्वीतलावर सर्वत्र जंगल होते त्यावेळी आदिमानव अन्न व स्वतःच्या संरक्षणार्थ पृथ्वीवर सतत दाहि दिशा फिरत असे. त्यामुळे कोणताहि मानवी समाज हा एका ठराविक भौगोलिक प्रदेशाचा मुळचा रहिवासी वा मालक नाहि. आज जगामधिल सर्व मानव हे एकाच गुणसुत्रांचे आहेत कि जे सर्वात अगोदर सापडलेल्या होमी सेपियन या आफ्रिकेच्या जंगलातील आदिमानवाशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे कोणिहि खरा भुमीपुत्र नाहि, कोणि ऊच्च वर्णिय नाहित तर कोणि निच जातीचा नाहि.

मानवी समाज भटकत असताना व ऊत्क्रांत होत असताना भाषा, अग्नी, शेती, वस्त्र, धातु आदिंचे शोध लागत गेले व कालांतराने तो स्थीराऊ लागला. वस्ती, गावे, नगरे निर्माण होऊ लागली, जमीन जायदादिच्या वाटपातुन संघर्ष निर्माण होऊ लागले, बळी तो कान पिळीतुन राजसत्ता निर्माण झाली. नैसर्गिक आपत्तींना घाबरणारा मनुष्य सहाय्या साठि आकाशाकडे बघु लागला व समाजातील काहि धुर्त लोकांनी आकाशा मधिल बापाचि म्हणजे दैवी शक्तिचि संकल्पना निर्माण केली. दैवी शक्तींशी संपर्क साधणारा नवीन पुजारी वर्ग व त्यांच्या गुरू शिष्य परंपरा सुरू झाल्या. यामधुनच नंतर धर्म तयार झाले. राजसत्ते बरोबर धर्मसत्ता सुध्दा प्रबळ झाल्या व दोघांना अधिकाधिक सत्ता व अधिकाधिक सुखांच्या लालसा निर्माण होऊ लागल्या. या लालसेमधुन अधिकाधिक सुखांच्या नवनविन वस्तुंचि निर्मिती व त्यांचा व्यापार सुरू झाला व तिसरा धनिकांचा व्यापारी वर्ग निर्माण झाला. राजसत्ता, धर्मसत्ता व धनीकसत्ता यामधिल अल्पसंख्य सत्ताधाऱ्यांनी ऊर्वरीत बहुसंख्य समाजास आपले गुलाम बनविले. सामान्य जनतेच्या अभ्युदयासाठी काल्पनीक देव, देश व धर्म यांचे संरक्षण करणे हेच सर्व समाजाचे कर्तव्य आहे हे अपप्रचाराने पटवुन देण्यात सत्ताधारी कमालीचे यशस्वी झाले. बहुसंख्य समाज एकत्र येऊन त्यांचि मोठि ताकद निर्माण होऊ नये यासाठि त्यांच्यामध्ये अनेक जाती जमाती व कुळे निर्माण करून त्यांच्यामध्ये सतत संघर्ष होत राहिल यासाठि सत्ताधारी नेहमी राजकारण करत राहिले.  सत्ताधाऱ्यांच्या देव, देश व धर्मांच्या रक्षणासाठि बळि मात्र सामान्य, अशिक्षित, अज्ञानी गुलामांचे जात राहिले.

औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावरील गुलाम मजदुर समाज एकवटु लागला, सुशिक्षित होऊ लागला. पश्चिमे कडिल गुलामांना देव, देश व धर्मापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे श्रेष्ठ वाटु लागले व त्यामधुन अमेरिकन, फ्रेंच, रशियन राज्य क्रांती झाल्या व तेथील सर्वसामान्य जनतेने प्राणांचे बलिदान देऊन राजसत्ता व धर्मसत्ता ऊलथवुन टाकल्या व जनतेचे जनतेने चालविलेले लोकशाहि राज्ये निर्माण केली. याचे लोन सर्व जगभर पसरले व सर्वत्र लोकशाहि जनसत्ता निर्माण होऊ लागल्या.

लोकशाहि जनसत्तेने राजसत्ता पुर्णपणे नामशेष केल्या परंतु धर्मसत्ता अजुनही आपला प्रभाव राखुन आहेत. भ्रष्ट कारभाराने राजसत्ता लोकांच्या मर्जीतुन ऊतरल्या परंतु देव, धर्म, गुरू व त्यांचे धर्मग्रंथ यांच्यावरील अंधश्रध्दांमुळे धर्मसत्ता जिवंत राहिली व जगभर ति परत अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर न करता धर्मगुरू व त्यांच्या धार्मिक ग्रंथांवर डोळे झाकुन विश्वास ठेवतात व त्यांचि गुलामी आनंदाने स्वीकारतात. श्रध्दांचि नशा ईतकि भिषण असते कि विज्ञान युगामधिल सुशिक्षित भक्तगण सुध्दा त्या श्रध्दांसाठि आपले सर्वस्व पणाला लावण्यास तयार होतात.

भारताचा ईतिहास पाहिला असता साधारण ३००० वर्षापुर्वी राजसत्ता व धर्मसत्ता स्थिरावण्यापुर्वी भारत खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम् शस्य शामलाम होता. परंतु नंतर राजसत्ता, त्यांचा सत्तासंघर्ष, कलींगचा भिषण नरसंहार, बुध्द, महावीर, वेदांती, ब्राम्हण यांचे संन्यासी धर्म, संप्रदाय यांनी भारतातील स्वयंपुर्णता व स्वसंरक्षण सिध्दता पार कोलमोडुन पाडली व अनेक शतके भारत परक्यांची दस्युभुमी बनला गेला.

ब्रिटिशांच्या नंतर कंगाल भारत निधर्मी, लोकशाहि देश बनला. पहिला आघात धर्मानेच केला व भारताचि फाळणि झाली. स्वातंत्र्याच्या सुखाचि स्वप्ने पहाणाऱ्यांचा पहाटेच स्वप्नभंग झाला. नंतर कॉंग्रेस राज्यकर्ते व सरकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनविला. ३० वर्षापुर्वी सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नसणाऱ्या भाजपाने अयोध्येमध्ये रामजन्मभुमीचा शोध लावला व धार्मिक दंगेधोपे करत सत्ता हस्तगत केली. ना परकीयांनी, ना कॉंग्रेसने व ना भाजपाने जनतेचे प्रश्न सोडविले. कारण राज्यकर्ता हा ना परकिय असतो ना स्वकिय असतो. तो फक्त सत्ता संपादन व सत्ता टिकविणे यामध्येच व्यस्त असतो. तो जनतेला परत परत देव, देश व धर्म यांचि गाजरे दाखवुन खेळवत असतो.

जनता हि धर्म, भाषा, प्रांत, जात, संप्रदाय, वर्ग यामध्ये विभागलेली असते. समाजामध्ये जितकी जास्त विभागणि असते तितके जास्त त्याचे राजकारण करता येते व तितके जास्त राजकारणी निर्माण होत असतात. फोडा व राज्य करा हि निती अनेक प्रकारच्या विभाजनांमुळे प्रचंड यशस्वी होत असते. त्यामुळे समाज तिथेच राहतो व राज्यकर्ते मात्र त्यांच्या जिवावर सर्वसत्ताधिश होत असतात.

संपुर्ण समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी समाजामधिल सर्व प्रकारच्या विभाजनाच्या दऱ्या भरल्या गेल्या पाहिजेत. देव, धर्म, धर्मगुरू, धर्मग्रंथ हे चतुर मानवांनी आपल्या स्वार्थासाठी बनवलेली श्रध्दास्थाने आहेत त्यांचा सत्याशी सुतराम संबंध नाहि हे आपल्या आजपर्यंतच्या अनुभवांनी व वैज्ञानीक संशोधनाने सप्रमाण सिध्द केले आहे. जोपर्यंत या श्रध्दास्थानां वरील लोकांचि विश्वासार्हता कमी होणार नाहि तोपर्यंत समाजा मधिल धर्म, जातींची विभागलेली दरी आपण भरू शकणार नाहि व सत्ताधारी या विभाजनांचा राजकारणासाठी वापर करतच राहणार. या विभाजनांमुळेच युध्दे व दंगली होत असतात व गोरगरीब समाज त्यामध्ये नाहक होरपळला जात असतो. धर्म व जाती व्यवस्था राज्यकर्ते व धार्मिक संस्था कधिहि नष्ट करणार नाहित ऊलट त्यांचे ते आरक्षणच करत राहतील कारण तेच त्या सर्वांचे मोठे चराऊ कुरण आहे.

समाजामधुन दुहिचि पाळेमुळे नष्ट करावयाची असतील तर समाजासच पुढाकार घ्यावा लागेल, त्यासाठि ...
देव, देश व धर्मासाठि वाया जाणारी आपली सर्व शक्ति व बुध्दि हि आपल्या स्वतःच्या विकासासाठी वापरावी.
जात व धर्म हे काल्पनीक आहेत म्हणुन आंतर धर्मिय व आंतर जातीय विवाहांना प्राधान्य द्यावे. समाजाने अशा विवाहितांनाच नोकरीमध्ये आरक्षण वा व्यवसायासाठी व संसारोपयोगी बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना संरक्षीत व प्रोत्साहित करावे.
आपल्या गुलामीचि प्रतीके असणारे सर्व खर्चिक धार्मिक समारंभ व केंद्रे बंद करून फक्त राष्ट्रिय स्मारके व राष्ट्रिय समारंभ साजरे करण्यास प्राधान्य द्यावे.
जनगणने मध्ये आपली जात व आपल्या धर्माचा ऊल्लेख टाळावा.
जातीय व धार्मिक प्रचार करणाऱ्या राजकिय पक्षांना मत देणे टाळावे.

मानवाचि मुक्तता हि देव, देश व धर्म कदापिहि करू शकणार नाहित कारण त्या त्याच्या बेड्या आहेत. स्वातंत्र्य, समता व बंधुता याच मानवाच्या मुक्ततेच्या खऱ्या खुऱ्या पायऱ्या आहेत.