कृष्णमूर्ती यांनी सत्य स्थिती आकलन होण्यासाठी नेहमी What-is म्हणजे आत्ता जे काही चालले आहे त्या वर्तमानाच्या जाणिवेत सतत राहावयास सांगितले आहे. साधक ध्याना मध्ये सतत श्वास किंवा मंत्र याच्या जाणिवेत असतो तसे दिवसभर अवांतर विचार टाळण्यासाठी फक्त what is याच्या जाणिवेत राहावे. आपण जे काम करीत असतो केवळ त्या कामाची जाणीव ठेवणे हेच what-is ची जाणिव असणे होय.
आत्ताच्या क्षणाची जाणिव असणे हे सत्य अवस्थेचे आकलन होण्यात अत्यंत आवश्यक असते. हि जाणीव तेव्हाच शक्य होती जेव्हा आपण त्यावेळच्या घटनेवर टीका करणे, प्रतिक्रिया देणे, अनुकूलता अथवा प्रतिकुलता दाखविणे, तिला नाव गाव आदि ओळख देणे हे थांबवितो. हे सर्व अवांतर गोष्टी टाळल्या तर त्या सोबतचे विचार थांबतात आणि आपण फक्त निरपेक्ष जाणिवेत ( *choiceless awareness* ) राहू शकतो.
अशा निरपेक्ष जाणिवेच्या अवस्थेत असणारा साधक हा मुक्ततेच्या मार्गावर असतो. परंतु इतर जे तथाकथित भोंदू गुरु शिष्य असतात त्यांना अशा निरपेक्ष जाणिवेची कल्पनाच असू शकतं नाही. ते जे असतात ते लपवून ते जे नाहीत त्याचा दिखावा करीत राहतात. आणि ते त्याच धुंदीत सदैव असतात. इतरांवर टीका टिप्पणी करणे, प्रतिक्रिया देणे, पाठांतर केलेल्या पारंपरिक गोष्टी सतत उगळणे हा त्यांचा स्वभाव बनतो.
ज्यांना सत्याचे आकलन करावयाचे आहे त्यांनी What-is म्हणजे नेमके काय आणि त्याच्या जाणिवेत कसे राहायचे हे माहिती करून घेणे म्हणून अत्यावश्यक होते. ' जे काय आहे ते' याची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता आणि करुणामय हृदयाची आवश्यकता आहे. जे काय वर्तमानात होत असते ते हे नेहमी बदलत असते ते सतत परिवर्तनशील असते. ज्यांचे मन पारंपरिक श्रद्धा आणि परंपरा यांच्यामध्ये ठाण मांडी घालून बसलेले असते ती मने जे सतत हालचाल करीत असते, सतत बदलत असते त्याचा पाठलाग करीतच नाही. जे काही सत्य आहे ते कधीच स्थिर असू शकत नाही ते सतत बदलत असते. सतत परिवर्तनीय असलेल्या वर्तमानात राहण्यासाठी मन तितकेच ताजे असावे लागते. ज्यांची मने हजारो वर्षांच्या जुनाट ज्ञानाच्या चिखलात रुतलेली आहेत ते वर्तमानातील सत्याचा माग काढू शकत नाहीत. सत्य भूतकाळात नसते ते सतत वर्तमानात असते, त्यासाठी ते सतत परिवर्तनशील असते. अशा गतिमान सत्याचे आकलन करण्यासाठी आपले मन सुद्धा तितकेच गतिशिल असायला हवे, ते सतत वर्तमानात असावे. पूर्वीचे कितीही महान साधू संत विचारवंत होवून गेलेले असोत त्यांच्या वरील श्रद्धा, भक्ती मधून सत्य आकलन होवू शकत नाही किंवा त्यांनी लिहिलेल्या प्रचंड मोठ्या ग्रंथांचे वाचन केल्याने, पारायण केल्याने सत्याचे आकलन शक्य नाही. पूर्वीच्या परंपरांच्या चिखलात रुतलेले आजचे तथाकथित ज्ञानी हे समाजाचे अतोनात नुकसान करीत आहेत. ते स्वतः ज्या चिखलात रुतले आहेत तिथून ते बाहेर येवू शकत नाही मग इतरांना त्या चिखलात आणून सगळेच तो चिखल तुडवीत सर्व मानव जातीचे भविष्य वाया घालवीत आहेत.
जे कृष्णमुर्ती, Introduction, First and Last Freedom

No comments:
Post a Comment