Wednesday, April 10, 2024

संतांच्या अभंगाचे सत्य

संत ज्ञानेश्वर यांचे अभंग 
|| १ ||

 जाणीव नेणीव भगवंती नाहीं ।
 हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
 नारायणहरी उच्चार नामाचा ।
 तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
 तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
 तें जीव जंतूंसी केंवि कळे ।
 ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥३॥

सत्य अवस्थेला सर्व संतांनी भगवंत असे म्हटले आहे. जे सतत असते, अविनाशी आहे ते सत्य आहे. सत्य अवस्थेत जाणीव आणि नेणीव दोन्ही नसतात. जाणीव म्हणजे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना होणारी जाणीव. पाहणे, ऐकणे, स्पर्श, चव, वास यातून जी जाणीव होत असते ती भौतिक जाणीव असते. भौतिक जाणिवेचा अनुभव येत असतो. जाणिवेच्या पलीकडे नेणीव आहे, नेणिवेची पंच ज्ञानेंद्रियांना जाणीव होत नाही, अनुभव येत नाही. नेणीव म्हणजे मानसिक संकल्पना, ज्या मनाने निर्माण केलेल्या विचारातून निर्माण होत असतात. 

भौतिक आणि मानसिक अशा जाणीव नेणिवेच्या विरहित अशी सत्य अवस्था असते. 

गुरू नामस्मरण का करायला सांगत असतात? नामस्मरण केल्याने मोक्ष मिळेल असे ते सांगत असतात. म्हणजे नामस्मरण हे सतत मोक्षाची अपेक्षा ठेऊन केले जात असते. नारायण किंवा हरी किंवा इतर कोणताही नाम जप हा त्या नावांचा जप असतो. नाम हे शरीर, मन, बुद्धी या भौतिक अवयवांनी घेतले जात असते, त्याची जाणीव आणि नेणीव दोन्ही होत असते. असे मुद्दाम मोक्षाची अपेक्षा ठेऊन केलेले नामस्मरण हे त्या जाणीव नेणीव रहित सत्य अवस्थेत पोहोचले जात नाही. 

आपल्या आसपासच असलेल्या त्या कालातीत सत्य अवस्थेत काळ सुद्धा प्रवेश करू शकत नाही. जेथे काळ नाही, तेथे विचार जाऊ शकत नाहीत, तेथे कसलेही अनुभव नसतात. जे काही अनुभव येत असतात ते सर्व मनाला येत असतात, मनाला आलेले सर्व अनुभव हे मानसिक असतात म्हणून भ्रामक असतात. 

वेद आणि इतर कोणत्याही श्रेष्ठ धार्मिक - अध्यात्मिक ग्रंथ यांना सुद्धा ज्या सत्य अवस्थेचे वर्णन करता येऊ शकत नाही तेथे माझ्या सारख्या क्षुद्र मानवी गुरूंना ते कसे शक्य होईल. अज्ञानी गुरूंनी काल्पनिक वैकुंठ सारखे स्वर्ग नरक आणि त्यांच्या सुरस पौराणिक कथा आणि त्यांची पारायणे सुरू केली आहेत, अशांपासून सावध असावे. 

हि खूणगाठ कायम लक्षात असू द्यावी की, सत्य अवस्था हि जाणीव नेणीव रहित किंवा योग सूत्रात सांगितल्या प्रमाणे संकल्प विकल्प रहित अशी परम शांत अवस्था आहे. त्या अवस्थेत ग्रंथ पारायणे, नामस्मरण, विचार करणे सुद्धा त्या परम शांत अवस्थेची विकृती करणे होय. या सत्याचे आकलन झाले तर भोंदू गुरू आणि त्यांचे स्वार्थी संप्रदाय यांच्या पासून फसवणूक होणार नाही आणि हे आकलन हेच सत्य अवस्थेचे आकलन होय.

No comments:

Post a Comment