Tuesday, September 07, 2021

What-is

 


कृष्णमूर्ती यांनी सत्य स्थिती आकलन होण्यासाठी  नेहमी What-is म्हणजे आत्ता जे काही चालले आहे त्या वर्तमानाच्या जाणिवेत सतत राहावयास सांगितले आहे. साधक ध्याना मध्ये सतत श्वास किंवा मंत्र याच्या जाणिवेत असतो तसे दिवसभर अवांतर विचार टाळण्यासाठी फक्त what is याच्या जाणिवेत राहावे. आपण जे काम करीत असतो केवळ त्या कामाची जाणीव ठेवणे हेच what-is ची जाणिव असणे होय.

आत्ताच्या क्षणाची जाणिव असणे हे सत्य अवस्थेचे आकलन होण्यात अत्यंत आवश्यक असते. हि जाणीव तेव्हाच शक्य होती जेव्हा आपण त्यावेळच्या घटनेवर टीका करणे, प्रतिक्रिया देणे, अनुकूलता अथवा प्रतिकुलता दाखविणे, तिला नाव गाव आदि ओळख देणे हे थांबवितो. हे सर्व अवांतर गोष्टी टाळल्या तर त्या सोबतचे विचार थांबतात आणि आपण फक्त निरपेक्ष जाणिवेत ( *choiceless awareness* ) राहू शकतो. 


अशा निरपेक्ष जाणिवेच्या अवस्थेत असणारा साधक हा मुक्ततेच्या मार्गावर असतो. परंतु इतर जे तथाकथित भोंदू गुरु शिष्य असतात त्यांना अशा निरपेक्ष जाणिवेची कल्पनाच असू शकतं नाही. ते जे असतात ते लपवून ते जे नाहीत त्याचा दिखावा करीत राहतात. आणि ते त्याच धुंदीत सदैव असतात. इतरांवर टीका टिप्पणी करणे, प्रतिक्रिया देणे, पाठांतर केलेल्या पारंपरिक गोष्टी सतत उगळणे हा त्यांचा स्वभाव बनतो. 


ज्यांना सत्याचे आकलन करावयाचे आहे त्यांनी What-is म्हणजे नेमके काय आणि त्याच्या जाणिवेत कसे राहायचे हे माहिती करून घेणे म्हणून अत्यावश्यक होते. ' जे काय आहे ते' याची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता आणि करुणामय हृदयाची आवश्यकता आहे. जे काय वर्तमानात होत असते ते हे नेहमी बदलत असते ते सतत परिवर्तनशील असते. ज्यांचे मन पारंपरिक श्रद्धा आणि परंपरा यांच्यामध्ये ठाण मांडी घालून बसलेले असते ती मने जे सतत हालचाल करीत असते, सतत बदलत असते त्याचा पाठलाग करीतच नाही. जे काही सत्य आहे ते कधीच स्थिर असू शकत नाही ते सतत बदलत असते. सतत परिवर्तनीय असलेल्या वर्तमानात राहण्यासाठी मन तितकेच ताजे असावे लागते. ज्यांची मने हजारो वर्षांच्या जुनाट ज्ञानाच्या चिखलात रुतलेली आहेत ते वर्तमानातील सत्याचा माग काढू शकत नाहीत. सत्य भूतकाळात नसते ते सतत वर्तमानात असते, त्यासाठी ते सतत परिवर्तनशील असते. अशा गतिमान सत्याचे आकलन करण्यासाठी आपले मन सुद्धा तितकेच गतिशिल असायला हवे, ते सतत वर्तमानात असावे. पूर्वीचे कितीही महान साधू संत विचारवंत होवून गेलेले असोत त्यांच्या वरील श्रद्धा, भक्ती मधून सत्य आकलन होवू शकत नाही किंवा त्यांनी लिहिलेल्या प्रचंड मोठ्या ग्रंथांचे वाचन केल्याने, पारायण केल्याने सत्याचे आकलन शक्य नाही. पूर्वीच्या परंपरांच्या चिखलात रुतलेले आजचे तथाकथित ज्ञानी हे समाजाचे अतोनात नुकसान करीत आहेत. ते स्वतः ज्या चिखलात रुतले आहेत तिथून ते बाहेर येवू शकत नाही मग इतरांना त्या चिखलात आणून सगळेच तो चिखल तुडवीत सर्व मानव जातीचे भविष्य वाया घालवीत आहेत.


जे कृष्णमुर्ती, Introduction, First and Last Freedom




Saturday, September 04, 2021

सत्य आकलन कसे होते?


 सत्य आपणास दुसरा कोणी देवू शकत नसतो. ते तुमचे तुम्हीच ओळखायचे असते फक्त ते ओळखण्यासाठी आपल्या मनाची अशी अवस्था असायला हवी की त्याच्यात ते आकलन करण्याची पात्रता असावी. ज्यावेळी मनात विरोध असतो, पूर्वग्रह असतात त्यावेळी मन आकलन करण्यास पात्र नसते. 

आपण आत्ता जे काही करीत असतो तिकडे आपण लक्ष न देता भलत्याच गोष्टींचा सतत विचार करीत असतो. आत्ता जे काही होत आहे त्याची जाणीव असली तर ते समजणे शक्य होते. जे काही होत आहे ते आहे तसे समजून तेव्हाच घेतले जाते जर आपण त्यास विरोध करीत नसू किंवा त्याचे समर्थन करीत नसू किंवा त्यावर टीका करीत नसू किंवा त्याचा गैरअर्थ काढीत नसू. अशी ज्यावेळी मनाची अवस्था होते तेव्हा ते मन विवेकी बनते. जेव्हा आपण त्याचा गैरार्थ काढू, टीका टिप्पणी करू, विरोध करतो तेव्हा त्या वास्तवाचे सत्य समजणे शक्य होत नाही. 


एखादे संशोधन करताना शास्त्रज्ञ ते जे काही आहे त्याचे फक्त अवलोकन करीत असतात. ते कसे असावे किंवा कसे नसावे असा ते अंदाज लावीत बसत नाहीत तसेच आपले आकलन असावे. जर आपण सर्वजण बघताना, ऐकताना, अवलोकन करताना अशी काळजी घेवू की जे जसे आहे ते तसेच त्याच्या फक्त जाणिवेत राहिलो तर सर्व प्रश्न सहज सुटू शकतात. सर्व संघर्ष समाप्त होवू शकतील. जर मी लबाड असेन आणि ते मी कबूल करीत असेन तर सर्व प्रश्न तिथेच निकालात निघतील. आपण जसे आहोत तशी त्याचे प्रत्येकानी कबुली देणे हाच विवेकाचा जन्म असतो, वास्तव परिस्थीती समजण्याची ती सुरुवात असते, त्यातूनच आपली काळाच्या बंधनातून मुक्तता शक्य होणार असते. 


आपण आता यापुढील संवाद मध्ये आपण तेच करणार आहोत. आत्ता जे काही आहे ते तसेच मी आपल्या निदर्शनात आणून देत जाईन, त्याचे माझ्या पूर्वग्रह अनुसार मी अर्थ लावणार नाही, आपण सुद्धा आपल्या पूर्वज्ञाना नुसार ते जे आहे त्याचा अर्थ लावीत बसू नये.


J Krishnamurti,

Introduction,

फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम




Friday, September 03, 2021

सुसंवाद


दोन व्यक्ती एकमेकांस जरी ओळखत असल्या तरी त्यांच्यात सुसंवाद असतोच असे नाही. एकमेकांना सांभाळून घेताना सुसंवाद आवश्यक आहे. सुसंवाद तेव्हाच शक्य होतो जेव्हा सर्वजण एकाच वेळी एकाच पातळीवर असतात, एकमेकांविषयी आपुलकी असते. 


मी धार्मिक, अध्यात्मिक, मानसशास्त्र अथवा वैज्ञानिक वाचन करीत नाही त्यामुळे मी त्यातील अवघड संकल्पना मांडीत बसत नाही. साध्या सोप्या शब्दात आपण संवाद केला तर समजणे सहज होते. 


परंतु जर आपण ते लक्षपूर्वक ऐकले नाही तर ते सुद्धा समजणे अवघड होवू शकते. ऐकणे ही सुद्धा एक कला आहे. ऐकताना आपण आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवायला हवेत. संपूर्ण लक्ष दिले तर ऐकणे सुलभ होते. परंतु ऐकताना जर आतून विरोध असेल, भीती असेल, आसक्ती असेल तर ते ऐकले जात नाही. किंवा आपणास आपल्या दैनंदिन जीवनात काही त्रास होत असेल तरी सुद्धा ऐकण्यावर लक्ष लागू शकत नाही. म्हणजे आपण जे ऐकत असतो ते आपलेच ऐकत असतो, समोरचे जे सांगणे असते ते आपल्या आतमध्ये उतरत नाही. त्यामुळे एकमेकांचे ऐकणे हे अतिशय अवघड होवून गेले आहे आणि ती आपल्या सर्वांची समस्या बनली आहे.


कदाचित माझ्या सांगण्यात येणारे जे काही असेल ते आपणास रुचत नसेल, आपल्या श्रद्धाच्या ते विरुद्ध असेल, आपला त्यास विरोध असेल, मी चुकीचे सांगत असेन किंवा आपण चुकीचे ग्रह बनविले असतील तरी सुद्धा कृपया ते लक्षपूर्वक ऐका. कारण आपण लक्षपूर्वक ऐकले आणि त्यावर चिंतन केले तर त्यामधून आपणास सत्य म्हणजे काय असते याचे कदाचित आकलन होवू शकते. 


J Krishnamurti, First and last freedom, Introduction


Thursday, September 02, 2021

सत्याची ओळख

अध्यात्मिक साधक अशी कालातीत अध्यात्मिक अवस्था शोधीत असतात, ज्या अवस्थेत त्यांचा अहं आणि मी चा नाश होवू शकतो. परंतु हा एक असा चाणाक्षपणा आहे ज्यामुळे उलट शोध घेणाऱ्याचा मीपणा, अहं अधिक बळकट होत असतो.

जेव्हा साधक अशी श्रद्धा धरून चालतो की कालातीत, ईश्वर, सत्य, अमर अशी अवस्था असते त्यावेळी तो त्याचा मी पणा अधिक दृढ करीत असतो.

आपला मी हाच अशा अंध श्रद्धा युक्त कल्पना निर्माण करत असतो ज्या कल्पना मधून तो मीपणाचा नाश करण्याच्या वल्गना करीत असतो. कालातीत ब्रम्ह अवस्था ही अशीच कल्पना आहे ज्यामुळे आपला अहं दृढ होत असतो. अशा भ्रामक कल्पनांनी आपण आपल्या अहं चा नाश न करता त्याला ब्रम्ह हे वेगळे नाव, वेगळा आयाम मात्र दिला आहे. भौतिक किंवा अध्यात्मिक हे वेग वेगळे नसून ते मी पणाच्या वेगळ्या कृती आहेत. एकच अहं, एकच मी हा वेगवेगळ्या संकल्पना मांडून स्वतःला जिवंत ठेवीत असतो.

जेव्हा या संपूर्ण धूर्त, विलक्षण चाणाक्ष पणाच्या कृतीला प्रचारी सद्गुणांद्वारे, ऐकीव अनुभवाद्वारे, अंधश्रद्धाद्वारे कसे झाकतात हे पाहिले तर लक्षात येते की ते सर्व एका न संपणाऱ्या वर्तुळात फिरत आहेत. मन त्याच्या स्वतःच्या कुटील निर्मितीच्या पिंजऱ्यात अडकत असते. 

जेव्हा आपण हे पाहता तेव्हा काय होते?

जेव्हा काहीही नसताना या धर्मांध आणि तथाकथित अध्यात्मिक बुवाबाजी करणाऱ्यांनी त्याचा प्रचंड मोठा जो डोलारा उभा केला आहे तो पाहताना, तो धूर्तपणा जर लक्षात आला तर काय होईल?

जेव्हा एखाद्याला या सत्याची जाणीव होते, त्याबद्दल पूर्ण माहिती येते, तेव्हा तो विलक्षण शांत नाही का होणार? बळजबरीने नव्हे, कोणत्याही पुरस्काराद्वारे नाही, कोणत्याही भीतीद्वारे नाही, जेव्हा तुम्ही ओळखता की मनाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक कल्पना ही फक्त त्याला बळकट करण्याचा एक प्रकार आहे, जेव्हा तुम्ही त्या स्थितीचे निरीक्षण करता, जेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव होते, जेव्हा तुम्ही त्या वैचारिक टप्प्यावर येता, मानसिक अनुभवांद्वारे नाही, परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या स्थितीत असता, तेव्हा तुम्हाला दिसेल की, मन पूर्णपणे स्थिर झाले आहे आता त्याच्यात कुटीलता निर्माण करण्याची कुटिलता उरली नाही.

मन जे काही कुटिलता निर्माण करते ती कुटीलता तिच्या एका वर्तुळात फिरत असते, तिच्या स्वतःच्या क्षेत्रात. जेव्हा मन कुटिलता निर्माण करत नाही तेव्हा जी सहजता निर्माण होते, ती सहजता ओळखण्यायोग्य नसते. सहजपणा, वास्तव, सत्य ओळखले जाऊ शकत नाही. ती विचारांची प्रक्रिया नसते की ती विचारांनी ओळखली जावू शकते.

जीवनात सत्य येण्यासाठी श्रद्धा, ज्ञान, अध्यात्मिक अनुभव हे सर्व जाणे अत्यंत आवश्यक आहे.

सद्वर्तनी, सद्गुणांचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला सत्य सापडत नाही. तो एक अतिशय सभ्य व्यक्ती असू शकतो परंतु तो सत्य जाणणारा, सत्य समजणारा माणूस असण्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असतो. एक सद्गुणी माणूस एक नीतिमान माणूस असू शकतो परंतु एक नीतिमान माणूस सत्य काय आहे हे समजू शकत नाही. कारण त्याच्यासाठी सद्गुण हे त्याच्या अहंचे आच्छादन आहे, अहंला तो बळकट करत असतो कारण तो वैचारिक, काल्पनिक सद्गुणांचा पाठपुरावा करत असतो. 

जेव्हा सद्गुणी म्हणतो, 'मी लोभाशिवाय असणे आवश्यक आहे,' अ-लोभाची स्थिती ज्याचा तो अनुभव घेतो ती केवळ एक मानसिक कल्पना असते आणि अशा अनेक मानसिक कल्पना ह्या अहं याला बळकट करत असतात.

म्हणून केवळ भौतिक संसाधनानीच नव्हे तर अंधश्रद्धा आणि ज्ञानामध्येही गरीब असणे खूप महत्त्वाचे आहे. ऐहिक श्रीमंती असलेला माणूस किंवा ज्ञान आणि अंधश्रद्धा यांनी समृद्ध असलेला माणूस अंधाराशिवाय दुसरे काहीही जाणणार नाही आणि तोच जगातील सर्व दुष्टपणा आणि दुःखांचे केंद्र असतो.

या उलट सत्याच्या माणसाला, सत्य हे त्याच्या जीवनातच अस्तित्वात आलेले असते.

परंतु जर तुम्ही आणि मी एक सामान्य व्यक्ती म्हणून मी पणाची संपूर्ण कुटिलता पाहू शकलो तरच सत्य काय आहे हे आपल्याला कळेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हाच एकमेव बदल आहे जो जग बदलू शकेल. मी पण म्हणजे सत्य नव्हे, प्रेम नव्हे. 

अहंकार आणि मी पण हे कधीच सत्याला ओळखू शकत नाही. ते वर वर प्रेम करताना दिसेल परंतु अंतर्यामी ते कुटील असते. परंतु ज्याला सत्याचा स्पर्श होतो तो कुटील नसतो, तिथे मीपणा नसतो, अहंकार नसतो.

From the book The First and the Last Freedom, by J. Krishnamurti.


मानवी आहार आणि पृथ्वी

आपल्या आहारा मधील बदलाने आपण पृथ्वी ग्रह वाचविण्यात मदत करू शकतो !!! 

अन्न हे जीवनासाठी मूलभूत आहे.

आपण खात असलेल्या गोष्टी मानव जातीच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठ्या धोक्यांना उत्तेजन देत आहेत. उपलब्ध पुराव्यांमुळे असे दिसून आले आहे की मानवाच्या औद्योगिक अन्न उत्पादन प्रणाली या प्रदूषणाचे स्त्रोत आहेत, हवामान बदलाला योगदान देणारे आणि जैवविविधता नष्ट होण्याचे कारण आहेत. पृथ्वी वरील अन्न साखळी नष्ट झाली तर मानव नामशेष होवू शकतो.


आपण ते बदलण्यास मदत करू शकता. आपल्या आहार मुळे होणारा पर्यावरणीय त्रास कमी करण्यासाठी आपण खालील काही गोष्टी आज करू शकता.

1. अन्न हे आता उत्पादन राहिले नाही ती एक फार मोठी व्यापारी प्रक्रिया बनली आहे

लोक बऱ्याचदा किराणा दुकानाच्या शेल्फवर अन्न पाहतात आणि ते तिथे कसे पोहोचले याबद्दल जास्त विचार करत नाहीत. परंतु शेत आणि आपले जेवणाचे ताट या दरम्यान, अन्नावर प्रक्रिया, पॅकेज, वाहतूक, विपणन आणि विक्री करणे आवश्यक आहे. त्यापैकी बरेच टप्पे ग्रहासाठी हानिकारक असू शकतात. जेव्हा आपण या संपूर्ण अन्नपद्धतीचा विचार करता, तेव्हा आपण जे खातो त्याची निवड करण्यासाठी आपण  अधिक चांगल्या स्थितीत असता.

2. शाश्वत शेतीला समर्थन द्या

आपले अन्न अशा उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करा जे टिकाऊ उत्पादनांमध्ये तज्ञ आहेत.

शाश्वत शेती 56 टक्क्यांपर्यंत कमी ऊर्जा वापरते, ६४ टक्के कमी हरितगृह वायू उत्सर्जन निर्माण करते आणि पारंपारिक शेतीपेक्षा जैवविविधतेच्या अधिक पातळीला परवानगी देते. टिकाऊपणे उत्पादित केलेली उत्पादने अधिक श्रम केंद्रित असतात, ते 30 टक्के अधिक रोजगार निर्माण करू शकतात, शेतकरी जास्त नफा कमावू शकतात आणि जास्त उत्पन्न मिळवू शकतात.

3. आपण काय खात आहात ते जाणून घ्या


कीटकनाशके, तणनाशके आणि अँटीमाइक्रोबियल औषधे बहुतेक वेळा पीक आणि पशुधन उत्पादन वाढवण्यासाठी वापरली जातात परंतु मानवी आरोग्यावर त्यांचा हानिकारक परिणाम होऊ शकतो. 


लेबल वाचा, प्रश्न विचारा आणि अन्न कुठून येते आणि ते कसे तयार केले जाते याबद्दल आपले संशोधन करा.  जेव्हा शक्य असेल तेव्हा रासायनिक शेती केलेले आणि खूप प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांपेक्षा शाश्वत-शेती केलेले संपूर्ण अन्न निवडा. पार्सल फूड खरेदी करण्याऐवजी घरी जेवण तयार करा.


4. स्वतःची बाग लावा


स्वतःचे शेती उत्पादन वाढवल्याने इतरांनी बनविलेले रासायनिक अन्न दूर होते. कीटकनाशके, पॅकेजिंग, संरक्षन, वाहतुकीसाठी इंधन आणि कोल्ड चेन स्टोरेज यावरील खर्च वाचविता येतो. फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती त्यांच्या सर्वात नैसर्गिक स्वरूपात त्या सर्वात जास्त पौष्टिक असतात. ते अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्त्वे अधिक आहेत आणि तेही तुलनेने कमी खर्चात.


सामुदायिक शेती करण्यासाठी शेजारी आणि मित्रांना गुंतवा. आपल्या घराच्या आसपास, आपल्या बाल्कनीवर किंवा खिडकीवर फळे आणि भाज्या वाढवा.


5. स्थानिक अन्न निवडा


लहान व्यवसाय आणि शेतांना आधार देण्याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवर उत्पादित अन्न खरेदी केल्याने वाहतूक आणि कोल्ड चेन स्टोरेजशी संबंधित जीवाश्म इंधन उत्सर्जन कमी होते. वाटेत अन्न नुकसान होण्याची शक्यता देखील कमी करते.


स्थानिक उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांशी नातेसंबंध निर्माण केल्याने आपले अन्न कसे तयार होते हे समजून घेता येते. आपण सुसंवाद करून, विचारांची देवाणघेवाण करून एकमेकांस पूरक अन्न साखळी निर्माण करू शकतो.


6. वनस्पती आहार स्वीकारा


अलिकडच्या वर्षांत प्राण्यांच्या अन्नाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या, जगातील सुमारे 60 टक्के शेतजमीन हि पशुधन चराईसाठी वापरली जाते आणि लोक निरोगी राहण्यापेक्षा चवीसाठी पशूयुक्त अन्न जास्त वापरतात.


वनस्पती-समृध्द आहार स्वीकारल्यास कमी जमिनीचा वापर होईल, कमी विषारी वायू तयार होईल, कमी पाण्याची आवश्यकता असेल आणि प्राण्यांचे जीवनमान सुधारेल. 2050 मध्ये वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येला 9 अब्ज लोकांपर्यंत पोहोचवण्या बरोबरच ते अधिक शेत जमीन उपलब्ध करेल. वनस्पती-समृध्द आहाराकडे वाटचाल केल्याने हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या जुनाट आजार कमी होण्यास मदत होऊ शकते. उपचाराचा संबंधित खर्च आणि गमावलेले उत्पन्न दोन्हींची भरपाई होवू शकते.


7. आपल्या आहारात विविधता आणा


आपला आहार हा अधिक प्रमाणात एकसंध आणि विषमतेने अशा अन्नावर आधारित असतात जे उर्जा समृद्ध असतात, परंतु सूक्ष्म पोषक घटकांमध्ये ते गरीब असतात. गेल्या 100 वर्षांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पीक जाती गायब झाल्या आहेत.  आज, एकूण नऊ वनस्पती प्रजाती एकूण पीक उत्पादनाच्या 66 टक्के आहेत. तीनपैकी जवळजवळ एक व्यक्ती कुपोषणाच्या कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ग्रस्त आहे, अनेक देशांना एकाच वेळी कुपोषण आणि जास्त वजन किंवा लठ्ठपणा या दोन्ही आव्हानांचा सामना करावा लागतो.


ईएटी-लॅन्सेट कमिशन रिपोर्ट नुसार, वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांच्या विविधतेसह निरोगी आहाराकडे वाटचाल करणे, आणि अतिप्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांपासून दूर, साखर युक्त अन्न टाळले तर सर्व प्रौढांचे मृत्यू एक चतुर्थांशपर्यंत रोखता येतो.


8. अन्न टाकणे कमी करावे


उत्पादित केलेल्या अन्नापैकी एक तृतीयांश अन्न वाया जाते. हे केवळ दुकाने किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा केवळ श्रीमंत घरांमध्ये होत नाही. ही एक जागतिक समस्या आहे जी सर्व उत्पन्नाच्या घरात होत असते. 


अन्न वाया घालविणे कमी करण्यासाठी, अगोदर योजना करा आणि आपल्याला माहित असलेले अन्न खरेदी करा.  आपण खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांच्या प्रत्येक खाद्य भागाचा लाभ घ्या.


शिजवण्यापूर्वी तांदूळ आणि इतर मुख्य वस्तूंचे मोजमाप करा, अन्न योग्यरित्या साठवा (शक्य असल्यास फ्रीजर वापरा), उरलेल्या अन्नाचे नियोजन करा. आपल्या मित्रांसह आणि शेजाऱ्यांसह अतिरिक्त गोष्टी सामायिक करा आणि स्थानिक अन्न-वाटणी योजनेत योगदान द्या.  शेवटी अखाद्य अवशेषांपासून कंपोस्ट खत बनवा आणि आपल्या बागेला सुपिकता देण्यासाठी ते वापरा.


9. अनावश्यक पॅकेजिंग टाळा


दरवर्षी सुमारे 5 ट्रिलियन एकदाच-वापर केलेले प्लास्टिक पिशव्या जमीन आणि समुद्र प्रदूषित करतात.


जेव्हा शक्य असेल तेव्हा, पॅक न केलेले, टिकाऊ किंवा कमीत कमी पॅक केलेले खाद्यपदार्थ निवडा. अन्न खरेदीसाठी बास्केट वापरा, पुन्हा वापरण्यायोग्य किंवा कापडी पिशव्या सोबत ठेवा आणि काचेच्या भांड्यात अन्न साठवा किंवा मधमाशीचे मेण किंवा इतर टिकाऊ सामग्रीमध्ये लपेटून ठेवा.


10. आपला आवाज बुलंद करा


आता अस्तित्वात असलेल्या व्यापारी, विकृत अन्न व्यवस्थेला सबसिडी देण्यासाठी, त्यांना बाजारात खपविण्यासाठी, चांगल्या बदलाला अडथळा आणण्यासाठी आणि मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी जगभरातील सरकारी यंत्रणा दर मिनिटाला 1 दशलक्ष डॉलर्स खर्च करते.


शासकीय आणि धोरणकर्त्यांना शाश्वत शेतीकडे संक्रमण करण्यासाठी आणि त्यांच्या हवामान बदलाच्या कृती योजनांमध्ये अन्न नुकसान आणि कचरा कमी करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करा. उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि कृषीसेवां पुरविणारी यंत्रणा या सर्वांना अन्न आणि त्यांच्या पोषण मूल्यांबाबत पारदर्शकता आणण्याचे आवाहन करा.


आपल्या स्वतःच्या सामाजिक संस्थामध्ये प्रचारक व्हा.  माहिती, पाककृती, कल्पना आणि प्रेरणा सामायिक करण्यासाठी आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरा.  आपले नेटवर्क तयार करा, योजना सुरू करा, आपला आवाज वाढवा.


(सरकारी यंत्रणा, खाजगी व्यापारी संस्था, राजकारणी यांनी आता पर्यंत पृथ्वीचे अमाप नुकसान केले आहे, पुढेही ते करत राहतील. त्यांच्या कडून बदलाची अपेक्षा ठेवू नका. आपण बदलू चला, जग आपोआप बदलेल. शिवाजी, गांधी एकटेच होते परंतु त्यांनी इतिहास घडविला आहे.)