Sunday, January 24, 2021

वैश्विक सत्य ही सुद्धा एक कल्पना असू शकते काय?


 

संपूर्ण विश्व आज जे कमालीचे नियंत्रित, सुव्यवस्थित दिसत आहे तसे ते सुरुवाती पासून नव्हते आणि काही प्रमाणात आजही पृथीवर आणि पृथ्वी ग्रहा बाहेर नैसर्गिक उलथा पालथ ही होत असते.


विश्वाचा जन्म हा करोडो वर्षा पूर्वी झाला आहे (१३.८ billion years before). इतक्या प्रचंड कालखंड मध्ये अतिशय अव्यवस्थित असणारा सृष्टीचा पसारा relatively stable झाला आहे. पृथ्वी ग्रहावर अनेक महा संहारक घटना घडल्या नंतर पाणी, प्राणवायू आणि इतर जीवन संवर्धक elements निर्माण झाले. हे निर्माण होण्यासाठी जे काही combinations बनले गेले ( मुद्दामहून न बनविता ) ते तसेच इतर ग्रहावर बनणे महा कठीण आहे. परंतु विश्वाचा अती प्रचंड पसारा पाहता ती शक्यता नाकारता येत नाही. 


पृथ्वीवरील जीव सृष्टी मध्ये मनुष्य प्राणी सुद्धा अनेक स्थित्यंतरे पार पडून निर्माण झाला आहे. मनुष्य प्राण्याच्या विचार करणाऱ्या मर्यादेच्या अती विस्ताराने त्याने असंख्य संकल्पना निर्माण केल्या. या संकल्पना निर्माण होवून हजारो वर्षांचा कालावधी गेला आहे. या संकल्पना भोवती श्रद्धाच जाळे घट्ट विणले गेले आहे त्यामुळे संकल्पना अबाधित राहिल्या आहेत. मंगळ ग्रहावर यान पाठविणारे भारतीय शास्त्रज्ञ प्रथम बालाजी दर्शन करून येतात या वरून त्याची ताकद कळून येते. श्रद्धा मुळे विशाल जन समूहावर मोहिनी घातली जावू शकते, राज्य करणे सुकर होते. श्रद्धांना राजाश्रय मिळाला की त्यांना अभय मिळते आणि त्यांचा प्रचार, प्रसार करणे शक्य होते. राजा, धर्म, पुजारी, व्यापारी यांचे एकत्रीकरण इतके ताकदवर झाले आहे की आम जनतेस ते एकत्रीकरण स्वीकारावे लागते आणि सत्यशोधक हे समाजद्रोही ठरविले जातात. 


वैश्विक परिस्थितीचा अभ्यास जर गांभीर्याने केला तरच सत्य समजून येते की वैश्विक सत्य ही सुद्धा संकल्पना असू शकते.


पृथ्वीवरील यशस्वी जीवन जगण्याचा एकच मूलमंत्र आहे survival of fittest, बळी तो कान पिळी.


आपणास असे वाटते की Trump गेल्या नंतर Biden सत्तेवर येतात याचा अर्थ कोणती तरी वैश्विक शक्ती कार्यरत असल्या मुळे ते शक्य होत असावे. परंतु अशी वैश्विक शक्ती असती तर Trump सत्तेवर सोडा जन्मालाच आला नसता. कदाचित भविष्यात अनेक trials नंतर असे मनुष्यच जन्माला येवू शकतील जे पृथ्वीवर सहकार्याने सहजीवन व्यतीत करू शकतील, याच्या मागे सुद्धा survival of fittest हाच नियम असेल. 


कलिंग चे महायुद्ध करणारा सम्राट अशोक अहिंसेची शिकवण अंगीकार करतो हाच एक भविष्यातील मानव जातीसाठी फार मोठा आशेचा किरण आहे. 

Meditation means to ponder over, ध्यान म्हणजे सर्व शक्य अशक्य गोष्टींचा विचार करणेच आहे. 


|| कालाय तस्मैनमः ||

Friday, January 22, 2021

नेती नेती

 


आपण दिवसभर मेंदूतून निर्माण होणाऱ्या विचारांवर सतत मनन, चिंतन, ध्यान करत असतो. मंत्र जप करणे हा सुद्धा विचार आहे.

जेव्हा जेव्हा आपल्या हे लक्षात येते की आपण उगाच, अनाठायी विचार करीत आहोत, त्याक्षणी विचार थांबतात त्यांना तसेच काही काळ थांबून द्यावे. याद्वारे त्या क्षणापूर्ती शांतता आपल्या अंतरंगात झिरपते. हे थोडे थोडे झिरपणे सतत चालू राहिले तर आपले पूर्वीचे विचार त्यामध्ये विरघळले जातात, शांतता पसरण्यास जागा निर्माण होवु लागते. 

विचार कितीही क्षुद्र असो किंवा कितीही महान असो तो विचारच असतो आणि आपली शांतता भंग करण्यासाठी तो वेगवेगळ्या रुपात येत राहतो ते त्याचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी. 

प्रत्येक विचाराचे नेती नेती म्हणून अस्विकार करणे हेच जीवनात शांतता प्रस्थापित करण्याचे सूत्र ठरावे.

Wednesday, January 20, 2021

नवीन प्रेषित



दुःखी व मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या जगात जेव्हा एखादा प्रेषित येतो व जगातील दुःख दूर करून त्याला शाश्वत सुखाकडे नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जगाची खरोखरच दुःखातून मुक्तता होते का? शाश्वत सुख त्याला लाभते का? या प्रश्नांचा शोध या कथेद्वारा खूप हृदयंगमतेने घेतला आहे. 

एक जग होते. तेथील सर्व माणसे आजारी व विषण्ण होती. प्रत्येकाला त्या दुःखातून स्वतःची सुटका करून घ्यायची होती आणि सुख मिळवायचे होते. या सुखाच्या शोधासाठी त्यांनी प्रार्थना केल्या. पूजा केली, प्रेम केले व द्वेषही केला; त्यांनी लग्ने केली व युद्धे केली. त्यांना त्यांच्यासारखीच दुःखी मुलेबाळे झाली. त्या मुलांना देखील ते हेच शिकवत राहिले की, सुख मिळविणे हा त्यांचा हक्क आहे आणि तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे.

      अशा दुःख जंजाळात फसलेल्या त्या जगात एके दिवशी एक कुजबुज सुरू झाली आणि लवकरच तिचे एका मोठ्या आरोळीत रूपांतर झाले की एक महान शिक्षक येत आहे. या जगावर असणाऱ्या प्रेमापोटी व त्याच्या अंगी असलेल्या सुज्ञपणातून तो दुःखितांना त्यांच्या दुःखापासून आराम मिळवून देणार आहे व जगातील सर्व लोकांना ज्या शाश्वत सुखाच्या शोधाची ओढ आहे ते त्यांना कसे मिळू शकेल हे तो दाखविणार आहे.

        अशा महान शिक्षकाच्या भावी आगमनाची ही सुखद वार्ता सर्वदूर पसरविण्यासाठी अनेक संघटना व संस्था निर्माण करण्यात आल्या आणि कित्येक स्त्रीपुरूष या येणाऱ्या शिक्षकाबद्दल सांगत जगभर हिंडू लागले. काही जणांनी तो त्वरित यावा म्हणून प्रार्थना सुरू केल्या तर काही जणांनी जग त्याच्या स्वागतायोग्य बनविण्यासाठी धार्मिक अनुष्ठाने केली. काही जणांनी प्राचीन काळासंबंधी सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली. पूर्वी ज्या ज्या वेळी महान शिक्षक आले व त्यांनी जगाला शिकवण दिली. त्या विस्मृतीत गेलेल्या या अभ्यासातून येणाऱ्या शिक्षकाची शिकवण अधिक सुलभतेने समजू शकेल असे त्यांना वाटत होते. तो ज्यावेळी येईल त्यावेळी त्याला जाणून घेण्यासाठी काही लोक तरी त्याच्या भोवती असावेत म्हणून काही जणांनी अगोदरच आपण त्याचे शिष्य आहोत असे जाहीर करून टाकले.

       मग एके दिवशी तो आला आणि जगातील लोकांना त्याने सांगितले की त्यांना सुख देण्यासाठी, त्यांच्या वेदना नाहीशा करण्यासाठी व त्यांची दुःखे हलकी करण्यासाठी तो आला आहे. त्याने सांगितले की तो स्वतःही या सर्व वेदनेतून व दुःखातून गेला आहे व त्यातून त्याला शांतीच्या धामाकडे नेणारी वाट सापडली आहे, शाश्वत आनंदाचे साम्राज्य गवसले आहे. त्याने सांगितले की त्यांनाही त्याच वाटेकडे नेण्यासाठी, त्या धामाकडे जाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी तो आला आहे. परंतु तो म्हणाला की त्या साग्राज्याकडे जाणारा रस्ता मोठ्या चढाचा व अरूंद आहे. त्यामुळे भूतकाळात गोळा करून ठेवलेला सर्व वस्तुसंचय बाजूला टाकून देण्यास जे लोक तयार असतील तेच फक्त त्याच्या मागोमाग येऊ शकतील. तो म्हणाला की यासाठी लोकांनी त्यांच्या देवदेवता, त्यांचे धर्म, त्यातील कर्मकांड व सणसमारंभ, त्यांची पुस्तके व त्यातील ज्ञान, त्यांची कुटुंबे व मित्रपरिवार या सगळ्यांना बाजूस सारून टाकले पाहिजे. आणि त्यांनी जर हे केले तर या प्रवासात लागणारी शिदोरी तो त्यांना देणार होता, त्याच्या जवळ असलेल्या जिवंत पाण्याने तो त्यांची धगधगणारी तृष्णा शमविणार होता; आणि स्वतः चिरंतनपणे राहात असलेल्या त्या आनंदाच्या साम्राज्यात तो त्यांना नेणार होता.त्यानंतर ज्या लोकांनी बरीच वर्षे या शिक्षकासाठी तयारी केली होती, त्यांना अस्वस्थ वाटू लागले; ते त्रस्त झाले. कारण आता ते म्हणू लागले होते, "ज्याची आम्ही अपेक्षा केली होती व ज्यासाठी आम्ही तयारी करीत होतो ती ही शिकवणच नव्हे. हे सर्व ज्ञान आम्ही इतक्या परिश्रमपूर्वक मिळविले आहे. त्याचा त्याग आम्ही कसा बरे करू शकणार? या सर्व ज्ञानावाचून जगाला कधीच त्या शिक्षकाचे आकलन होऊ शकणार नाही. आणि हे सर्व भव्य विधिसमारंभ केल्याने आम्हाला इतके सुख मिळते, इतकी शक्ती मिळते. त्यांचा त्याग आम्ही का म्हणून करावा? आम्ही आमचे आत्मस्वकीय तरी कसे सोडून देणार? कारण आम्हाला त्यांची किती तरी निकड आहे. ही काय शिकवण झाली?"

       आणि मग ते आपापसात प्रश्न करू लागले, "खरंच, हेच आपण अपेक्षा करीत होतो ते शिक्षक आहेत काय? आपण कधीही अशी कल्पना केली नव्हती की, ते याप्रकारे बोलतील व आपल्याला अशा प्रकारचे त्याग करायला सांगतील." विशेषतः ज्यांनी स्वतःला त्याचे शिष्य म्हणून घोषित केले होते, त्यांना त्याच्यासंबंधी असलेल्या प्रगाढ ज्ञानामुळे अधिकच अस्वस्थ व त्रस्त वाटू लागले.

       खूप विचारमंथनानंतर व ध्यानानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांना त्यांच्या अडचणींवर उपाय सापडला. ते म्हणू लागले "हे खरे आहे की हा शिक्षक जगाला मदत करण्यासाठी येत आहे. पण हे जग त्याच्यापेक्षा आम्हालाच अधिक चांगले ज्ञात आहे. म्हणून आम्ही त्याचे भाष्यकर्ते म्हणून या जगात कार्य करू."

       म्हणून ज्यांच्याजवळ ज्ञान होते ते म्हणू लागले, "ज्ञानाचा त्याग करा हे त्या शिक्षकाचे आवाहन आम्हाला लागू पडत नाही. कारण जगाला आमच्या ज्ञानाची गरज आहे. त्याच्याशिवाय जगाचे चालणार नाही. म्हणून या जगासाठी तरी आम्हाला ज्ञानार्जन करीत राहिले पाहिजे."

      पूजापाठ व सणसमारंभ करणारे म्हणू लागले, "अर्थातच आम्ही या सर्व व्रतवैकल्यांचा आणि समारंभांचा आमच्या स्वतःच्या लाभासाठी त्याग करून टाकलेला आहे. आम्ही आता त्या सर्व गोष्टींच्या गरजेच्या पलीकडे गेलो आहोत. पण जगाच्या कल्याणासाठी मात्र आम्हाला ते चालू ठेवले पाहिजेत. नाहीतर जगावर दुःख ओढवेल." म्हणून त्यांनी चर्च, मंदिरे इत्यादी बांधणे सुरूच ठेवले व पूजाअर्चा पण सुरू ठेवल्या. हे सगळे जगाच्या मदतीसाठी होते. आणि ते सगळे इतके कार्यरत झाले की त्या शिक्षकाचे ऐकायला त्यांना वेळ उरला नाही.

      काही लोकांनी मात्र स्वेच्छेने त्यांची घरे व कुटुंब यांचा त्याग केला. पण तो त्यांनी त्यांच्या कर्तव्यांपासून व ऋणातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी केला. ते लोक पण शिक्षकाकडे आले व म्हणाले, "तुमचे अनुसरण करण्यासाठी आम्ही सर्व सोडून आलो आहोत. आता तुम्ही आमच्यासाठी एखादी सोपी नोकरी शोधा म्हणजे आम्ही तुमचे कार्य करीत असतांना आमची रोजीरोटी पण मिळवू."

       अगदी मोजके लोकच असे निघाले की त्यांनी सर्व गोष्टी झुगारून दिल्या व त्या शिक्षकाच्या पायाशी बसून भुकेल्यांना अन्न कसे द्यावे आणि तृषार्ताची तहान कशी भागवावी यासंबंधी शिकण्याचा प्रयत्न केला. या लोकांना असे वाटले की त्यांच्या ज्ञानापेक्षा त्या शिक्षकाचा सुज्ञपणाच जगाला अधिक उपयोगी आहे, त्यांच्या गुंतागुंतीपेक्षा त्याची सहजताच अधिक सुलभतेने आकलन होऊ शकते, आणि तो जेव्हा म्हणतो की त्या सुखाप्रत जाण्यासाठी कर्मकांडांची व सणसमारंभांची मूळीच आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा व मित्रपरिवाराचा त्याग तुमच्या हृदयातून केला पाहिजे. त्यांना सोडून दूर जाऊन नव्हे - तेव्हा या गोष्टी तो शिक्षकच सर्वात चांगल्या प्रकारे समजू शकतो.

        परंतु अशा लोकांना इतर लोक स्वार्थी व आळशी संबोधून दूषणे देऊ लागले. से म्हणाले, "जगाला त्या शिक्षकाच्या भाकरीची गरज नसून एका विशिष्ट प्रकारच्या पक्वान्नाची आवश्यकता आहे व त्या पकवान्नाची पाककृती फक्त आमच्याकडेच आहे. जगाला आपली तहान भागविण्यासाठी पाण्याची गरज नसून आमच्या पूजापात्रात असलेल्या तीर्थाची जरूर आहे. तुमच्या शिक्षकाच्या शब्दांचा जगाला काहीच उपयोग नाही; कारण ते शब्द फारच साधे आहेत. त्यामुळे त्यांचा अर्थ जगाला कळू शकणार नाही. जगातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्याकडे तितक्याच गुंतागुंतीचे सिद्धांत आहेत आणि जगाला त्यांचे आकलन होऊ शकते."

       अशा प्रकारे ज्या लोकांनी सर्वाधिक उत्साहाने त्या शिक्षकाचे आगमन जाहीर केले होते, त्यापैकी फारच थोड्या लोकांनी त्याने दिलेली शिकवण लक्षपूर्वक ऐकली. उरलेल्या लोकांपैकी काही म्हणाले, "तुम्हाला अपेक्षित असलेला शिक्षक हा नव्हे.म्हणून खऱ्या शिक्षकाच्या आगमनाची तयारी आम्ही सुरूच ठेवू." काही लोकांना असे वाटले की त्यांनी दार उघडल्याशिवाय इतर कोणीही त्या शिक्षकाप्रत पोहोचू नये. म्हणून त्यांनी त्या शिक्षकाच्या भोवती भिंती बांधल्या व अडथळे निर्माण केले.

      आणि काही वर्षानी तो शिक्षक निघून गेला. त्यानंतर त्याच लोकांनी त्याचा दैवी व ईश्वर-प्रेरित व्यक्ती म्हणून जयजयकार केला, त्याच्या नावाने नवीन चर्च व नवीन मंदिरे उभारली. त्याच्या गौरवाप्रीत्यर्थ नवी व अधिक साग्रसंगीत कर्मकांडे व विधिसमारंभ शोधून काढले आणि त्याने न दिलेल्या शिकवणीच्या आधारावर एक नवा धर्म स्थापन केला. जगाचे दुःख मात्र तसेच राहिले; मदतीसाठी ते पुन्हा आक्रोश करू लागले.

फ्रॉम डार्कनेस टु लाईट - कृष्णमूर्ती

Friday, January 15, 2021

योग

 

आर्थिक मागासलेपण, सामाजिक विषमता, अज्ञान, हिंसाचार, भ्रष्टाचार, अनैतिकता यांना आपण मानवी समस्या समजत असतो परंतु या सर्व समस्या ह्या मानवी विचारातून, मानवी जाणिवेतून निर्माण झाल्या आहेत. मानवी जाणीव ही खरी समस्या आहे. मानव समूहाने आपली जाणीव सुधारली तर बाकीच्या सर्व समस्या सहज नाहीशा होतील. 

योग हे प्राचीन काळात खूप कमी लोक करीत असत, ज्यांना त्याची आवश्यकता आहे तेव्हढेच ब्रम्ह जिज्ञासू साधक योग करीत असत. 

योग हे शारीरिक, मानसिक व्याधिंसाठी नाही तर योग हे भौतिक आणि अध्यात्मिक तत्वांचे मिलन आहे. 

योग अनेक प्रकारचे आहेत त्यामध्ये राजयोग हा प्रमुख आहे. राजयोग म्हणजे विचार विहीन अवस्था, सहज अवस्था, शिस्तबद्ध, नैतिक, सुव्यवस्थित, स्वतंत्र अशी जीवनशैली. यासाठी अशी तल्लख बुद्धिमत्ता विकसित केली जाते ज्यामुळे शरीर आणि मन हे नियंत्रण न करता नियंत्रित राहते.

- जीदु कृष्णमूर्ती 


 योग:कर्मसु कौशलम्।।

Tuesday, January 12, 2021

पुनर्जन्म की मुक्तता


 कृष्णमूर्ती यांची बौद्ध सन्यासी बरोबर पुनर्जन्म, मुक्ती बाबत चर्चा

बौद्ध सन्यासी: सर्व धर्म या ना त्या स्वरुपा मध्ये पुनर्जन्म मानतात. हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञान असे सांगते की जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत स्थूल शरीराच्या मृत्यू नंतर सूक्ष्म तत्वे पुनर्जन्म, पूनार्भव घेतात.

कृष्णमूर्ती: जगातील सर्व मानवांच्या (देश आणि धर्म सह) समस्या सारख्या आहेत कारण सर्वजण एकाच वैचारिक धारणेचे बळी आहेत. त्यामुळे असे म्हणता येते की जग आणि मी हे एकच आहेत. वैयक्तिक धर्म काय सांगतो यापेक्षा संपूर्ण मानव समाजाचा आपण विचार करू या. 

मृत्यू कशाचा होतो? शरीर? शरीराची ओळख (नाम – रूप)? शरीराच्या समस्या यांचा होतो काय?

मानवी जीवनात थोडेसे आनंदाचे क्षण सोडले तर बहुतांश मानवी जीवनाची दुःखाची नदी अखंड वाहत असते. मृत्यूनंतर या मानवी समस्यांचे काय होते? 

दुःखाच्या नदीमध्ये वाहत जाणाऱ्या एखाद्या जिज्ञासुला याची जाणीव होते की यातून बाहेर पडण्याचे सर्व जुने मार्ग नदिमधील आहेत ते आपणास नदिमधून बाहेर पडू देत नाहीत. तो नदीतील सर्व मार्गदर्शकांचे सल्ले बाजूला ठेवतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि तत्क्षणी त्याला ठाव सापडतो, त्याला आता प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचे कारण रहात नाही.

त्या माणसाचा स्वभाव काय असू शकतो? त्याने त्याच्या सर्व संकल्पनांचा, सर्व इच्छांचा अंत केलेला असतो आणि हाच खरा मृत्यू होय. आणि तिथूनच सत्य, ज्ञान, प्रेम, करुणा, विवेक त्याच्या  जीवनात येवू लागतात. जाणीव नेणीव विरहित निरपेक्ष जीवनामध्ये सहजता येते. अशी सहजता नसेल ते ध्यान असू शकतं नाही आणि त्या शिवाय सत्याला काही अर्थ असू शकत नाही.

बौद्ध सन्यासी: हेच खरे बुद्धाचे सती पठ्ठान आहे परंतु जे शिकविले जाते ते हे नव्हे. बुद्धाचे खरे ध्यान शिकविले जात नाही कारण ते समजत नाही.

कृष्णमूर्ती: इतर प्रवाह पतीत त्यातून तत्क्षणी बाहेर पडण्याऐवजी नंतर बघुया म्हणत भावी योजनांच्या कल्पना करीत वाहत राहतात, त्यांना यासाठी वेळ नसतो, इतर काहीजण सांसारिक सुखांच्या मागे धावत राहतात, काहीना तेच आपले नशीब आहे असे वाटते आणि या सर्वांमुळे दुःखाची नदी दुथडी भरून अखंड वाहत राहते. 

https://youtu.be/np57tASzQyc