Tuesday, June 28, 2011

Nagewadi

माझा जन्म कराड या शहरात झाला. परंतु माझे गाव सातारा जिल्ह्यातील नागेवाडी हे आहे. चौथी इयत्ता पास झाल्यानंतर आम्ही सर्व कुटुंबीय नागेवाडी येथे राहायला आलो.

माझे  वडिल कै एकनाथ सीताराम सावंत  यांच्याकडून मला नागेवाडी गावचा इतिहास समजला तो असा कि, पूर्वी काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हे जवळच्या लिंब या गावचे रहिवासी होते.  आमचा मूळ पुरुष हा लहानपणीच पोरका झाला होता. नागडा उघडा अवस्थेत त्याला त्याच्या आजोळच्या लोकांनी सांभाळले होते. त्याला उपहासाने  नागडा आसे संबोधले जायचे.

तो मोठा व  ताकदवर झाल्यानंतर तो आपल्या मामाबरोबर आपली जायदाद मागायला आला. त्यावेळेस भरपूर जमीन  व लोकसंख्या कमी असल्यामुळे, त्याला तो पळेल तेवढी जागा देण्याचे कबूल केले गेले.

मुद्दामहून त्याच्या पळण्याच्या  ठिकाणाची सुरुवात हि माळराना  पासून करवण्यात आली व तो मळरानात घुसू नये म्हणून त्याला अटकाव करण्यासाठी काही घोडेस्वारांची कुमकहि  ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे त्याची फसवणूक करून त्याला फक्त माळरानाची जमीन देण्यात आली.

याच जमिनीमध्ये त्याने आपली वस्ती केली व आपला संसार सुरु केला  त्याला नागड्याची वस्ती व नंतर काही वर्षांनी नागड्याची  वाडी म्हणजेच नागेवाडी असे नाव पडले. गावचे रहिवासी लग्नापूर्वी त्याची वीर पुरुष म्हणून पूजा करतात व त्याला लग्नासाठी  आमंत्रित करतात.

नागेवाडी गाव हे सातारा पुणे महामार्गा लगतच आहे. नागेवाडी गावापासून सातारा शहर हे अवघे १० किमी आहे. वाहतुकीसाठी महामार्गाचा खूपच फायदा गावाला झालेला आहे. महामार्गामुळे गावचे रहिवासी कधीहि व कोठेही जावू  येवू शकतात. मुंबईस जाण्या येण्यासाठी महामार्गाचा खूपच उपयोग होतो. 

गावाची रचना अतिशय सुरेख बनवली गेली आहे. वरची आळी व खालची आळी या दोन मुख्य वस्तीना जोडणारी  मधली आळी आहे. रस्ते सरळ व सगळी वळणे काटकोनात आहेत.

गावाचे रहिवासी मुख्यता मराठा सावंत परिवारातील आहेत. तसेच नंतर आलेले काही पाहुणे हि आहेत. गावामध्ये दलित कुटुंबे सुद्धा आहेत.

गावाच्या पश्चिम कडून धोम धरणाचा कालवा गेला आहे. या कालव्यामुळे गावाची बरीच जमीन हि ओलिता खाली आलेली आहे.

गावामध्ये ग्रामदेवता श्री काळूबाई, श्री मरीआई, श्री शाकंभरी व श्री हनुमानाचे मंदिर आहेत. यातील श्री शाकंभरी मातेचे मंदिर हे बरेच प्राचीन व अतिशय सुंदर घडणीचे आहे. महाराष्ट्रातून अनेक भाविक दर्शनासाठी व वार्षिक यात्रेसाठी श्री शाकंभरी व श्री मरीआई मातेच्या मंदिरास भेट देतात.

धन्यवाद,
विठ्ठल एकनाथ सावंत.

No comments:

Post a Comment