Saturday, September 19, 2020

अंधानुकरण

 


आपल्या सभोवतालचे जग हे सत्य आहे की मिथ्या आहे याचा निर्णय करण्यात बहुतेक साधकांचा वेळ जात असतो. स्वप्नातल्या विश्वा प्रमाणे जागृती मधील विश्व सुद्धा मिथ्या आहे असे बहुतेक अध्यात्मिक छातीठोकपणे सांगत असतात. आणि आपल्या सभोवतालचे जग कसे मिथ्या आहेत त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. 

सर्व काही शिवशक्तिचा खेळ आहे असे सांगितले जाते. यामधील शिव म्हणजे ईश्वर आणि शक्ती म्हणजे विश्व होय. शक्तीचा विनाश होऊन ती अविनाशी ब्रह्ममध्ये विलीन होते या अर्थाने ते उदाहरण आहे. ब्रह्म हे अविनाशी तत्व आहे त्याचा विनाश होत नाही परंतु शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ती सत्य आहे, जे आहे ते स्वप्नवत मिथ्या नाही. 

आपल्या सभोवतालच्या परिसराला दृश्य असे संबोधले जाते आणि ते दृश्य अनुभवनारा मी दृष्टा असे संबोधले जाते. अनुभवाचे विश्लेषण केले असता त्यामधील मी हा केवळ भास आहे हे लक्षात येते याचा अर्थ ज्याला आपण दृष्टा समजत असतो तो केवळ भास आहे, तो मिथ्या आहे. भौतिक दृष्ट्या दृश्य सत्य आहे आणि द्रष्टा हा भास आहे. द्रष्टा हा भास आहे, तो मिथ्या आहे हे समजल्यानंतर दृष्टा नाहीसा होतो आणि द्रष्टा नाहीसा झाल्यामुळे दृश्य पाहणारा कोणीच नसल्यामुळे दृश्य असून ते अदृश्य होते. आपण घरामध्ये टीव्ही चालू केला आहे त्यावर प्रोग्राम चालू आहेत परंतु घरातील मंडळी इतर खोल्यांमध्ये आहेत टीव्हीसमोर कोणीही नाही याचा अर्थ टीव्ही हे दृश्य असत्य आहे असे होत नसून टीव्ही चे दृश्य सत्य आहे परंतु पाहणारे दृष्टे गायब आहेत. 

ज्यावेळी द्रष्टा म्हणजे मी शिल्लक असतो त्यावेळी तो समोरील दृश्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण मेंदूच्या स्मृतीमध्ये साठवितो आणि ते भूतकाळातील चित्रीकरण आपणास तो दाखवित असतो. हे मेंदूच्या स्मृती मधील भूतकाळातील चित्रीकरण म्हणजे दृश्य आहे असा भास निर्माण केला जातो. तो दृश्याचा भास असत्य आहे. एखादे दृश्य प्रत्यक्ष पाहणे आणि त्याच दृश्याचे व्हिडिओ शूटिंग पाहणे असा या दोन दृश्या मधील फरक आहे. म्हणजे दृश्य सत्य आहे पण त्याच्या व्हिडिओ शूटिंग मधील दृश्य मीथ्या आहे. 

आपण पूर्वीचे ग्रंथ आणि गुरु यांना जर श्रध्देने अनुकरण करत असू तर त्यांची अशी ब्रह्मवाक्ये आपला नक्कीच गोंधळ उडवितात आणि आपणास सत्य समजत नाही. जगातील कोणताही ग्रंथ अथवा गुरु अथवा प्रेषित यांच्याकडे श्रद्धेने न पाहता त्यांच्या वाक्यातून आपल्याला सत्य समजते का याची शहानिशा करावी. त्यांच्या विचारातून आपल्या प्रश्नांची उकल होत नसेल तर आपणास मार्गदर्शन करण्यात ते व त्यांचे विचार निरर्थक ठरले आहेत आणि होय, अनुकरण केल्याने सत्य समजत नाही.

अंधानुकरण करण्या पासून पूर्णपणे स्वतंत्र झाल्याशिवाय आपणास सत्य दर्शन असंभव आहे.

Freedom from authority is absolutely necessary to find out if there is, or if there is not ultimate truth. - J Krishnamurti

Thursday, September 17, 2020

पवित्र जीवन

 


आपणास सत्य का समजत नाही? याचे प्राथमिक कारण हे आहे की आपण आपले सर्व संबंध योग्य व्यक्तींशी जोडत नाही. कुटुंब, समाज, नोकरी-व्यवसाय इत्यादी सर्वत्र चुकीचे संबंध जोडले गेल्यामुळे ते चुकीचे संबंध सांभाळण्यासाठी आपणास सर्व शक्ती आणि सर्व वेळ द्यावा लागतो.

आपण आपली प्रत्येकाची एक प्रतिमा बनवलेली असते या प्रतिमा आपणास एकमेकांशी सुखसंवाद करून देत नाहीत आणि त्यामुळे आपले एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध टिकून राहत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या जाणिवेत आपणा सर्वांच्या प्रतिमा इतक्या खच्चून भरलेल्या असतात की प्रतिमा शिवाय जाणीव शक्य नसते. जोपर्यंत आपल्या जाणीवे मध्ये चांगल्या किंवा वाईट प्रतिमा असतात तोपर्यंत आपले एकमेकांशी संबंध सौहार्द पूर्ण असू शकणार नाही आणि संबंध योग्य नसतील तर जीवन निरर्थक ठरते. चांगले नातेसंबंध कसे निर्माण करावेत यासाठी कोणतीही प्रक्रिया असू शकत नाही कारण नवीन प्रक्रिया म्हणजे परत नवीन प्रतिमा आणि अशा प्रकारे प्रतिमांचा खेळ अखंड चालू राहतो. 

सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण जशी सुखाची एक प्रतिमा असते तसेच दुःखाची सुद्धा एक प्रतिमा असते, दोन्ही मूलतः प्रतिमाच असतात. भूतकाळातील सुख-दुःख आणि भविष्यकाळातील सुख-दुःख हे सारखेच आहेत कारण ते सारख्याच प्रतिमांचे बनलेले आहेत.

ज्यावेळेस आपणास द्रष्टा आणि दृश्य हे एकच आहेत हे पूर्णपणे समजते त्यावेळी जाणीव नेणीवेचे सर्व स्तर नाहीसे होतात. मी चे अधिष्ठान ढळले जाते, प्रतिमा बनविणारा मी क्षीण होताच प्रतिमा बनणे बंद होतात आणि आपल्या मानसिक अस्तित्वाचा मृत्यू होतो. मी चा मृत्यू हाच स्वरूप साक्षात्कार होय. स्वरूप साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीचे दुःखातून म्हणजे मानसिक दुःखातून पूर्णपणे मुक्तता होते, त्याचे हृदय अपार करूणेने भरून येते. आतापर्यंत जीवनामध्ये भोगलेले सर्व दुःखाचे रूपांतरण करूणे मध्ये होते याचाच अर्थ आत्मसाक्षात्कार प्राप्त व्यक्तीला पूर्व जीवना मध्ये दुःखाला सामोरे जावे लागतेच. 

वैयक्तिक मी चा अंत होताच, वैयक्तिक मीचे दुःख संपुष्टात येतात, त्याच्या दुःखाचे करुणेत रूपांतर होते आणि त्याचवेळी त्याच्या वैश्विक मी चा जन्म होतो!!! विश्वातील इतर जिवांचे दुःख त्याचे दुःख बनले जाते म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक दुःखाचे, स्वतःच्या मि चा अंत करीत नाही तोपर्यंत ती व्यक्ती समाजाचे नेतृत्व करण्यास अपात्र असते. वैयक्तिक मानसिक दुःखाचे रूपांतरण करुणे मध्ये होताच ती व्यक्ती पवित्र जाणीव मध्ये प्रवेश करते. या अतिपवित्र जाणिवे मध्ये पूर्वग्रह दूषित मन प्रवेश करू शकत नाही. अशा अति पवित्र जाणिवे मध्ये प्रवेश करणे हेच जीवन आहे आणि खरे जीवन म्हणजे पवित्र जीवन होय. आणि यामुळेच म्हणावेसे वाटते की जे जीवन अतिशय अल्प आहे ते जीवन व्यर्थ न दवडता, त्याचा गैरवापर न करता आपण शक्य तितक्या लवकर पवित्र जीवनात प्रवेश करायला हवा. आणि हे सर्व आपल्या  जीवनामध्ये प्रत्यक्षात अंमलात यायला हवे. ते केवळ ऐकून आणि समजून सोडून देणे योग्य नाही.

ज्या व्यक्तीस जगाने लादलेल्या जीवन ध्येयाची तमा नाही आणि ज्याला जीवनाचे खरे वास्तविक ध्येय जाणून घ्यायचे आहे ती व्यक्ती अशा realised व्यक्तीशी संवाद साधून त्याला आपल्या समस्या सांगून अर्थात अध्यात्मिक अडचणी, अध्यात्मिक प्रश्नउत्तरे करून, अध्यात्मिक चर्चा करून ती अवस्था प्राप्त करू शकते. म्हणजे ज्याला अध्यात्मिक अवस्थेची अत्यंत तळमळ आहे अशा व्यक्तीला ती अवस्था प्राप्त होऊ शकते.

- J Krishnamurti, 

https://youtu.be/V9hCYaCOGpk


Tuesday, September 15, 2020

सत्याचा साक्षात्कार


मी म्हणजे नेमके काय आहे हे समजणे म्हणजे अध्यात्मिक अनुभुती येणे होय, मी समजण्यासाठी साधना आणि अभ्यास करावा लागतो असाही समज आहे.

अगदी काल परवा पर्यंत माझाही तसाच समज होता. परंतु एक आठवड्या पूर्वी माझा ओळखीच्या दोन तरुणांशी संवाद झाला, अध्यात्मिक चर्चा सुद्धा झाली. ते दोघेही २५ ते ३० वर्षाचे आहेत. शिक्षण पूर्ण करून नोकरी करीत आहेत. धार्मिक वा अध्यात्मिक साधना आणि अभ्यास काहीच नाही. व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान वगैरे काही करीत नाहीत. अजूनही त्यांचा या गोष्टींकडे कल नाही. ते त्यांच्या परीने त्यांचे जीवन जगत आहेत. 


मी सहज चर्चा करताना मुद्दामहून अध्यात्मिक विषय काढला आणि जे मला मी बद्दल माहीत होते ते त्यांना व्यवस्थित समजून सांगितले आणि त्यांना ते समजले की नाही यावर परत चर्चा केली, प्रश्नोत्तरे झाली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की दोघानाही 

  • अनुभव म्हणजे काय आणि त्यामध्ये 

  • मी चा भास कसा निर्माण होतो, 

  • दृष्टा आणि दृश्य हे कसे एक आहेत observer is observed हे व्यवस्थित समजले !!!


कसलीही तळमळ नाही, अट्टाहास नाही, प्रयत्न नाही, साधना नाही, अभ्यास नाही तरीही अर्ध्या तासाच्या चर्चेत त्यांना ते समजले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.


माझी चर्चा त्यावेळी रेकॉर्ड केलेली नव्हती परंतु जे आठवत आहे ते मी लिहून काढले आहे.


इतर विषया वर चर्चा चालू असताना मी मुद्दामून अध्यात्मिक विषय काढला आणि त्यांना त्याची पूर्वकल्पना दिली की मी तुम्हाला आता जे काही सांगत आहे ते फक्त मला तुम्हाला कळतय काय त्याची खातरजमा करावयाचे आहे. मी जे काही सांगत आहे ते त्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे व नंतर त्यांना जे काही समजले ते त्यांनी मला सांगावे असे आमचे ठरले.


त्यांना मी प्रथम अनुभव म्हणजे काय याची उकल करून सांगितली. अनुभव म्हणजे एखादी घटना घडत असताना त्याची जाणीव प्रथम शरीरास म्हणजे शरीर इंद्रियास होत असते. डोळे, कान, नाक, त्वचा इत्यादींना अनुभव पहिला स्पर्श करत असतो. शरीर इंद्रियांना अनुभव प्राप्त झाल्यानंतर तो अनुभव मेंदूकडे पाठविला जातो, मेंदूमध्ये त्या अनुभवाची नोंद केली जाते, पूर्व अनुभवाशी त्याची पडताळणी केली जाते, त्यावरून नवीन अनुभव काय आहे याचा प्रतिसाद मेंदूमध्ये निर्माण केला जातो. ही सर्व प्रक्रिया म्हणजे अनुभव होय. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास काही काळ जात असतो. या कालावधीचा सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये जो काळ जातो त्याला आपण अंतर म्हणतो. आपला मेंदू अतिशय जलद गतीने अनुभवाच्या सर्व क्रिया पार पाडत असतो त्यामुळे आपणास काळ, अंतर आणि मी च्या भासाचा पत्ता लागत नाही. अनुभवाची जेव्हा सुरुवात होते त्यावेळी तो अनुभव शरीर इंद्रिये या पासून सुरु होतो नंतर तो मेंदूमध्ये पाठवला जातो. मेंदूमधील स्मृती मधून तो अनुभव काय आहे हे सांगितले जाते नंतर त्या अनुभवाचे ज्ञान प्राप्त होते. तोपर्यंत तो अनुभव अज्ञात असतो. 


उदाहरणार्थ आपण प्रत्यक्षात जेव्हा एखादे झाड पाहत असतो त्यावेळी डोळ्यांना ते झाड दिसते, डोळे ती माहिती मेंदूकडे पाठवतात, मेंदूमध्ये ती माहिती साठविली जाते, मेंदूमध्ये पूर्व अनुभवावरून ते झाड आहे याची जाणीव निर्माण होते.


मेंदूमध्ये अनुभवाची प्रतिक्रिया, प्रतिसाद निर्माण होताच तिथे मी चा भास निर्माण होतो, जो मी ते झाड पाहिले असा कर्त्याचा भास निर्माण करतो. 


दृष्टा आणि दृश्य हे एक कसे?


कोणत्याही अनुभवांमध्ये द्वैत उघडपणे दिसत असते. द्वैत अनुभवा मध्ये दोघे असतात एक दृश्य आणि ते दृश्य पाहणारा द्रष्टा. आपणा सर्वांच्या या नेहमीच्या सराईत अनुभवामुळे आपणास दृश्य आणि द्रष्टा हे एकच आहेत हे समजू शकत नाही. 


अनुभवाची प्रक्रिया जर नीट समजली असेल तर दृश्य आणि द्रष्टा हे एकच आहेत हे समजू शकते. प्रथम आपण दृश्य म्हणजे नेमके काय याचा सखोल अभ्यास करू या.


जेव्हा आपण एखादी घटना पाहत असतो तेव्हा त्याचे दृश्य मेंदूमध्ये स्मृतीमध्ये साठवले गेल्यानंतर आपणास ते दिसू लागते. म्हणजे आपणास जे दिसते ते मेंदूमधील स्मृती मधील आपण त्या दृष्याची साठवलेली प्रतिमा पाहात असतो, प्रत्यक्ष दृश्य नव्हे. याचा अर्थ आपण ज्याला प्रत्यक्ष दृश्य म्हणतो ते आपल्या मेंदूमधील स्मृती असते जी काही क्षणापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेली घटना असते. 


दृश्य म्हणजे मेंदूमधील स्मृति हे समजले असेल तर आता आपण द्रष्टा म्हणजे काय ते पाहू या. अनुभव म्हणजे काय हे पाहताना आपण पाहिले होते की मेंदूमधील स्मृतींचा प्रतिसाद निर्माण होताना मी चा भास निर्माण होतो ज्याला आपण कर्ता असे समजत असतो तोच द्रष्टा आहे. म्हणजे द्रष्टा सुद्धा मेंदूमधील स्मृतींचा प्रतिसाद आहे. 


मेंदूमधील स्मृतींचा जो प्रतिसाद असतो त्यालाच आपण विचार समजतो आणि या विचारांची न संपणारी जी साखळी असते त्याला आपण मन असे समजतो. 


दृश्य म्हणजे मेंदूच्या स्मृतींचा प्रतिसाद होय तसेच द्रष्टा म्हणजे सुद्धा मेंदूच्या स्मृतींचा प्रतिसाद होय आणि दोन्ही सुद्धा विचार आहेत. म्हणजेच द्रष्टा आणि दृश्य म्हणजे वेगवेगळे नसून एक विचार मात्र आहेत. दोन्ही भूतकाळ आहेत. 


आपण आत्तापर्यंत अनुभव म्हणजे काय, त्यातून मी चा भास कसा निर्माण होतो आणि दृश्य आणि दृष्टा हे कसे एक आहेत हे पाहिले. हे इतके सोपे आहे आणि ते जर आपणास समजले तर आपणास ते खरेच वाटणार नाही. नसेल समजले तर परत परत वाचा. थोडेसे जरी लक्षात आले तरी त्या आधारे कृष्णमूर्ती समजू लागतील, पांढरे साहेब समजू लागतील, संत समजू लागतील. 




प्रतिमा भंजन



आपण प्रत्येकजण स्वतःची एक इमेज / प्रतिमा बनवीत असतो. ज्यामध्ये आपली ओळख, स्वभाव, मालकी आदि समाविष्ट असतात. या प्रतिमांना कोणी विचलित केले की आपणास दुःख होते. आपणावर कोणी टीका केली की आपणास ते आवडत नाही याचे कारण आपण आपली चांगली प्रतिमा गृहीत धरलेली असते व तिला नावे ठेवलेले आपणास आवडत नाही. आपली स्तुति केली की बरे वाटते कारण आपण आपली तशीच प्रतिमा गृहीत धरलेली असते. 

आपण सर्वजण एकमेकांशी संबंध ठेवणे, देवाणघेवाण करतो ते या चांगल्या वा वाईट प्रतिमांच्या आधारे. म्हणजे आपल्या एकमेकांच्या प्रतिमा एकमेकांशी व्यवहार ठेवत असतात. आपले संबंध प्रेम राग द्वेष हे सर्वजण प्रतिमा निगडित असते. या सर्व प्रतिमा बनविणारे आपले मन असते. मनाने जर चांगल्या वाईट प्रतिमा बनवल्या नाहीत तर आपले सर्वांचे व्यवहार हे नैसर्गिक रित्या सहज होऊ शकतात. आपले देव देश धर्म जात संप्रदाय ग्रंथ गुरु या सर्व अशाच मनाने बनवलेल्या प्रतिमा आहेत. या प्रत्येक प्रतिमा मधील प्रतिस्पर्धी नेते ते धार्मिक असोत राजकारणी असोत सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा कुटुंबातील नातलग असोत आपल्या प्रतिमा मध्ये कलह निर्माण करतात आणि आपले नैसर्गिक जीवन या प्रतिमांच्या कल हांनी  व्यापले जाते. 

आपण प्रत्येकजण एक स्वतंत्र मनुष्य शरीर आहोत हे आपण सोईस्कर रित्या विसरतो आणि इतरांचे प्रतिमांच्या आधारे आपण शोषण करीत राहतो. मी कर्ता आहे, मालक आहे इतर बायका मुले, नोकर चाकर, गोर गरीब, इतर वर्णीय व इतर धर्मीय यांचे मी शोषण करू शकतो ही भावना बळावली जाते. हाच आदर्श पुढील पिढ्या उचलतात आणि तीच मानवी परंपरा बनली जाते. हे असेच आहे असे मालक धरून जसे चालतो तसेच हेच आपले प्राक्तन आहे असे शोषले जाणारे धरून चालतात. मानवी प्रतिमांचे हे शोषण मग मानवी जाणिवेत इतके खोलवर झिरपले जाते की त्याविषयी नंतर विचार करणेच बंद केले जाते. सत्य खोलवर गाडले जाते, त्यावर असत्याची प्रार्थना स्थळे बांधली जातात आणि तेच प्रार्थना करतात सत्य प्राप्तीचे, परमशांती प्राप्तीची. मानवी प्रतिमा बनवून शांत न झालेले मन पुढे अज्ञात, निराकार ईश्वराच्या प्रतिमा बनवू लागते, आणि त्याच प्रतिमांच्या भजनी लागते.