Wednesday, December 05, 2018

बुध्दिचे औदार्य

आत्मसाक्षात्कार हा केवळ परिपक्व बुध्दिमंत योग्यांनाच प्राप्त होऊ शकतो

अध्यात्मिक साधना करणारे भक्त व योगी यांना आत्मसाक्षात्काराचि प्रचंड ओढ लागलेली असते. आत्मा व परमात्मा म्हणजे नेमके काय हे प्रत्यक्षात स्वतः अनुभवण्याचि प्रत्येकाचि तळमळ असते. परंतु परिपक्व झालेले बुध्दिमान योगीच फक्त आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतात.

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ गिता १५:११॥

आत्मसाक्षात्कारा बाबत अपरिपक्व संधिसाधुंनी बराच गैरसमज करून ठेवला आहे. ज्यांना आत्मज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाहि अशांनीच त्याचे प्रचंड प्रदर्शन मांडलेले आहे. या प्रदर्शनांमुळे बहुतेक साधकांचि दिशाभुल होत असते व ते चुकिच्या संकल्पनांच्या नादि लागतात. स्वतः अधिक मेहनत न घेता बाजारू गुरूंच्या मदतीने शॉर्टकट शोधत असतात. संसार असो वा अध्यात्म असो कष्ट, मेहनत हे करावेच लागतात. संसारामध्ये शॉर्टकटचि सवय असणाऱ्यांना अध्यात्मामध्येहि शॉर्टकट हवा असतो. संसारामधिल हव्यास, वाईट सवयी वा व्यसने हि अध्यात्मामध्ये अडथळे ठरत असतात. म्हणुन ‘आधि संसार करावा नेटका’ याचा अर्थ निट लक्षात घ्यायला हवा.

परिपक्व होणे म्हणजे जे आपणास साध्य करावयाचे आहे त्यासाठिचि जि शरीर, मन, बुध्दिचि साधने आहेत त्यांना परिपक्व करणे होय. यम, नियम, आसन… या अष्टांग योगाने साधनशुचिता साध्य करता येते. या साधन शुचितेच्या आपल्या साधनांवर होणाऱ्या परिणामांचा अंदाज आपणास अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह या क्रमाक्रमाने प्राप्त होणाऱ्या आपल्या मधिल मानसिक स्थित्यंतरावरून आपणास काढता येतो. आपण साधनेच्या कोणत्या टप्प्यावर आहोत व अजुन किती टप्पे पार करावयाचे आहेत याचिहि कल्पना यांवरून येते. परिपक्वतेचि लक्षणे ओळखण्याचि अजुन एक खुण म्हणजे साधकाचि तामसीक, राजसीक, सात्वीक अवस्थांमधिल संक्रमणे व त्याहि पलीकडिल त्रिगुणातीत अवस्थेमधिल स्थीर होणे हे होय. साधक परिपक्व होत असताना त्याच्या बाह्य राहणिमानावरहि त्याचा परिणाम होताना दिसत असतो. ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम हे त्याच्या जिवनामध्ये सहज घडत असलेले दिसुन येतात. अध्यात्मिक मार्गदर्शक निवडताना त्याचि साधनशुचिता तपासुन नंतरच त्याच्यावर विश्वास ठेवावा, संभाषण चतुरांपासुन नेहमी सावध रहावे.

साधनशुचितेमुळे साधकाचे शरीर, मन व बुध्दि परिपक्व होते व पुर्ण परिपक्व अवस्थेमध्ये विवेक बुध्दि अतिशय तल्लख होते. विवेकबुध्दिने त्याचे असत्य ज्ञान नाहिसे होते व वेदांच्या पलीकडिल, वेदांतामध्येहि वर्णन केलेले नसलेली, नेती नेती अवस्था प्राप्त होते. अशा आत्मसाक्षात्काराचे दर्शन झालेल्या अवस्थेमध्ये सांगण्यासारखे, बोलण्यासारखे वा लिहिण्यासारखे काहिहि शिल्लक रहात नाहि, प्रदर्शन पुर्णपणे बंद होते. जिथे बाह्य प्रदर्शन आहे तिथे अंतः दर्शन नाहि हि खुणगाठ नेहमी लक्षात ठेवावी.