Friday, March 15, 2024

सत्य हे आस्तिक आणि नास्तिक या दोघांच्या पलीकडे असते

सत्य हे आस्तिक आणि नास्तिक यांच्या विचारांच्या पलीकडे असते काय?

एखादी व्यक्ती ही आस्तिक किंवा नास्तिक असते ते त्याच्या विचारांच्या आधारावर. विचार म्हणजेच मन असते. मन हे वास्तविक नसून भ्रामक असते. म्हणजे भ्रामक मनाच्या विचारातून आस्तिक आणि नास्तिक विचार निर्माण होत असतात, म्हणजे दोन्हीही भ्रामक असणार. 

मग सत्य काय असावे? 

सजीवांचे शरीर हे त्यांचे वास्तविक अस्तित्व असते. शरीराचे हे वास्तविक Hardware चालविण्यासाठी मन नावाच्या Software ची आवश्यकता असते. विचारांच्या मालिका म्हणजे मन असते. विचार म्हणजे आपल्या शरीराच्या पाच ज्ञानिंद्रियास येणाऱ्या अनुभवांच्या प्रतिक्रिया असतात. प्रतिक्रिया म्हणजे ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांची स्मृती मधील आठवणी होत. 

स्मृती मधून येणाऱ्या असंख्य विचारामधील एक विचार स्वताला मी असे समजतो आणि तो मी इतर विचारांचा नेता बनतो. जसे समुहांचा नेता हा त्या समूहाचा भाग असतो तसेच मी हा सुद्धा विचारच असतो.  या आकलनाच्या अज्ञानातून मी म्हणजे आत्मा असे पारंपरिक शास्त्रात सांगितले गेले आहे. आत्मा ही कल्पना आहे हे कळले तर आपोआप परमात्मा सुद्धा कल्पना आहे याचे आकलन होते. 

समूहाचा नेता इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. स्वतःची नेतेगिरी दीर्घकाळ चालावी असे त्याला नेहमी वाटत असते. त्यासाठी तो नवनवीन कल्पना लढवीत राहतो. अगदी तसेच आपल्या मी या विचाराचे असते. मी हा सुद्धा स्मृती मधून उठणाऱ्या असंख्य विचाररूपी प्रतिक्रियांचा प्रतिनिधी असतो. त्याला अखंड अस्तित्व हवे असते. तो इतर विचारांना आपल्या पेक्षा वेगळे समजत असतो. 

मुळात विचारांना शरिरासारखे अस्तित्व नसते, ते फक्त मानसिक विचार असतात म्हणून विचारांना भ्रामक समजले जाते. 

मी नामक विचार आणि इतर विचार अशी या भ्रामक अस्तित्वात भ्रामक विभाजनी होत असते. या विभागणी मधून सगळे द्वैत निर्माण झाले आहेत. जेथे दोन असतात तेथे स्वार्थ असतो, संघर्ष असतो, दुःख असते. 

प्रत्येक जीवाचे शरीर हे वास्तविक आहे परंतु जीवनावश्यक गरजा पूर्तता करण्यासाठी भ्रामक मन निर्माण झाले आहे. भ्रामक मन हे त्याच्या श्रेष्ठत्व आणि स्वार्थ यासाठी divide and rule नियमाचा वापर करत असते. स्वतःच्या श्रेष्ठत्व आणि स्वार्थ यासाठी तो इतरांचे शोषण करीत असतो. 

मी पणाच्या या स्वार्थी वागणुकीचा परिणाम म्हणून समाजात अनेक देव, अनेक धर्म, अनेक देश, अनेक जाती, अनेक कुटुंबे अशी विभागणी होत राहते आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होत राहतो. या मानसिक विभागणी मधून प्रत्यक्ष संघर्ष होत असतो आणि यामधून दुःख निर्माण होत असते. 

मन म्हणजे त्याच्या पूर्व अनुभवांचे गाठोडे होय. या गाठोड्यात कुटुंब, समाज, देव, देश, धर्म या सर्व मानसिक संकल्पनांची सामग्री ठासून भरलेली असते. 

जेव्हा एखाद्याच्या लक्षात हे सत्य येते  त्या क्षणी त्याच्या मनाची मानसिक सामग्री नाहीशी होते, त्याचे मन पूर्ण रिते होते. तो शून्य अवस्थेत स्थित होतो. जीवनावश्यक गरजा साठी विचार येतात परंतु अनावश्यक कल्पनांचे विचार शुण्यता येते. 

मनाची काल्पनिक सामग्री नसेल तर मन असेल काय? जीवनातील विभागणी असेल काय? जीवनात दुःख असेल काय?

मानसिक सामग्रीचे नाहीसे होणे म्हणजे, मनापासूनची मुक्ती होय, मानसिक मी याच्या अस्तित्वाचा मृत्यू होय. या नंतरचे जीवन हे सत्य जीवन असते, त्याची कल्पना करता येत नाही, ते क्षणोक्षणी नित्य नूतन ताजे तवाने असे असते. 

ज्या जीवनात भूतकाळातील मानसिक स्मृतींचा आणि संकल्पनांचा लवलेश नसतो ते जीवन हेच सत्य जीवन असते, तेच सत्य असते.