आपल्या मी ची ओळख हीच आपली ओळख
अध्यात्मिक साधना करणाऱ्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीची ओढ असते. आत्मसाक्षात्कार म्हणजे मी नेमका कोण आहे याचा साक्षात्कार करणे होय.
जीवनातील असंख्य समस्यांचे कारण सुद्धा मी चे अज्ञान हेच असते. त्यामुळे मी चे आकलन हा आपल्या जीवनातील एक फार मोठा शोध ठरतो.
अध्यात्मिक शास्त्र या विषयी असे सांगते की मी देह नाही, मी मन नाही आणि त्याही पलिकडील मी आत्मा आहे. त्यालाच इतर काही spirit, soul असेही समजतात. वैयक्तिक आत्मा आणि वैश्विक परमात्मा अशा त्या संकल्पना आहेत. गीता आणि इतर अनेक धर्म ग्रंथात याची वर्णने आहेत.
मी म्हणजे आत्मा आहे हे शास्त्रांनी सांगितल्या मुळे सर्वजण आत्म्याचा शोध घेत राहतात, त्या एकाच मार्गाने जातात. मी चा शोध करण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार साठी अनेक साधना कराव्या लागतात, ध्यान करावे लागते, अभ्यास करावा लागतो. असा शास्त्रांनी आपला पक्का समज करून ठेवला आहे.
कृष्णमूर्ती यांनी मी म्हणजे नेमके काय आणि तोच कसा द्रष्टा आणि दृष्य आहे हे सप्रमाण सिद्ध केले, कोणत्याही गुरु, संप्रदाय आणि साधने शिवाय. आणि त्यांनी नंतर जगभर स्वतःच्या अनुभवाचा प्रचार केला. आपणही मी चा साक्षात्कार कोणत्याही साधने शिवाय करून घेवू शकतो. फक्त आकलन आणि बुद्धिमत्ता याची थोडी आवश्यकता आहे.
कृष्णमूर्ती यांनी मी म्हणजे आपला भूतकाळ आहे, आपल्या स्मृतीचा प्रतिसाद आहे असे सांगून तोच आपला संपूर्ण पूर्व माहिती संग्रह आहे, तोच आपला पूर्वग्रह आहे, तोच काळ आहे, तोच विचार आहे, तोच द्रष्टा आहे आणि तोच दृष्य आहे हे सतत प्रतिपादन केले आहे. हे सर्व त्यांच्या भाषणातून अनेकदा ऐकून सुद्धा मी नेमका सापडणे अवघड असते.
एकदा मी स्वतः अनुभव म्हणजे नेमके काय असते आणि अनुभवाच्या एक एक पायरीचे आकलन करताना वरील सर्व गोष्टी मला त्या मध्ये एकत्रित दिसल्या आणि मी माझ्या परीने मी चा शोध लावला आहे. आपण प्रत्येक जण त्याची शहानिशा करू शकता. स्वीकारणे अथवा न स्वीकारणे पेक्षा याचे फक्त आकलन होणे खूप महत्वाचे आहे.
सत्य हे नेहमी अज्ञात असते आणि जे ज्ञात आहे ते सत्य नसते या साध्या कसोटीवर कोणतेही पारंपरिक शास्त्रे आणि त्यांचे ज्ञान हे ज्ञात असल्यामुळे ते सत्य नसते हे मान्य करणे अवघड जाते. याचे कारण श्रद्धा असतात. श्रद्धा या सत्य संशोधनातील सर्वात मोठा अडसर आहे हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही.
आता आपण कोणतीही कल्पना न करता शास्त्रशुध्द रित्या आपल्या मी चा शोध घेऊया. आपले शरीर स्वतःच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी सतत अनुभव घेत असते. अनुभव करताना नेहमी दोन घटक असतात, एक अनुभव घेणारा मी असतो आणि दुसरा अनुभवात येणाऱ्या घटना असतात. अनुभव करणारा जो मी असतो त्याला द्रष्टा संबोधले जाते आणि तो जे काही अनुभव करीत असतो ते त्याचे दृष्य असते.
आपण एक झाड पहात आहोत या साध्या आणि सोप्या अनुभवाचा उदाहरणासाठी उपयोग करूया. आपण जेव्हा झाड पहात असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळे झाड पहात असतात. डोळे कॅमेरा प्रमाणे झाडाची प्रतिमा काढतात आणि ती प्रतिमा ते मेंदूकडे पाठवितात. मेंदूकडे आलेली झाडाची प्रतिमा मेंदूच्या स्मृतीमध्ये साठविली जाते. स्मृतिमधून हा अनुभव विषद करण्यासाठी एक विचाराची प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रतिक्रिया म्हणजे आपला मी असतो. मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद विचारांच्या माध्यमातून व्यक्त होतो. हाच मी म्हणजे द्रष्टा असतो. हा मी स्मृती मध्ये असल्यामुळे तो प्रत्यक्ष झाड पाहु शकतं नसतो. तो नेहमी स्मृतीमधील साठविलेल्या प्रतिमा / माहिती पहात असतो. द्रष्टा असणाऱ्या मी चे दृष्य हे नेहमी स्मृती मधील माहिती असते.
द्रष्टा मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो तर स्मृती मधील माहिती म्हणजे दृष्य असते. या अर्थाने द्रष्टा आणि दृष्य हे स्मृतीचे भाग असतात, ते दोन्ही स्मृती असतात, म्हणून ते दोघे एक असतात.
प्रत्यक्ष झाड आणि आपण वेगळे आहोत परंतु मानसिक अनुभव मध्ये दोन्ही एक आहेत, यालाच भ्रम म्हणतात.
वर्तमान काळातील दृष्य हे स्मृतीमधील मिला समजे पर्यंत ते भूतकाळ झालेले असते. याचाच अर्थ आपला मी हा स्वतः भूतकाळात जन्मत असतो आणि तो भूतकाळातील स्मृती मधील माहिती अनुभव करीत असतो. आपले सर्व अनुभव हे प्रत्यक्ष नसतात ते काही कालांतराने आपणास समजतात.
मी चे हे सत्य स्वरूप खरोखर आकलन झाले तर त्याच्या बद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना आपोआप गळून पडतील. मी हा एक तात्पुरता विचार आहे, तो भ्रम आहे, तो जे काही विचार करतो ते सर्व भ्रम असू शकतात. जे काही तथ्य असते त्याचा खरे तर विचार करावा लागत नाही परंतु मी नामक विचार स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी सतत नवनवीन कल्पना लढवीत राहतो आणि त्या सतत चर्वण करीत राहतो.
मी च्या मानसिक कल्पनामध्ये अडकलेला मानव यामुळे जीवना मधील सत्य समजू शकत नाही.
मी चे यथार्थ आकलन झाले तर भ्रामक मी ने बनविलेल्या त्याच्या आत्मा, परमात्मा, ईश्वर, धर्म, देश आदि असंख्य भ्रामक कल्पनांचा निरास होवू शकतो. आणि मनाचे भ्रामक पण लक्षात आले की त्याच्या सर्व मानसिक संकल्पना शुन्यवत होतात, त्या बरोबरच आपले जीवन नैसर्गिकरीत्या यथार्थ होते, परिपूर्ण होते, पूर्णत्व प्राप्त होते.
@ vitthal@viyoddha.com