Tuesday, October 20, 2020

समाधि

In meditation, life is a total movement, not fragmented, not broken up as the ‘me’ and the ‘you’. In meditation, there is no 'me' to experience. – J Krishnamurti

आपली अशी अवस्था जेव्हा होईल कि ज्या अवस्थेमध्ये मी आणि तू असा भेदभाव असणार नाही, आपले संपूर्ण जीवन हे एकच असेल, जीवनामध्ये अहंकार नसेल, मी नसेल, अशा अवस्थेस समाधिस्थ अवस्था म्हणता येईल.

जाणिवेचे दोन प्रकार म्हणता येतील एक वैयक्तिक आणि दुसरी वैश्विक. वैयक्तिक जाणीव मध्ये आपल्या मेंदूतील विचार येत असतात आणि वैश्विक जाणिवेस आपण वैश्विक मन असे म्हणू शकतो. वैश्विक जाणीव मध्ये अपार ज्ञान, अपार करुणा, अपार प्रेम समाविष्ट असते याउलट मेंदूतील विचारांमध्ये स्वार्थी विचार, द्वेष, मत्सर, अज्ञान आदी समाविष्ट असतात. आपल्या मेंदूतील वैयक्तिक स्वार्थी विचारांमुळे आपणास सुख दुःख भोगावे लागतात. आपणास आपल्या दुःखापासून मुक्ती हवी असेल, अज्ञानापासून मुक्ती हवी असेल तर आपणास आपले स्वार्थी विचार थांबवावे लागतील. स्वार्थी विचार थांबविल्या नंतर वैश्विक ज्ञान, वैश्विक करुणा आपल्या अंतरंगात प्रवेश करते आणि आपणास मानसिक सुख दुःखापासून मुक्ती प्राप्त होते. 

जो स्वतः शांत झाला नाही आणि जो स्वतः सुखदुःखा पलीकडे गेला नाही तो इतरांना सुखी करू शकत नाही, इतरांना मार्गदर्शन करू शकत नाही. जी अज्ञानी मंडळी राजकीय नेते असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, धार्मिक गुरु असोत जे इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात, इतरांचे जीवन बदलण्याचे मार्गदर्शन करतात ते सर्व स्वार्थी विचारातून निर्माण होत असतात. स्वार्थी विचारातून निर्माण झालेले कोणतेही तत्त्वज्ञान मनुष्य समाजाला सुख दुःखा पासून मुक्ती देऊ शकणार नाही.

मानसिक सुख दुःखापासून मुक्ती प्राप्त होण्यासाठी आपणास मेंदूतील स्वार्थी विचारापासून अलिप्त राहून वैश्‍विक मनाच्या दालनात प्रवेश करावाच लागेल. आणि हे प्रत्येकाने स्वतः करावयाचे आहे, इतर कोणीही मदत करू शकत नाही. जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. 

हजारो वर्षांपासून आपणावर हेच संस्कार झाले आहेत की कोणीतरी स्वर्गातून येवुन मदत करील, कोणी साधू संत मदत करतील, सरकार मदत करेल, सामाजिक संस्था मदत करतील, शेजारी मदत करतील, घरातील वडीलधारी मदत करतील आपण वाट पहात राहायचे. अहंकार प्रत्येकास मी किती महान ज्ञानी आहे हेच सतत सांगत असतो त्यामुळे आपण ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच करत नाही, ज्ञान प्राप्ती साठी केलेला प्रयत्नातून आपण अज्ञानी आहोत हे लपविण्यासाठी.