आपणास सत्य का समजत नाही? याचे प्राथमिक कारण हे आहे की आपण आपले सर्व संबंध योग्य व्यक्तींशी जोडत नाही. कुटुंब, समाज, नोकरी-व्यवसाय इत्यादी सर्वत्र चुकीचे संबंध जोडले गेल्यामुळे ते चुकीचे संबंध सांभाळण्यासाठी आपणास सर्व शक्ती आणि सर्व वेळ द्यावा लागतो.
आपण आपली प्रत्येकाची एक प्रतिमा बनवलेली असते या प्रतिमा आपणास एकमेकांशी सुखसंवाद करून देत नाहीत आणि त्यामुळे आपले एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध टिकून राहत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या जाणिवेत आपणा सर्वांच्या प्रतिमा इतक्या खच्चून भरलेल्या असतात की प्रतिमा शिवाय जाणीव शक्य नसते. जोपर्यंत आपल्या जाणीवे मध्ये चांगल्या किंवा वाईट प्रतिमा असतात तोपर्यंत आपले एकमेकांशी संबंध सौहार्द पूर्ण असू शकणार नाही आणि संबंध योग्य नसतील तर जीवन निरर्थक ठरते. चांगले नातेसंबंध कसे निर्माण करावेत यासाठी कोणतीही प्रक्रिया असू शकत नाही कारण नवीन प्रक्रिया म्हणजे परत नवीन प्रतिमा आणि अशा प्रकारे प्रतिमांचा खेळ अखंड चालू राहतो.
सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण जशी सुखाची एक प्रतिमा असते तसेच दुःखाची सुद्धा एक प्रतिमा असते, दोन्ही मूलतः प्रतिमाच असतात. भूतकाळातील सुख-दुःख आणि भविष्यकाळातील सुख-दुःख हे सारखेच आहेत कारण ते सारख्याच प्रतिमांचे बनलेले आहेत.
ज्यावेळेस आपणास द्रष्टा आणि दृश्य हे एकच आहेत हे पूर्णपणे समजते त्यावेळी जाणीव नेणीवेचे सर्व स्तर नाहीसे होतात. मी चे अधिष्ठान ढळले जाते, प्रतिमा बनविणारा मी क्षीण होताच प्रतिमा बनणे बंद होतात आणि आपल्या मानसिक अस्तित्वाचा मृत्यू होतो. मी चा मृत्यू हाच स्वरूप साक्षात्कार होय. स्वरूप साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीचे दुःखातून म्हणजे मानसिक दुःखातून पूर्णपणे मुक्तता होते, त्याचे हृदय अपार करूणेने भरून येते. आतापर्यंत जीवनामध्ये भोगलेले सर्व दुःखाचे रूपांतरण करूणे मध्ये होते याचाच अर्थ आत्मसाक्षात्कार प्राप्त व्यक्तीला पूर्व जीवना मध्ये दुःखाला सामोरे जावे लागतेच.
वैयक्तिक मी चा अंत होताच, वैयक्तिक मीचे दुःख संपुष्टात येतात, त्याच्या दुःखाचे करुणेत रूपांतर होते आणि त्याचवेळी त्याच्या वैश्विक मी चा जन्म होतो!!! विश्वातील इतर जिवांचे दुःख त्याचे दुःख बनले जाते म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक दुःखाचे, स्वतःच्या मि चा अंत करीत नाही तोपर्यंत ती व्यक्ती समाजाचे नेतृत्व करण्यास अपात्र असते. वैयक्तिक मानसिक दुःखाचे रूपांतरण करुणे मध्ये होताच ती व्यक्ती पवित्र जाणीव मध्ये प्रवेश करते. या अतिपवित्र जाणिवे मध्ये पूर्वग्रह दूषित मन प्रवेश करू शकत नाही. अशा अति पवित्र जाणिवे मध्ये प्रवेश करणे हेच जीवन आहे आणि खरे जीवन म्हणजे पवित्र जीवन होय. आणि यामुळेच म्हणावेसे वाटते की जे जीवन अतिशय अल्प आहे ते जीवन व्यर्थ न दवडता, त्याचा गैरवापर न करता आपण शक्य तितक्या लवकर पवित्र जीवनात प्रवेश करायला हवा. आणि हे सर्व आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात अंमलात यायला हवे. ते केवळ ऐकून आणि समजून सोडून देणे योग्य नाही.
ज्या व्यक्तीस जगाने लादलेल्या जीवन ध्येयाची तमा नाही आणि ज्याला जीवनाचे खरे वास्तविक ध्येय जाणून घ्यायचे आहे ती व्यक्ती अशा realised व्यक्तीशी संवाद साधून त्याला आपल्या समस्या सांगून अर्थात अध्यात्मिक अडचणी, अध्यात्मिक प्रश्नउत्तरे करून, अध्यात्मिक चर्चा करून ती अवस्था प्राप्त करू शकते. म्हणजे ज्याला अध्यात्मिक अवस्थेची अत्यंत तळमळ आहे अशा व्यक्तीला ती अवस्था प्राप्त होऊ शकते.
- J Krishnamurti,
https://youtu.be/V9hCYaCOGpk
