Monday, September 10, 2018

देवपुजा


प्रश्नकर्ता: आपण देवपुजा का करतो?

जे कृष्णमुर्ती: माफ करा, आपण देवांचि खरोखरी पुजा करीत नाहि. आपण देवांवर प्रेम करीत नाहि. जर आपण खरेच देवावर प्रेम करीत असु तर हि असली देवपुजा आपण खचितच करणार नाही. आपण अज्ञाताला घाबरत असतो म्हणून देवांचि पुजा करीत असतो. आपण प्रेमापोटी नव्हे तर भीतीपोटि देवतांचि पुजा करत असतो. मुर्ती, मंदिरे, पुजाविधी, जानवे, माळा, अंगारे धुपारे हे काहिहि ईश्वरनिर्मित नाहि. या सर्व निरूपयोगी गोष्टि मानवाने भितीपोटि तयार केलेल्या आहेत. दुःखी, निराश, भयग्रस्त माणसे देवतांच्या पुजा करत असतात. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती, अधिकार, सत्ता आहेत ती माणसे सुखी नसतात. महत्वाकांक्षी माणसे हि सर्वात जास्त दुःखी असतात.

आपण जेव्हा सर्व आशा - आकांक्षामधुन मुक्त होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखी होतो. अशी सुखी माणसे देवतांच्या पुजा करीत बसत नाहित. दुःखाने पिचलेली, निराश झालेली, अन्यायाने त्रस्त झालेली माणसे मंदिराच्या पायऱ्या झिजवत असतात. परंतु त्यांनी मंदिरामध्ये आपला वेळ व पैसा व्यर्थ व्यतीत करण्या एैवजी आपल्या दुःखाचे मुळ असणारे अज्ञान शोधून काढले तर त्यांना निश्चितच सत्याचे दर्शन होईल, ईश्वर नेमका काय आहे हे समजेल व ते सर्व नरनारी सुखी होतील.